टाकळीभानमध्ये दोन कुटुंबांचा वाद व्यावसायिकांच्या मूळावर
टाकळीभानमध्ये दोन कुटुंबांचा वाद व्यावसायिकांच्या मूळावर
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
दोन कुटुंबाच्या वादातून त्याचे नुकसान गावातील सर्वच व्यावसायिकांना भोगावे लागण्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे घडला आहे. यावर गाव पुढारी मात्र मूग गिळून गप्प असल्याने व्यावसायिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
टाकळीभान येथे ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग एकमध्ये अतिक्रमण करुन राहत असलेल्या दोन कुटुंबात घराचे बांधकाम सुरू करताना रस्त्याच्या जागेवरुन वाद झाले. या वादातील एका कुटुंबाने टाकळीभान-घोगरगाव रस्त्यावर बसस्थानक परिसरात व संत सावता महाराज परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अतिक्रमण करुन व्यापारी गाळे बांधलेले आहेत. याच संधीचा फायदा घेऊन दुसर्या कुटुंबातील एका सदस्याने टाकळीभान-घोगरगाव रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन अतिक्रमण न काढल्यास 15 ऑगस्टपासून कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर संबंधित विभागाने 15 दिवसांत अतिक्रमणे हटवावीत अशी सुमारे 180 व्यावसायिकांना नोटीस दिली. त्यामुळे व्यावसायिकांचे धंदे मोडणार असल्याने खळबळ निर्माण झाली. स्थानिक गावपुढारी मात्र या होणार्या कारवाईत मूग गिळून बसलेले आहेत. या दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांची समजूत घालण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याने आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे? असा सवाल व्यावसायिकांकडून केला जात आहे.