पुणतांब्यात सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी रिपब्लिकनचे उपोषण सरपंच डॉ. धनंजय धनवटेंच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पुणतांबा ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी (ता.1) सार्वजनिक मुतारी व सुलभ शौचालय मागणीसाठी रिपब्लिकन पार्टीच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
रिपब्लिकन पार्टीच्यावतीने गौतम थोरात, शंकर शेलार, विकास मेहरे, किशोर वहाडणे, अप्पासाहेब इंगळे, रावसाहेब थोरात यांच्यावतीने उपोषण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, चार बँका, दोन शाळा, भाजी मंडई, सोसायट्या, टपरीधारक व दुकानदार, ग्रामस्थ यांच्यासाठी गजबजलेल्या ठिकाणी सार्वजनिक मुतारीची सोय नाही. त्यामुळे गावातील व बाहेरगावावरून बँकेत येणार्या नागरिकांची, महिला वर्गाची गैरसोय होत आहे. सार्वजनिक शौचालय व मुतारीची मागणी एक वर्षापासून करत आहोत यासंदर्भात निवेदन दिलेले आहे. यासंदर्भात ग्रामसभेमध्ये ठराव सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु तीन महिने उलटून गेले तरी अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नव्हती. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे उपोषणकर्ते म्हणाले.
या उपोषणाला सुहास वहाडणे, सुभाष कुलकर्णी, बाबासाहेब चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, सुभाष वहाडणे, गणेश बनकर, प्रणील शिंदे, सुधाकर जाधव, अशोक धनवटे, बाप्पा वाघ आदिंनी पाठिंबा दर्शवला होता. दुपारी एक वाजता ग्रामविकास अधिकारी प्रमोद कानडे व सरपंच डॉ. धनवटे यांनी दहा पंधरा दिवसांत सुलभ शौचालय व मुतारी बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.