सराला बेट येथे भक्तनिवासाचे उद्घाटन तर साई मूर्तीची प्रतिष्ठापना सप्ताहातील शिल्लक वर्गणीसह साईभक्त व ग्रामस्थांनीही दिली वर्गणी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र सराला बेट येथे नुकतेच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या साई समाधी शताब्दी भक्तनिवास (आश्रम) इमारतीचे उद्घाटन व साई मूर्तीची प्रतिष्ठापना कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील भागवत एकादशीला सराला बेटचे रामगिरी महाराजांच्या हस्ते व विविध साधू-संतांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी सर्वांनी कोरोनाच्या काटेकोर नियमांचे पालन केले.

याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, लहू कानडे, आमदार बोरणारे, सचिन गुजर, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डी येथील हरिनाम सप्ताहचे अध्यक्ष तुकाराम बनकर, अर्चना कोते, शिर्डीचे शिवसेना नेते कमलाकर कोते, एकनाथ गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री क्षेत्र सराला बेट येथे महंत गंगागीर महाराज यांची समाधी असून हे त्यांचे तपश्चर्यचे ठिकाण असून दोन्ही बाजूने नदी वाहती आहे तर मध्ये बेट आहे. म्हणून सराला बेट म्हणून प्रसिद्ध आहे. संत गंगागिरी महाराज व संत साईबाबा हे समकालीन संत होते. त्यामुळे साईबाबांच्या पुण्यतिथी शताब्दीनिमित्त शिर्डीमध्ये संत गंगागिरी महाराजांचा 171 वा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरुपात संपन्न झाला होता. या हरिनाम सप्ताहातून शिल्लक राहिलेल्या 1 कोटी 6 लाख निधीतून तसेच साईभक्त, ग्रामस्थ व सप्ताह समितीने आणखी वर्गणी करून कोटी सव्वादीड कोटी रुपये जमा करून श्री क्षेत्र सराला बेट येथे श्री साई शताब्दी निवासस्थान इमारत बांधण्यात आली आहे. सर्व सुविधांयुक्त अशी ही इमारत बेटावरील वैभवात भर पाडणारी ठरली आहे.

भागवत एकादशीच्या दिवशी या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे भाविकांना सर्व सुविधांयुक्त निवासाची व्यवस्था होणार आहे. तसेच श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही विधीवत पूजा-आरती करुन करण्यात आली. या इमारतीच्या दरीत स्वयंपाक घर व प्रसादालय आहे. येथे ‘ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डी’ या संस्थेमार्फत वृक्षारोपण करून येथे आणखी शोभा वाढविण्यात आली आहे. या इमारतीची आखणी करणारे वास्तूविशारद चुडामणी पाटील, विद्युत रोषणाई करणारे सुनील बारहाते, पालखी घेऊन येणारे रतलामचा श्री साई पालखी सेवा संघ, ग्रीन सिटी क्लीन शिर्डीचे सर्व कार्यकर्ते, कापसे पैठणीचे कापसे आदिंचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सराला बेट, शिर्डी, वैजापूर, श्रीरामपूर, राहाता व विविध ठिकाणाहून तालुक्यातून भक्तगण मोठ्या संख्येने आले होते.

श्री क्षेत्र सराला बेट येथे श्रीरामपूर-हरेगाव मार्गे रस्ता होण्यासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाल्याचे आमदार लहू कानडे यांनी सांगितले. तर वैजापूरचे आमदार बोरणारे यांच्या एक कोटी निधीतून गोदावरी नदीवर लवकरच पूल होईल असे त्यांनी जाहीर केले.

Visits: 110 Today: 1 Total: 1105259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *