छातीरोग तज्ज्ञ डॉ. अमेय देशमुखांनी वाचविले तरुणीचे प्राण! श्वसन नलिकेतील कानाची रिंग वेळीच काढली बाहेर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये श्वसनविकार व छातीरोग तज्ज्ञ डॉ. अमेय देशमुख यांनी तरुणीच्या श्वसन नलिकेत अडकलेली सोन्याच्या धातूची कानातील रिंग दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करुन बाहेर काढली. तरुणीला नवसंजीवनी दिल्याने कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, फुफ्फुसाच्या संसर्गाने आजारी असलेली तरुणी उपचारांसाठी दाखल झाली होती. तिची तब्येत खालावत चालली होती आणि श्वास घेण्यासही त्रास होत होता. मेडिकव्हर हॉस्पिटलने तत्काळ श्वसनविकार आणि छातीरोग तज्ज्ञ डॉ. अमेय अनिल देशमुख यांना संपर्क केला. त्यानंतर त्वरीत डॉ. देशमुख मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. रुग्णाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर सीटी स्कॅन करण्याचे ठरले आणि तपासणीनंतर उजव्या फुफ्फुसामध्ये गोल वस्तू अडकली असल्याचे समजले.

श्वसन नलिकेमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे त्याखालील भागात कफ अडकून न्यूमोनिया झाला होता. हा अडथळा दूर न केल्यास त्याखालील फुफ्फुस खराब होऊन तरुणीच्या जीवास धोका निर्माण झाला असता. अशा परिस्थितीमध्ये डॉ. अमेय अनिल देशमुख यांनी समयसूचकता दाखवत ब्राँकोस्कोपीच्या तपासणीद्वारे श्वसनमार्गातील अडथळा दूर करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन थिएटरमध्ये तरुणीस तात्पुरती भूल देऊन ब्राँकोस्कोपी तपासणी करण्यात आली. उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या श्वसन नलिकेमध्ये अडकलेली सोन्याच्या धातूची कानातील रिंग काढण्यात डॉ. अमेय देशमुख यांना यश आले. रुग्णाचा श्वसनमार्ग पुन्हा खुला झाल्याने न्यूमोनिया कमी होण्यास मदत झाली आणि तरुणीचा जीव वाचला. या तपासणीमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. घनकुटे व औषधीतज्ज्ञ डॉ. सुशांत गिते यांची मोलाची मदत मिळाली.

डॉ. अमेय अनिल देशमुख हे देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक असून येथे पूर्णवेळ कार्यरत आहेत. श्वसनसंस्थेच्या आजारांवर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा असून कोविडच्या काळात अनेक रुग्णांची त्यांनी सेवा केली. दुर्बिणीद्वारे श्वसनसंस्थेमध्ये अडकलेले धान्य, शेंगदाणे, नथ आदी वस्तू काढण्यामध्ये ते निष्णात आहेत. दमा, न्यूमोनिया, घोरण्याची समस्या, टी.बी., श्वसनसंस्थेचे सर्व विकार आदी उपचारांमध्ये ते निष्णात आहेत.

Visits: 156 Today: 1 Total: 1871148

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *