नेवाशामध्ये ग्रामपंचायतसाठी गडाख-मुरकुटे गट भिडणार

नायक वृत्तसेवा, नेवासा
कोरोनातील टाळेबंदीनंतर प्रथमच निवडणुका होत आहेत. नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या जानेवारी महिन्यात होत आहेत. त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाली असून, गावागावांत राजकीय फड रंगू लागले आहेत.


नेवासा तालुक्यातील 144 ग्रामपंचायतपैकी 90 टक्के ग्रामपंचायतीवर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व असून होणार्‍या निवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहील यासाठी गडाख गट सक्रिय राहील. मात्र तालुक्याच्या राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गट देखील निवडणुकीच्या मैदानात सक्रिय राहतील. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता धूसरच आहे. दरम्यान, तालुक्यात राष्ट्रवादीची परिस्थिती निश्चितच मुरकुटेंच्या ‘एकला चलो’रे मुळे निष्ठावान व नव्यांचेच दोन गट पडलेल्या भाजपपेक्षा चांगली आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्याने तालुक्यात शिवसेनेचा गडाख गट, राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग अभंग, काशिनाथ नवले हे महाआघाडीतील घटक पक्षांनाही बरोबर घेऊन समन्वयाने सक्रिय आहेत. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे सक्रिय असले तरी ते या निवडणुकीत एकाकी पडलेले दिसतात. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते सक्रिय असले तरी गावपातळीवर ते पक्षविरहित एकमेकांना सहकार्य करतील असे दिसते. त्यामुळे तालुक्यात गडाख मुरकुटे अशीच लढत होईल असे दिसते. अनेक गावात गडाख यांच्याच दोन्ही गटांत तर कुकाणे, भेंडे बुद्रुक येथे माजी आमदार चंद्रशेखर पाटील यांच्याच दोन गटात मैत्रीपूर्ण लढती होण्याचे चिन्हे आहेत. दरम्यान गडाख हे मुरकुटे यांना देवगाव तर मुरकुटे हे गडाखांना सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर कसे आव्हान उभे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visits: 148 Today: 1 Total: 1880413

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *