दिवाळीच्या पाच दिवसांतच तालुक्याच्या रुग्णवाढीची गती झाली दुप्पट! नियमांकडे दुर्लक्ष करुन दुकानदारी करणार्‍यांसह ग्राहकांनाही होत आहे कोविडचे संक्रमण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

दिवाळीच्या काळात कोविडकडे दुर्लक्ष करुन ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये झालेल्या प्रचंड गर्दीचे दुष्परिणाम आता समोर येवू लागले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून संगमनेर तालुक्याचा कोविड आलेख चढणीला लागला आहे. उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत केवळ सामान्य नागरिक बाधित होत हाते, दिवाळीच्या गर्दीने मात्र ग्राहक आणि दुकानदार अशा दोहींना झपाट्यात घेतल्याचे चित्र दिसू लागले असून शुक्रवारी शहरातील एका ‘नामचीन’ सुवर्णकारासह अन्य काही आस्थापनामधील कर्मचार्‍यांची स्राव चाचणी सकारात्मक आल्याने दिवाळीपर्यंत नियंत्रणात असणारी सरासरी गेल्या पाचच दिवसांत दुपटीने वाढली आहे. त्यामुळे येणारा काळ कोविड रुग्णांची संख्या भरीस नेणारा ठरणार हे निश्चित झाले आहे. शुक्रवारी ग्रामीण भागासह शहरी रुग्णवाढीची गतीही अधिक वेगावान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तालुक्याने बाधितांचे 48 वे शतक ओलांडीत 4 हजार 842 रुग्णसंख्या गाठली आहे. या महिन्यातील 20 दिवसांत आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येतील तब्बल 40 टक्के रुग्ण केवळ पाच दिवसांत समोर आले आहेत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

कोविडच्या सावटातही मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात आणि त्यातून संक्रमणात भर पडते असा पूर्वानुभव असलेल्या संगमनेरात दिवाळीच्या निमित्ताने परिस्थिती बिघडू शकते याचा अंदाज बांधला जात होता. तो आता सत्यात उतरत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेतील बहुतेक तालुक्यांसह आसपासच्या जिल्ह्यातील तालुक्यांतील ग्राहकांच्या पसंदीचे ठिकाण म्हणून संगमनेरच्या बाजारपेठेचा मोठा लौकीक आहे. सुवर्ण अलंकार, कापड, तेल-तुप व भुसार मालाची बाजारपेठ असलेल्या संगमनेरात दिवाळीच्या निमित्ताने होणारी उलाढाल संगमनेरच्या व्यापार समृद्धीची झलक दाखवणारीच ठरते.

यावर्षी मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून बाजारपेठांमध्ये गर्दी न करण्याचे वारंवार आवाहन झाल्याने शहरी भागातील बहुतेक ग्राहकांनी दिवाळीची गर्दी सुरु होण्यापूर्वीच खरेदी उरकली. मात्र ग्रामीण भागातील अर्थकारण दूध संस्था व साखर कारखान्यांवर अधिक अवलंबून असल्याने या संस्थांकडून पैसे मिळाल्याशिवाय बाजारपेठा फुलत नाही असा आजवरचा इतिहास आहे. यंदाही नेहमीप्रमाणे दिवाळीच्या काही दिवस अगोदर नागरिकांच्या हाती पैसा आल्याने दिवाळी खरेदीच्या शेवटच्या चार दिवसांत संगमनेरच्या बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे दृष्य दिसत होते. त्यामुळे दिवाळीनंतर कोविडच्या संसर्गात मोठी वाढ होवून परिस्थिती पुन्हा एकदा अनियंत्रित होण्यासारखी अवस्था निर्माण होईल असा कयास जाणकारांनी बांधला होता. तो तंतोतंत खरा ठरत असल्याचे गेल्या पाच दिवसांतील आकडेमोडीवरुन स्पष्टपणे दिसत आहे. दिवाळीपूर्वी 1 ते 15 नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत तालुक्यात दररोज सरासरी 22.47 या गतीने 337 रुग्ण समोर आले. या कालावधीत शहरी रुग्णगती सरासरी 5.73 तर ग्रामीण रुग्णगती 16.73 होती. मात्र दिवाळीनंतरच्या पहिल्या पाच दिवसांतच म्हणजे 16 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत तालुक्याच्या सरासरीत तब्बल दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत दररोज सरासरी 43.4 या गतीने तालुक्यात तब्बल 217 रुग्णांची भर पडली.

या पाच दिवसांत केवळ ग्रामीणभागच नव्हेतर शहरी रुग्णसंख्याही दुप्पट वेगाने पुढे सरकल्याचे दिसून आले. मागील पाच दिवसांत शहरात सरासरी 11.6 रुग्ण दररोज या वेगाने 58 तर ग्रामीणभागात दररोज सरासरी 31.8 या वेगाने 159 रुग्णसमोर आले आहेत. यावरुन संगमनेरकरांना दिवाळी भोवली असल्याचे स्पष्ट झाले असून रुग्णवाढीचा हा सिलसिला संगमनेर तालुक्याला कोठे नवून पोहोचवील याचा अंदाज बांधणे आता अवघड होवून बसले आहे. शुक्रवारी बाधित आढळलेल्या शहरातील ‘त्या’ नामचीन सुवर्णकाराची पेढी मोठी आहे. दिवाळीच्या काळात त्यांच्या दालनात दररोज विक्रमी गर्दी झाल्याने त्याचे दुष्परिणामही समोर येणार आहेत. यासोबतच काही छोट्या-मोठ्या आस्थापनांमधील कर्मचारीही बाधित झाल्याचे समोर आल्याने येणार्‍या काळात तालुक्याच्या एकूण संक्रमणात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी शासकीय प्रयोगशाळेकडून दोन, खासगी प्रयोगशाळेकडून 12 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील पंधरा तर ग्रामीणभागातील 31 रुग्णांचा समावेश आहे. शहरीभागातून समोर आलेल्या रुग्णांमध्ये वकील कॉलनीतील 28 वर्षीय तरुण, स्वामी समर्थ नगरमधील 43 वर्षीय महिला, मोमिनपुरा भागातील 48 व 21 वर्षीय महिला, बालाजी नगरमधील 20 वर्षीय तरुण, रंगारगल्लीतील 40 वर्षीय महिला, नेहरु चौकातील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, इंदिरा नगरमधील 56 वर्षीय महिला, शिवाजी नगरमधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जनता नगरमधील 75 वर्षीय महिला, विजयनगर मधील 55 वर्षीय महिला व केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 68, 60 व 45 वर्षीय दोघींना कोविडची लागण झाली आहे.

त्यासोबतच तालुक्यातील कनोली येथील 52 वर्षीय इसमासह 18 वर्षीय तरुणी, खळी येथील 65, 55 व 33 वर्षीय महिलेसह 40 वर्षीय तरुण व सात वर्षीय मुलगा, निमगाव खुर्दमधील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय तरुण, 65 वर्षीय महिला व 15 वर्षीय तरुणी, सावरचोळ येथील 40 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 28 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 59 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 26 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 35 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 25 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 38 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 49 वर्षीय इसम, शिवारातील रहाणेमळा येथील 33 व 21 वर्षीय तरुण व गोल्डन सिटीतील 40 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुण. निमोणमधील 56 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 42 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण व 14 वर्षीय मुलगा, साकूरमधील 32 वर्षीय तरुण, शेडगावमधील 40 वर्षीय तरुण, कोंची येथील 30 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 50 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 46 जणांची भर पडल्याने तालुका 48 वे शतक ओलांडून 4 हजार 842 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

जिल्ह्यातील सर्वाधीक समृद्ध बाजारपेठ असलेल्या संगमनेरात दिवाळीच्या निमित्ताने मोठी गर्दी होणार हे निश्चित होते. त्यादृष्टीने शासनाकडून मार्गदर्शक सूचनाही प्रसारित झाल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांनी आरोग्यापेक्षा दिवाळी खरेदीला अधिक महत्त्व दिल्याने व त्यासाठी नियमांची पायमल्ली करीत खरेदीचा मनमुराद आनंद लुटल्याने त्याचा दुष्परिणाम आता समोर यायला सुरुवात झाली असून अवघ्या पाच दिवसांत तालुक्याच्या रुग्णगतीत तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. ही गोष्ट शासन, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसाठी अत्यंत चिंताजनक आहे.

Visits: 91 Today: 1 Total: 1109226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *