संचालकांनीच वाटून खाल्ला गरीबांच्या ‘आनंदाचा शिधा’? बोट्यातील ‘धान्य’ भ्रष्टाचाराचे ओघळ; लाभार्थ्यांना वंचित ठेवल्याचा आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बोट्यातील स्वस्तधान्य दुकानातील सेल्समनने पुरवठा विभागातील काही अधिकार्‍यांना हाताशी धरुन ‘ई-पॉस’ मशिनमधील शिल्लक धान्यसाठा गिळल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका लाभार्थ्याच्या तक्रारीवरुन भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाला आणखी ओघळ फुटले आहेत. यावेळी मात्र सेल्समनसह बोटा विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळावरच गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोसायटीच्या नऊ संचालकांनी दिवाळीनिमित्त गोरगरीबांसाठी आलेला शासनाचा ‘आनंदाचा शिधा’ परस्पर वाटून खाल्ल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीसह विद्यमान संचालक मंडळाच्या बरखास्तीची मागणी करण्यात आली आहे. या आरोपाने ‘बोट्यातील धान्य भ्रष्टाचार’ पुन्हा चव्हाट्यावर आला असून पुरवठा विभागातील अधिकारी आपलीच लक्तरे झाकण्यात व्यस्त झाल्याचेही आता दिसत आहे.


गेल्या पंधरवड्यात बोटा येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने चालविण्यात येणार्‍या ‘स्वस्तधान्य’ दुकानातील सेल्समन सौरभ शेळके याने मोठी अफरातफर केल्याचा प्रकार दैनिक नायकने उजेडात आणला होता. गोरगरीबांच्या टाळूवरील लोणी ओरबाडण्याच्या या प्रकरणात पुरवठा विभागातील अधिकार्‍यांची मिलीभगत असल्याचेही त्यावेळी लपून राहिले नव्हते. या प्रकरणाची संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी सखोल चौकशीचे आदेश दिल्यानंतर संगमनेरच्या पुरवठा अधिकार्‍यांनी तेथे जावून पडताळणी केली, मात्र तत्पूर्वी त्यांनीही ‘त्या’ सेल्समनला आगाऊ सूचना देत ‘सेटींग’ करण्यासाठी पूरेसा वेळ दिल्याचेही उघड झाले होते.


मात्र गोरगरीबांच्या वाट्याचे अन्न गिळण्याच्या या प्रकाराबाबत दैनिक नायकने आपली पारदर्शी भूमिका वठवल्याने पुरवठा अधिकार्‍यांसह बोट्याचा भ्रष्टाचारी सेल्समन सौरभ शेळके याला कोणतीही हालचाल करता आली नाही. परिणामी सदरच्या दुकानात ‘ई-पॉस’ मशिन कार्यरत झाल्यापासूनच्या धान्यसाठ्याची मोजदाद केली असता त्यात तब्बल 14 हजार किलो अन्नधान्याची तुट आढळून आली. त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर झाल्यानंतर सदरील स्वस्तधान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यासह तो कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई सुरु झाली. मात्र भ्रष्टाचाराचा हा प्रकार केवळ जानेवारीपासून अथवा बोट्याच्या दुकानापर्यंतच मर्यादीत नसल्याचे आता हळूहळू समोर येत असून तुर्त बोट्याच्याच दुकानातील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण समोर येवू पहात आहे.


याबाबत बोट्यातील रहिवाशी आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याचे लाभार्थी बाळू काळे यांनी संगमनेरच्या तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार बोटा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या 15 संचालकांमधील नऊजणांनी राज्य शासनाच्या आनंदाचा शिधा योजनेतील 45 लाभार्थ्यांच्या वाट्याचा शिधा स्वतःच खाल्ल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या लाभार्थ्यांमध्ये बहुतेक सर्वजण आदिवासी समाजातील गरीब नागरिक असून त्यांच्यासाठी दिवाळीसणासाठी आलेला शिधाच संचालकांनी ओरबाडल्याने त्या गोरगरीबांना वर्षातील सर्वात मोठ्या सणालाही आपल्या मुलाबाळांसाठी गोडधोड अन्न करता आले नाही.


या तक्रारीसोबत संबंधिताने बोट्याच्या स्वस्तधान्य दुकानात 686 लाभार्थी जोडल्याची माहिती देताना दिवाळीतील आनंदाचा शिधा न मिळालेल्या 45 लाभार्थ्यांची सोसायटीच्या सही-शिक्क्यानिशी यादी जोडल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच, जूनमध्ये उघड झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास पुरवठा अधिकार्‍यांकडून झाल्याचे व त्या भ्रष्टाचाराला सोसायटीचे संचालक मंडळच जबाबदार असल्याचा व त्या सर्वांनी घोटाळ्यातील रक्कम वाटून घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय भ्रष्टाचाराचे ओघळ केवळ विद्यमान संचालकांपर्यंत मर्यादीत नसून सन 2016 ते 2021 या कालावधीत असलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


शासनाकडून राज्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशिन बसवण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात ते कार्यान्वीत केल्यानंतर त्यात मागील शिल्लकसाठा नोंदवणे आवश्यक असतानाही पुरवठा अधिकार्‍यांना हाताशी धरुन अनेक दुकानचालकांनी ‘शून्या’पासून सुरुवात केल्याने बोट्यासह अनेक ठिकाणी गोरगरीबांच्या हजारों किलो अन्नधान्याची अशाचप्रकारे लुट झाल्याची दाट शक्यता आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयासह केंद्र सरकारकडेही लवकरच दाद मागितली जाणार आहे, त्यातून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणं म्हणजे काय असतं हे उदाहरण जिवंत होण्याची दाट शक्यता आहे.


देशातील कोणतीही व्यक्ति उपाशीपोटी राहू नये यासाठी 1997 पासून देशात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे. गेल्या 10 वर्षात या कायद्यात अमुलाग्र बदल झाले असून मागील चार वर्षांपासून अंत्योदय व प्राधान्य गटातील कोट्यवधी नागरिकांना शासनाकडून मोफत अन्नधान्याचे वितरण सुरु आहे. तर, राज्य शासनानेही सणासुदीला अंत्योदय कार्डधारकांना शंभर रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरु केली आहे. मात्र आता या दोन्ही योजनांमधून पुरवठा कार्यालयातील अधिकारी, सेवा सोसायटीचे संचालक व दुकानदार ही साखळी संगनमताने गोरगरीबांच्या वाट्याचे अन्नधान्य व आंनदाचा शिधा लुटीत असल्याचे उघड होवू लागले असून या प्रकरणाची त्रयस्त यंत्रणेमार्फत सखोल चौकशी होवून दोषी आढळणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *