बन्सी महाराजांचे कार्य वारकरी सांप्रदायासाठी प्रेरणादायी ः भास्करगिरी महाराज
बन्सी महाराजांचे कार्य वारकरी सांप्रदायासाठी प्रेरणादायी ः भास्करगिरी महाराज
नेवासा येथील बन्सी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता
नायक वृत्तसेवा, नेवासा
श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते बन्सी महाराज तांबे महाराजांची पुण्यतिथी शुक्रवारी (ता.6) साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सामाजिक अंतराचे पालन करत झालेल्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपिठाचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते बन्सी महाराजांचे कार्य वारकरी सांप्रदायासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर देवस्थानचे मार्गदर्शक व विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख व विश्वस्त तथा माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले. पुण्यतिथीनिमित्त गुरुवर्य बन्सी बाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

याप्रसंगी झालेल्या काल्याच्या कीर्तनात बोलताना भास्करगिरी महाराज म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराची निर्मिती बन्सी महाराजांनी केली. त्यांनी देखील वारकरी सांप्रदायासाठी मोठे कार्य उभे केले असून त्यांचे कार्य प्रत्येक भक्ताला स्फूर्ती व प्रेरणा देणारे आहे. संत महिमा विषद करताना ते म्हणाले, संत हे जगाला दिशा देण्याचे काम करतात. चरित्र महान असून संत चरित्रातून मनुष्याला शिकायला मिळते, संत चरित्र हे साधकाच्या जीवनाचे होकायंत्र आहे, व्यवस्था व अवस्था आम्हाला संतांनी शिकवली असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. काल्याच्या दहीहंडीचे पूजन करुन मीराबाई महाराज मिरीकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येऊन साध्या पद्धतीने पार पडलेल्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

यावेळी संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक, रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे, भिकाजी जंगले, नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, कृष्णा महाराज हारदे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष रामनाथ महाराज पवार, कृष्णाजी खरड, डॉ.अशोक शिंदे, विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, भिकाजी पिसोटे, दिलीप मोटे, संतसेवक बदाम महाराज पठाडे, संदीप आढाव, गोरख भराट यांच्यासह महाराज मंडळी व वारकरी उपस्थित होते.

