घारगाव ते पिंपळदरी रस्त्याची झाली दयनीय अवस्था डांबरीकरण करण्याची मागणी; अन्यथा उपोषणाचा दिला इशारा
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव ते पिंपळदरी (ता. अकोले) या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी केली आहे. डांबरीकरणासाठी त्वरीत निधी मंजूर न झाल्यास १ डिसेंबरपासून संबंधित गावांतील ग्रामस्थांच्यावतीने प्रतिनिधी म्हणून घारगाव-पिंपळदरी रस्त्यालगत घारगाव येथे आमरण उपोषण करणार असल्याचे भोसले यांनी शासनाला केलेल्या पत्रव्यवहारात म्हटले आहे.
घारगाव ते पिंपळदरी हा रस्ता अहमदनगर जिल्ह्यातील २३ क्रमांकाचा प्रमुख जिल्हामार्ग आहे. या रस्त्याला घारगाव-बोरबन-कोठे-पिंपळदरी या गावांसह आदिवासी वाड्या-वस्त्या जोडल्या गेल्या आहेत. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम १५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यांनतर फक्त खड्डे बुजविण्यात आले. मात्र, आज रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने खड्डे बुजविणेही शक्य नाही. त्यासाठी डांबरीकरण करणे हाच एकमेव मार्ग आहे. खड्डे पडल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.
सदर गावांमधून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी घारगाव, आळेफाटा, संगमनेर येथे दररोज जातात. शेतकरी वर्गाला शेतमालाची विक्री करण्यासाठी आळेफाटा, संगमनेर येथे जावे लागते. रुग्णांना तत्काळ घारगाव, आळेफाटा, संगमनेर येथे हलविण्यासाठी खड्ड्यांमुळे अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या आदिवासी बांधवांचे कुलदैवत येडूआई माता देवस्थान पिंपळदरी येथे आहे. राज्यातून दरवर्षी लाखो भाविक यात्रेसाठी याठिकाणी येत असतात. तरीही या रस्त्याकडे संबधित प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संबधित ग्रामस्थांच्या आरोग्याचा, सोयी-सुविधांचा विचार करता या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तत्काळ मंजुरी मिळावी. अन्यथा घारगाव -पिंपळदरी रस्त्यालगत संबधित गावांच्यावतीने एक प्रतिनिधी म्हणून १ डिसेंबर, २०२३ पासून आमरण उपोषण करणार असल्याचे भोसले यांनी पत्रात म्हटले आहे. सदरचे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविण्यात आले आहे.