संगमनेरच्या ‘महाठगा’चा मंत्री विखेंच्या बँकेलाही चुना! आठ जणांसह घातला साडे अडतीस लाखांना गंडा; फसवणुकीचा चौथा गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील अनेक सहकारी बँका व पतसंस्थांनी मोठ्या विश्वासाने ‘गोल्ड व्हॅल्युअर’ (सुवर्ण मूल्यांकर) म्हणून जबाबदारी सोपविलेल्या संगमनेरच्या जगदीश शहाणे या महाठगाने गंडवलेले एकामागून एक प्रकार चव्हाट्यावर येवू लागले आहे. त्यात आता चक्क राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या छत्राखालील प्रवरा सहकारी बँकेचाही समावेश झाला आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत संगमनेर व अकोले तालुक्यातील आठ कर्जदारांना हाताशी धरुन या महाठगाने बँकेच्या संगमनेर शाखेतील सोनेतारण कर्ज प्रकरणांमधून तब्बल 38 लाख 44 हजार 422 रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रवरा सहकारी बँंकेचे शाखाधिकारी सुदाम शेजवळ यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून ते चालू वर्षातील मार्चअखेरपर्यंत सदरचा प्रकार घडला आहे. बँकेच्या संगमनेर शाखेतील सोनेतारण कर्ज प्रकरणांमध्ये तारण ठेवण्यात येणार्या सोन्याचे मूल्यांकन करण्यासाठी इतर बँका व पतसंस्थांप्रमाणेच प्रवरा सहकारी बँकेनेही संगमनेरच्या जगदीश शहाणे याची मूल्यांकर (गोल्ड व्हॅल्युअर) म्हणून नियुक्ती केली होती. सदरील इसम हा या बँकेसह शहरातील अनेक बँका व पतसंस्थांचे काम करीत असल्याने इतर संस्थेतील अधिकार्यांप्रमाणेच या बँकेच्या व्यवस्थापनानेही त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला होता. त्याचाच गैरफायदा घेत त्याने या संस्थेलाही गंडा घातल्याचे आता समोर आले आहे.
मागील वर्षभरात जगदीश शहाणे याने प्रवरा सहकारी बँकेत सोने ‘तारण’ ठेवून कर्ज घेणार्या आठ कर्जदारांना हाताशी धरुन बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असतानाही ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्याच्यावर भरवसा ठेवून बँकेनेही त्यापोटी 38 लाख 44 हजार 422 रुपयांचे कर्ज वितरित केले. मात्र गेल्या काही कालावधीत या महाठगाने अशाचप्रकारे प्रमाणपत्र देवून शहरातील तीन बँकांना ठगविल्याने प्रवरा सहकारी बँकेने आपल्याकडील तारण सोन्याची सत्यता पडताळली असता ‘त्या’ आठही कर्जप्रकरणात तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने याबाबत कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल आहे.
त्यानुसार महाठग जगदीश शहाणे (रा.एकता चौक, मालदाड रोड) याने भानुदास यशवंत ढगे (रा.पिंपळगाव खांड, ता.अकोले), गोरक्ष राधाकृष्ण गाडेकर (रा.मनोली), सुधीर रावसाहेब घुगे (रा.घुलेवाडी), मारुती अण्णासाहेब मंडलिक (रा.रा हीींिं://रा.रा/यतेवाडी फाटा), शरद मारुती पर्बत (रा.ढोलेवाडी), राहुल ज्ञानेश्वर गुरकुले (रा.संगमनेर खुर्द), सारीका सतीश पोटे (रा.घुलेवाडी) व सुशील सुरेश रोहम (रा.निमगाव टेंभी) अशा नऊ जणांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 420, 406, 467, 468, 371, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
संगमनेरातील जगदीश शहाणे हा शहरातील अनेक बँका व पतसंस्थांच्या सुवर्ण मूल्यांकन समितीवर असून आत्तापर्यंत त्याने अशाचप्रकारे कर्जदारांना हाताशी धरुन महाराष्ट्र ग्रामीण बँक, महानगर को-ऑपरेटिव्ह बँक व नामको सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेला लाखो रुपयांना गंडविले आहे. त्यात आता राज्यातील भारदस्त राजकारणी, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या छत्राखालील प्रवरा सहकारी बँकेलाही 38 लाख 44 हजार रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही कालावधीपासून अशाप्रकारे एकामागून ठगीच्या घटना समोर येत असल्याने आणखी किती बँका व पतसंस्थांना या महाठगाने चुना लावला असेल याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे.
संगमनेरचा रहिवासी असलेल्या जगदीश शहाणे या महाठगाने आत्तापर्यंत फसवणूक केलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक, महानगर बँक, नामको सहकारी बँक व आता प्रवरा सहकारी बँक या सर्व संस्था अन्य जिल्ह्यातील अथवा शहरांमधील आहे. त्यावरुन त्याने बाहेरुन आलेल्या बँका व पतसंस्था लक्ष्य केल्याचे दिसत असून यातील काही प्रकरणांमध्ये कर्जदार असलेले आरोपीही तेच ते असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता पुढची बँक कोणती? अशी खुमासदार चर्चा सध्या संगमनेरात सुरू झाली आहे.