सोनईला पुन्हा एकदा कोरोना विषाणूंचा ‘विळखा’
सोनईला पुन्हा एकदा कोरोना विषाणूंचा ‘विळखा’
नायक वृत्तसेवा, नेवासा
गेल्या आठवड्यात नेवासा तालुक्यातील सोनई व घोडेगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अल्प दिसून आली. परंतु सोमवारी (ता.24) प्राप्त झालेल्या अहवालात अहमदनगर येथे खासगी लॅबमध्ये गेल्या तीन दिवसांत तपासणी केलेल्या 11 जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत, तर घोडेगाव येथील 7 जणांचे अहवालही पॉझिटीव्ह आलेले आहेत. यावरुन पुन्हा एकदा सोनईला कोरोना विषाणूंनी ‘विळखा’ घातला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोनई येथे सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधित सापडले. 24 जुलैपर्यंत शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेले होते. त्या काळात रुग्णसंख्या मर्यादित राहिली. परंतु 25 जुलैला अनलॉक सुरू झाल्याने सर्व आस्थापना दुकाने खुलेआम सुरू झाली. ईद, बैलपोळा व गणपती उत्सव कारणाने बाजारपेठेत मोठी गर्दी वाढली. सामाजिक अंतर ठेवण्यात आलेले नसल्याने तसेच सॅनिटायझर, मास्कचा वापर, तपासण्या होत नसल्याने गर्दी वाढतच गेली. आजूबाजूचे खेडीपाडी गावागावांतून कापड, किराणा, भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होऊ लागली. परंतु तालुका प्रशासन व स्थानिक प्रशासनाने या गर्दीबाबत काहीही ठोस भूमिका घेतली नाही आणि करोनाने पुन्हा एकदा सोनईला ‘विळखा’ घातलेला असल्याचे सोमवारी प्राप्त झालेल्या आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

