कुठलेही नियोजन न करता साईभक्तांनी शिर्डीत येऊ नये ः बगाटे

कुठलेही नियोजन न करता साईभक्तांनी शिर्डीत येऊ नये ः बगाटे
दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होत असल्याने साईबाबा संस्थानचे आवाहन
नायक वृत्तसेवा, शिर्डी
लॉकडाऊननंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मात्र आता गुरुवारनंतर रविवारीही (ता.22) शिर्डी येथे दर्शनासाठी साईभक्तांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग न करता शिर्डीत येणार्‍या भक्तांची गैरसोय होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचाही धोका आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊ नका, असे आवाहनच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले आहे.

कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारच्या आदेशानुसार 17 मार्चला शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर साईभक्तांसाठी बंद करण्यात आले होते. तब्बल आठ महिन्यानंतर हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी दर्शनाच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच दर्शन सुलभ व सुखद व्हावे, यासाठी भक्तांना ऑनलाईन व मंदिर परिसरात काउंटरवर पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु दर्शनासाठी घालून देण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साईभक्त हे शिर्डीमध्ये आता येऊ लागले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊच नका, असे आवाहन संस्थानने केले आहे.

गेल्या गुरुवारी व रविवारी शिर्डीत दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे, असे सांगत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे म्हणाले, साईभक्तांना विनंती आहे की त्यांनी दर्शनाची वेळ व तारीख निश्चित न करता शिर्डीत दर्शनासाठी येऊ नये. जर दर्शनाची वेळ व तारीख निश्चित न करता ते शिर्डीत दर्शनासाठी आले तर त्यांची गैरसोय होईल, तसेच गर्दीही वाढेल. गर्दी वाढल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन दुसरी लाट येऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊ नये.

तर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले, शिर्डी येथे शनिवार व रविवार साईभक्तांची दर्शनासाठी जास्त गर्दी होते. येथून मागचा ट्रेंड पाहता रविवारी सकाळी ते दुपारी तीन पर्यंत मंदिर परिसरात भक्तांची चांगलीच गर्दी असते. तीन नंतर ही गर्दी कमी होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात येणार्‍या साईभक्तांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *