‘गणेश’च्या निकालाने विखेंच्या साम्राज्यवादाला चाप! दहशतीचे राजकारण झुगारले; आता विधानसभेत डॉ.तांबेंच्या आव्हानाची चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुबलक ऊस असतानाही ‘राहुरी’ चालविण्यात आलेल्या अपयशाचा बोध घेवून ‘गणेश’च्या सभासदांनी कोल्हे-थोरात जोडीवर विश्वास दाखवला. गेल्या आठ वर्षांपासून गणेश ताब्यात असतानाही विखेंना सोसायटी मतदारसंघातील एकमेव जागा वगळता मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. वरकरणी सभासदांनी कारखान्याच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे दिसत असले तरीही या निवडणुकीच्या माध्यमातून नव्या राजकीय सूत्राचाही जन्म झाला आहे. त्यातून आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याचीही दाट शक्यता असून विखे पिता-पुत्राच्या साम्राज्यवादी भूमिकेला ओहोटी लागण्याची शक्यता आहे. गणेशच्या निवडणुकीतून जिल्ह्यातील विखे विरोधकांनाही नवे आत्मबळ प्राप्त झाले असून येणार्या कालावधीत त्याचे प्रतिबिंब दिसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या निकालातून शिर्डी मतदारसंघातून माजी महसूलमंत्र्यांचे मेव्हणे व विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली असून असे घडल्यास विखेंना कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल.

राज्यातील शांत आणि संयमी नेते अशी वेगळी ओळख असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी कधीही आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जावून जिरवाजिरवीच्या राजकारणाला थारा दिल्याचे यापूर्वीचे उदाहरण नाही. मात्र दोन महिन्यांपूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरात अख्खा पॅनल उभा करुन थोरातांना डिवचण्याचे काम केले. त्याचाच परिणाम शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोडणार्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लक्ष्य घातले आणि सहकारमहर्षी दिवंगत शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे यांच्या ‘परिवर्तना’च्या हाळीला दमदार प्रतिसाद देत गणेशची निवडणूक ताब्यात घेतली. वास्तविक सहकारातील निवडणुका पक्षीय राजकारणापलिकडे असतात असा आजवरचा अलिखित दंडक विखेंनीच वारंवार मोडीत काढल्याने त्याचा दृष्य परिणामही गणेशने दाखवला.
या निवडणुकीत विखेंच्या पॅनलसमोर थोरात-कोल्हे यांच्या परिवर्तन मंडळासह अॅड. अजित काळे यांनी तिसरा पॅनलही उभा केला होता, मात्र गणेशच्या सभासदांनी कारखाना चालावा या भावनेतून आधीच ‘निर्णय’ घेतल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. एकोणावीस संचालकांच्या निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात अवघ्या 15 मतांनी विजयी झालेल्या विखे गटाच्या ज्ञानेश्वर चोळके या एकमेव उमेदवाराशिवाय उर्वरीत अठरा उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे 2014 पासून विखेंनी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतला आहे. गेल्या आठ वर्षांपासून विखे पिता-पुत्र या कारखान्याचे व्यवस्थापन सांभाळत असताना त्यांच्या मंडळाचा झालेला दारुण पराभव परिवर्तन मंडळाच्या विजयासह जिल्ह्यात राजकीय परिवर्तनाचे संकेत देणाराही ठरला आहे.

विखे पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीकडे बघितल्यास ते कोणत्याही पक्षात असोत त्यांचे जिल्ह्यातील पक्षातंर्गत नेत्यांशी नेहमीच वितुष्ट राहिले आहे. 2014 साली देशात मोदी लाटेचा मोठा प्रभाव असताना जिल्ह्यात भाजपाने राहुरी, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड, कोपरगाव व नेवासा अशा पाच तर त्यावेळी युतीत असलेल्या शिवसेनेने पारनेरची जागा पटकावून जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व निर्माण केले होते. यातील कर्जत-जामखेडमधून विजयी झालेले प्रा. राम शिंदे वगळता उर्वरीत सर्व उमेदवार भाजपाने आयात केलेले होते. 2019 ची निवडणूक जाहीर होता होता जिल्ह्यात वेगवान राजकीय घडामोडी घडून लोकसभेच्या तिकिटासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपूत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपाची कास धरली.

त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खुद्द विखे पाटलांनीही भाजपात प्रवेश केला. त्या निवडणुकीतही मोदी प्रभाव कायम असतानाही कोपरगाव, नेवासा, कर्जत-जामखेड व राहुरीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. निवडणुकीनंतरच्या विश्लेषणातून आपल्या पराभवाला विखे पाटीलच कारणीभूत असल्याच्या तक्रारीही यातील अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्या. मात्र त्याचे नकारात्मक परिणाम समोर येण्याऐवजी 2019 नंतर जिल्ह्यातील निष्ठावानांना डावलून विखेंचे पक्षातंर्गत वजन वाढत गेले आणि त्यातून पक्षातील खद्खद्ही वाढीस लागली. त्या दरम्यान एव्हाना अन्य नेत्यांना क्वचितच मिळणारी मोदी-शहा-नड्डा भेट विखे पिता-पुत्रांना मात्र विनासायास मिळू लागल्यानेही जिल्ह्यातील अनेकांना असह्य झाले, त्यातूनच विखे पाटलांच्या राजकीय शत्रूंमध्येही भर पडत गेली.

गेल्या वर्षी राज्यातील सत्तानाट्यानंतर शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटासोबत भाजपाने युती करुन सरकार स्थापन केले. त्यातही राधाकृष्ण विखे पाटलांना पहिली शपथ देत तिसर्या क्रमांकाचे महसूल खाते देण्यात आले, त्यासोबतच अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपविली गेली. अर्थात राज्यात पाय पसरायचे असल्यास सहकार क्षेत्रावर मजबूत पकडं असणे आवश्यक असल्याने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याच आदेशाने विखे पाटलांना बळ दिले गेल्याचेही सर्वश्रृत आहे. इतके सगळे मिळूनही पाटलांनी राज्याच्या पटलावर राजकारण करण्याऐवजी आपले सगळे लक्ष्य जिल्ह्यांतर्गत जिरवाजिरवीच्या राजकारणावरच केंद्रीत केले. त्यातून त्यांच्या सध्याच्या भाजप या स्वपक्षातच त्यांचे असंख्य विरोधक तयार झाले. मात्र त्यांना आजवर कोणाची साथ मिळाली नव्हती, त्यामुळे विखे विरोधक असूनही त्यांचे उपद्रवमूल्य मात्र आजवर दिसून आलेले नव्हते.

संयमावर प्रहार झाल्याने आक्रमक झालेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहाता तालुक्यातील गणेश कारखान्यात मुसंडी मारुन आता ती उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे गणेशच्या माध्यमातून आगामी कालावधीत थोरातांची साथ मिळवून जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या नेत्यांनी विखेंचा अश्वमेध रोखून त्यांच्या साम्राज्यवादाला पायबंद घातल्यास आश्चर्य वाटू नये अशी स्थिती निर्माण होवू लागली आहे. शिर्डी मतदारसंघात शिरुन विखेंच्या ताब्यातील कारखाना हिसकावून घेणारी ही निवडणूक जिल्ह्याला दीर्घकाळ परिणाम देणारी ठरेल असा सूरही आता राजकीय विश्लेषकांच्या गळ्यातून आळवला जावू लागला आहे.

भाजपात प्रवेश झाल्यापासून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैराची दरी अधिक खोल होत गेली आहे, गणेशच्या निकालाने ती पुन्हा कधीही भरुन येण्याची शक्यता नसल्याने आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत विखेंच्या विरोधात थोरातांचे ‘बळ’ दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यातूनच आता विधान परिषदेचे माजी सदस्य, माजी मंत्री थोरात यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे यांचे नावही शिर्डी विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये घेतले जावू लागल्याने येणारा काळ जिल्ह्यात राजकीय उलथापालथीचा ठरेल हे मात्र नक्की.

गेल्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणतीही विशेष राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सुरेश थोरात यांना शिर्डीतून काँग्रेसची उमेदवारी देत विखे पाटलांसमोर आव्हान उभे केले होते. अर्थात पाटलांनी विक्रमी मते मिळवून ती निवडणूक सहज जिंकली. मात्र आता गेल्या तीन-साडेतीन वर्षांच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्याने यापुढील निवडणुका त्यांच्यासाठी सहज असणार नाहीत हे निश्चित आहे. त्यासाठीच आता डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची चर्चा सुरु करण्यात आली असून असे घडल्यास शिर्डीची निवडणूक राज्याच्या केंद्रस्थानी राहील यात शंका नाही.

