डिजिटल काव्य संमेलन उपक्रम शिक्षण विभागासाठी पथदर्शी ः विखे
डिजिटल काव्य संमेलन उपक्रम शिक्षण विभागासाठी पथदर्शी ः विखे
राहाता व कोपरगाव तालुका शिक्षण विभागाकडून ‘गोदाप्रवरा काव्यधारा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
नायक वृत्तसेवा, राहाता
चिमुकल्या नवोदित कवींच्या कवितांचा ‘गोदाप्रवरा काव्यधारा’ हा काव्यसंग्रह सामाजिक स्थितीचे सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण व आकलन करणारा आहे. नवोदित कवींची कल्पनाशक्ती ही सामाजिक भान व व्यथा शोधणारी असल्याचे यातून सिद्ध होत आहे. कवींच्या मनातील ही कल्पकता व्यक्त व्हावी याकरिता राहाता व कोपरगाव तालुका शिक्षण विभागाच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात नवोदित विद्यार्थी कवींसाठी घेतलेले डिजिटल काव्य संमेलन हा उपक्रम राज्यातील शिक्षण विभागासाठी आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण व पथदर्शी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले आहे.
राहाता व कोपरगाव तालुका शिक्षण विभागाच्यावतीने नवोदित कवींच्या गोदाप्रवरा काव्यधारा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, राहाता पंचायत समितीच्या सभापती मंदा तांबे, उपसभापती ओमेश जपे, कोपरगावच्या सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य कविता लहारे, श्याम माळी, साहित्यिक कैलास दौंड, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब म्हस्के, संतोष ब्राह्मणे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, कोपरगावचे गटविकास अधिकारी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना आमदार विखे म्हणाले, शाळा बंद असताना राहाता व कोपरगाव तालुका शिक्षण विभागाने डिजिटल काव्य संमेलन यशस्वीपणे संपन्न करून दाखवले आहे. डिजिटल काव्य संमेलन हा एक आगळावेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असा राज्यातील एकमेव पहिलाच उपक्रम आहे. शालेय विद्यार्थ्यांनी अर्थात या नवोदित कवींनी सामाजिक स्थितीचे सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण व आकलन करून आपल्या कल्पनांद्वारे कवितांची निर्मिती केली आहे. गोदाप्रवरा काव्यधारा हा काव्यसंग्रह म्हणजे सकारात्मक भावनांचं प्रतिबिंब दर्शविणारा एक महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह ठरणार आहे. डिजिटल काव्यसंमेलन ही नवीन संकल्पना होती. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा आकाशाला गवसणी घालू शकतो हे डिजिटल काव्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थी व शिक्षकांनी सिद्ध करून दाखवले आहे.
शाळा बंद राहतील व आपल्याला ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागेल असे स्वप्नातही वाटत नव्हते किंवा आपण कधी त्याची कल्पनाही केली नव्हती. मात्र परिस्थितीला सामोरे जाताना आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत शिक्षक व विद्यार्थ्यांनी नकारात्मक वातावरणात स्वतःची सकारात्मकता शोधून या काव्यसंग्रहाची निर्मिती केली ही अतिशय अभिनंदनीय आहे. घराघरात असणार्या देवघराप्रमाणेच घरात पुस्तकांची सुद्धा मंदिरे असावीत हे मंदिर आपल्या मुलांना भविष्यात आत्मनिर्भर करू शकतील असा विश्वासही यावेळी त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे म्हणाल्या, सासर आणि माहेर एकत्रित संगम या गोदाप्रवरा काव्यसंग्रहाच्या माध्यमातून मला अनुभवयास मिळाला. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व परिस्थितीचे भान ठेऊन विविध विषयांवर कविता केल्या आहेत. डिजिटल काव्य संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संपादित केलेले हे यश आणि हा काव्यसंग्रह राहाता तालुका आणि अहमदनगर जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालणारा आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, छंदाला शिक्षकांनी प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या आवडीचं व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल राहाता व कोपरगाव तालुका शिक्षण विभागाला त्यांनी धन्यवाद दिले. याप्रसंगी जिल्हा शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे व साहित्यिक कैलास दौंड यांनी मनोगत व्यक्त केले. नवोदित कवींना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांनी केले तर आभार जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी मानले.
युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. प्रथम पारितोषिक सेजल राठे, द्वितीय ईश्वरी जगदाळे तर तृतीय कोमल शिंदे या विद्यार्थिनींना मिळाले.