अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून विविध क्षेत्रांतील पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून विविध क्षेत्रांतील पुरस्कार जाहीर
खोईसनाम सिंग, अभिजीत झुंजारराव, मोनिका बानकर, चंद्रकांत पवार आणि अरविंद गाडेकर यांना पुरस्कार जाहीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संगमनेर शाखेने या वर्षापासून (2020) राष्ट्रीय ते स्थानिक पातळीपर्यंत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या रंगभूमीच्या सच्च्या कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान करण्याचे जाहीर केले आहे. ख्यातनाम अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या पुरस्कार समितीच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये देशपातळीवर मराठी व्यतिरिक्त इतरभाषीय नाट्य रंगभूमीसाठी ठोस कार्य करणार्‍या प्रयोगशील रंगकर्मीस कै.सौ.उषा दळवी पुरस्कृत ‘रंग-रतन’ हा पुरस्कार मणिपूर येथील खोईसनाम राणाबीर सिंग, महाराष्ट्र राज्य अथवा देश पातळीवर मराठी रंगभूमीसाठी ठोस कार्य करणार्‍या प्रयोगशील रंगकर्मीस ‘रंग-बादल’ हा पुरस्कार कल्याण येथील अभिजीत झुंजारराव, नाट्य रंगभूमीवर ठोस कार्य करणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील प्रयोगशील तरुण रंगकर्मीस कै.सुधार निसळ स्मृती ‘रंग-सुधा’ हा पुरस्कार जेऊर येथील मोनिका बानकर, संगमनेर शहरातील अथवा जवळपासच्या तालुका परिसरातील नाट्यविषयक रंगभूमीसाठी कार्य करणार्‍या व्यक्तीस ‘नाट्य-उषःरंग’ पुरस्कार संगमनेर येथील चंद्रकांत पवार यांना तर संगमनेर शहरातील अथवा जवळपासच्या तालुका परिसरातील ललित कलाविषयक कार्य करणार्‍या व्यक्तीस ‘कला-उषःरंग’ हा पुरस्कार संगमनेरातील व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांना जाहीर झाला आहे.


सदर पुरस्कारांचा उद्देश मराठी भाषेतून मराठी आणि भारतातील इतर भाषेतील रंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी रंगकर्मी करीत असलेले प्रामाणिक प्रयत्न समाजाप्रत पोहोचावेत आणि त्या रंगकर्मीप्रती अल्पऋण व्यक्त करता यावेत; तसेच सदर रंगकर्मींच्या कामास प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संगमनेर शाखेने यावर्षापासून पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. तसेच इतर रंगकर्मींना मराठी आणि इतर भाषेतील रंगभूमीविषयी अधिक माहिती मिळून प्रेरणा मिळावी ज्यायोगे रंगभूमीची चळवळ अधिक जोमाने पुढे जावी, त्याचप्रमाणे स्थानिक रंगभूमीविषयक चळवळीस अधिक चालना मिळावी असा देखील हेतू आहे. त्यानुसार ख्यातनाम अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने पुरस्कारार्थींची निवड केली आहे.


पुरस्कारार्थी खोईसनाम राणाबीर सिंग यांचा 1971 पासून आजतागायत सुमारे 42 नाटकांमधून अभिनय, 51 नाटकांचे दिग्दर्शन आणि मणिपुरी प्रादेशिक भाषांतून 8 नाटके लिहिली आहे. तसेच 8 नाटके भाषांतरीत, मणिपूरच्या ग्रामीण भागात रंगमंच विषयक चळवळ चालविणार्‍या खोरीपाभा कलाकार संघटनेचे सचिव आणि मणिपूरच्या थीएटर सेंटर या शिखर संस्थेचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित, संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली अंतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवामधून सहभाग, गिरीश कर्नाड, महाश्वेतादेवी, विजय तेंडूलकर आदी नाटककारांच्या नाटकांचे मणिपुरी भाषेत रूपांतरण आणि सादरीकरण केलेले आहे. दुसरे पुरस्कारार्थी अभिजीत झुंजारराव यांनी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करू पाहणारा ‘जिवंत’ कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केली आहे. ‘अभिनय’ कल्याण येथील संस्थेच्या माध्यमातून स्पर्धात्मक, हौशी आणि प्रयोगशील एकांकिका, नाटकांची निर्मिती आणि सादरीकरण केलेले आहे. तिसरे पुरस्कारार्थी मोनिका बानकर यांनी प्रमुख नाट्य स्पर्धांमधून लेखन, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना या क्षेत्रात कार्य केले असून, युवा कलाकार म्हणून ओळख मिळविली आहे. चौथे पुरस्कारार्थी चंद्रकांत पवार हे जिल्ह्यातील जुने नाट्य परिषद सभासद, 1970 पासून रंगभूमीवर कार्यरत, अनेक एकांकिका, नाटके यामधून अभिनय, दिग्दर्शन, महाविद्यालयीन रंगभूमीवर युवक महोत्सव आदी अनेक उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे. पाचवे पुरस्कारार्थी व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी प्रसिध्द दैनिके, साप्ताहिके, मासिके आणि दिवाळी अंकांमधून आजपर्यंत हजारो व्यंगचित्रे प्रकाशित केली आहेत. तसेच राज्यस्तरीय विविध संमेलनामध्ये व्यंगचित्रे प्रदर्शन आणि सामाजिक चळवळीत सहभाग नोंदविला आहे. तथापि चालू वर्षी कोरोना महामारीमुळे पुरस्कार वितरण आज (मंगळवार, ता.25 ऑगस्ट) प्रत्यक्षपणे आयोजित करणे शक्य नसल्याने योग्यवेळी स्वतंत्रपणे घोषणा करण्यात येईल, असे आयोजक डॉ.संजयकुमार दळवी, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, सुरेंद्र गुजराथी, प्रमुख कार्यवाही श्रीकांत माघाडे, कोषाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यवाह मनीषा मेहेत्रे, सहकार्यवाह सुभाष कानडे, विशाल कदम आणि विजय गायकवाड यांनी सांगितले.

आपल्या आईच्या खंबीर पाठबळावर आणि प्रोत्साहनावर आपण आपली आजवरची सांस्कृतिक वाटचाल करू शकलो आहोत. अशा माझ्या आईच्या स्मृतीदिनी होणारा इतर खर्च आणि परंपरा यांना वेगळे वळण देऊन दरवर्षी 25 ऑगस्टला हे पुरस्कार देण्याचे योजिले आहे.
– डॉ.संजयकुमार दळवी (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद-संगमनेर शाखा)

Visits: 14 Today: 1 Total: 65860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *