‘सेवा’ रुग्णालयावरुन संगमनेरात पुन्हा राजकीय कलगीतुरा! दोन्ही आमदारांकडून पाठपुराव्याचा दावा; सोशल माध्यमात कार्यकर्तेही भिडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिका निवडणुकीच्या निकालानंतर संगमनेरच्या राजकीय पटलावरुन काहीसा बाजूला झालेला श्रेयवाद पुन्हा रंगमंचावर अवतरला असून यावेळी राष्ट्रीय कामगार विमा योजनेतंर्गत चालवल्या जाणार्या ‘सेवा’ रुग्णालयाच्या मान्यतेवरुन राजकीय कलगीतुरा रंगला आहे. संगमनेरातील मालपाणी उद्योग समूहासह अन्य काही छोट्या-मोठ्या आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचार्यांसाठी केंद्रीय विमा महामंडळाकडून आरोग्य योजना चालविली जाते. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अन्य शहरांमध्ये जावे लागत असल्याने विमाधारकांची मोठी गैरसोय होत होती. त्याअनुषंगाने संगमनेरात योजनेचे रुग्णालय सुरु व्हावे यासाठी विविध पातळ्यांवरुन मागणी होत होती. स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्षही वेधण्यात आले होते. या सर्वांचा परिपाक राज्य विमा महामंडळाने नागपूरमधील बंद पडलेल्या ‘सेवा’ रुग्णालयाचे स्थलांतर करुन ‘ते’ संगमनेरला सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयाने संगमनेर परिसरातील सुमारे दहा हजार विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य सुविधा मिळवण्यासाठीची परवड थांबणार असून स्थानिक पातळीवरच त्यांना विविध खर्चिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. साहजिकच शासनाचा हा निर्णय मोठ्या लोकसंख्येवर प्रभाव टाकणारा असल्याने त्याच्या श्रेयवादावरुन संगमनेरचे राजकारण पुन्हा एकदा तापले असून आमदार अमोल खताळ यांनी 4 फेब्रुवारीच्या तर, आमदार सत्यजित तांबे यांनी 20 सप्टेंबरच्या पत्राचा दाखला देत आपल्याच पाठपुराव्यातून प्रशासकीय निर्णय झाल्याचा दावा केला आहे. काहीशा विश्रांतीनंतर दोन नेत्यांमध्ये पुन्हा सुरु झालेल्या श्रेयवादाच्या राजकीय कलगीतुर्याचे पडसाद सोशल माध्यमातही उमटले असून दोन्हीबाजूच्या समर्थकांकडून एकमेकांवर आसूडं ओढली जात आहेत.

राष्ट्रीय कामगार विमा योजना ही कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सुविधा पुरवणारी देशातील महत्वाची योजना आहे. या योजनेत 21 हजार रुपयांपर्यंत एकत्रित वेतन असलेल्या संघटीत कामगारांना सहभागी होता येते. योजनेचे सदस्यत्व घेणार्या कामगार/कर्मचार्यासह त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना नोकरीच्या पहिल्या दिवसापासून पूर्ण वैद्यकीय सेवा मोफत मिळते. कामगारांना ही सुविधा दोन स्तरावर दिली जाते. त्यात ईएसआयसीची रुग्णालये थेट केंद्र सरकारमार्फत तर, ईएसआयएस रुग्णालये राज्य सरकार चालवते. महाराष्ट्रातील बहुतांशी रुग्णालये ‘महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी’अंतर्गत चालवली जातात.

या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात सामान्य तपासण्या आणि डॉक्टरांचा सल्ला दिला जातो. आंतररुग्ण विभागात रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची सोय असते. हृदय शस्त्रक्रिया, किडनी ट्रान्सप्लांट, कॅन्सर यासारख्या गंभीर आणि खर्चिक आजारांवरही संलग्न खासगी रुग्णालयांद्वारा मोफत उपचार पुरवले जातात. महिला सभासदांसाठी 26 आठवड्यांची प्रसूती रजा, मोफत औषधे आणि आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकेची सुविधाही पुरवण्यात येते. महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत योजनेतील लाभही या रुग्णालयांच्या माध्यमातून मिळतात. राज्यात मुंबईत परळ, वरळी, कांदिवली, मुलुंड, अंधेरी, ठाण्यात वागळे इस्टेट व उल्हासनगर, पुण्यात बिबवेवाडी व चिंचवडसह नाशिक (सातपूर), छत्रपती संभाजीनगर (चिकलठाणा), नागपूर, सोलापूर व कोल्हापूर अशा 15 ठिकाणी या योजनेची रुग्णालये असून त्यात आता संगमनेरचाही समावेश होणार असल्याने लाभार्थी हजारों कामगार/कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना त्याचा लाभ होणार आहे.

यासंदर्भात समोर आलेल्या चर्चेनुसार नागपूर विभागातील महाल आणि न्यू सेक्टर या भागातील राज्य विमा महामंडळाची दोन रुग्णालये लाभार्थी संख्येअभावी बंद स्थितीत आहेत. संगमनेर व शिर्डी परिसरातील योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या पाहता ही दोन्ही रुग्णालये या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ही रुग्णालये तेथून हलवण्यास मोठा विरोध आहे. त्यातही एखाद्या रुग्णालयाचे थेट स्थलांतर हा विषयच चमत्कारीक वाटत असल्याने सध्या नागपूरमध्ये याबाबत संभ्रम आहे. लाभार्थी संख्येअभावी या रुग्णालयांच्या स्थलांतराचा निर्णय झाला तरीही ती जवळच्या म्हणजे नागपूरातीलच सोमवारी पेठ अथवा मॉडेल हॉस्पिटलमध्ये मिळवली जातील असे जाणकारांचे मत आहे, नागपूरच्या रुग्णालय हलविण्याच्या निर्णयाबाबत ठोस माहितीही उपलब्ध झालेली नाही. अशा स्थितीत राज्य विमा महामंडळाचे रुग्णालय संगमनेरात सुरु होत असल्याची चर्चा समोर येवून त्यावरुन राजकीय श्रेयवादही जुंपला आहे.

आमदार अमोल खताळ यांनी 12 मार्चरोजी राज्याच्या आरोग्य विभागाने कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या प्रादेशिक संचालकांना पाठवलेले पत्र समोर करुन त्यातील 4 फेब्रुवारीच्या संदर्भाकडे लक्ष वेधले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मालपाणी उद्योग समूहातील कामगारांशी संवाद साधताना आपण त्यांना रुग्णालयाचा ‘शब्द’ दिल्याचे व तेव्हापासूनच आपण या विषयाचा पाठपुरावा करुन महायुती सरकारकडून हा निर्णय तडीस नेल्याचा आणि त्यातूनच 4 जूनरोजी महामंडळाने निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या पाठपुराव्यातून हजारों कामगार व त्यांच्या कुटुंबियांना खर्चिक आजारात उपचारांचा दिलासा मिळणार असल्याचे समाधान त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांनीही 20 सप्टेंबररोजी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे पत्राद्वारे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. त्यातून त्यांनी नागपूरमधील बंद पडलेल्या विमा सोसायटीच्या रुग्णालयांचा दाखला देत संगमनेर (9 हजार) व शिर्डी (12 हजार) येथील लाभार्थ्यांची मोठी संख्या विचारात घेवून त्यांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय उपचार मिळण्याची सुविधा देणे न्याय ठरेल अशी विनंती केली. त्यांच्या या पत्राचा आधार घेत संगमनेरात सुरु होवू पाहणार्या ‘सेवा’ रुग्णालयाचा निर्णय झाल्याचा दावा करीत त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी हे आपल्या पाठपुराव्याचे यश असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे पालिका निवडणूक निकालानंतर काहीकाळ शहरात शांत असलेला श्रेयवादाचा धूरळा आता पुन्हा उसळू लागला असून त्यातून संगमनेरात राजकीय कलगीतुराही रंगला आहे.

संगमनेर तालुक्यातील हजारों लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवेसाठी भटकंती करावी लागू नये ही आपली प्रामाणिक इच्छा होती. विधानसभा निवडणुकीच्यावेळी मालपाणी उद्योग समूहातील
कामगारांसमोर बोलताना त्यांना रुग्णालयाबाबतचा ‘शब्द’ दिला होता. तेव्हापासूनच आपण या विषयाचा पाठपुरावा सुरु केला होता. गेल्या मार्चमध्येच याबाबत आरोग्यमंत्र्यांनी आदेशही काढले होते, त्यावर आता महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारों नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण होणार असल्याचे खूप समाधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मनापासून धन्यवाद.
– आमदार अमोल खताळ
सदस्य : महाराष्ट्र विधानसभा

आपल्या नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करणे आपले कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने संगमनेरातील राज्य विमा महामंडळाच्या हजारों लाभार्थी कामगार व कर्मचार्यांची वाढती
मागणी आणि गरज लक्षात घेवून संगमनेरात राष्ट्रीय कामगार विमा योजनेचे रुग्णालय सुरु व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला. विमा महामंडळाच्या अधिकार्यांना रुग्णालयाची गरज पटवून दिली. अनेकदा नव्याने यंत्रणा उभारण्याचे निर्णय बारगळतात, त्यामुळे नागपूरातील बंद पडलेल्या दोन रुग्णालयांचा पर्यायही सूचवला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संगमनेरात लवकरच विमा योजनेचे रुग्णालय सुरु होणार आहे. ही केवळ आरोग्य सेवा नसून कष्टकर्यांच्या आयुष्याची सुरक्षा आहे. ‘संगमनेर 2.0’मध्ये नागरी आरोग्याला अधिक महत्त्व दिले गेले आहे, त्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.
– आमदार सत्यजीत तांबे
सदस्य : महाराष्ट्र विधान परिषद

