श्रीरामपूरच्या शेतकर्‍याने सरकारची मदत नाकारली; मुख्यमंत्र्यांनाच पाठविला धनादेश

श्रीरामपूरच्या शेतकर्‍याने सरकारची मदत नाकारली; मुख्यमंत्र्यांनाच पाठविला धनादेश
खसखस व गांजा लागवडीची मागितली परवानगी; नायब तहसीलदारांना दिले निवेदन
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केली आहे, असा आरोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावानेच दहा हजार रुपयांचा धनादेश श्रीरामपूर येथील नीलेश शेडगे या शेतकर्‍याने प्रशासनाला दिला आहे. हा धनादेश मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात यावा, अशी विनंतीही या शेतकर्‍याने केली आहे. सरकारने आम्हांला खसखस व गांजा लागवडीची परवानगी दिल्यास भविष्यात शेतकरी कधीही सरकारकडे मदतीची याचना करणार नाही, असेही या शेतकर्‍याने म्हंटले आहे.

दरम्यान, या शेतकर्‍याने कॅनरा बँकेच्या धनादेशासह एक निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यासाठी श्रीरामपूर तालुका प्रशासनला दिले आहे. हे निवेदन व धनादेश नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी तहसीलदारांच्या वतीने स्वीकारले आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यातच हेक्टरी दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या घोषणेनंतर विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच श्रीरामपूर येथील शेतकरी नीलेश शेडगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी त्यांच्या नावाने दहा हजारांचा धनादेश प्रशासनाला देत अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

शेडगे हे शेतकरी संघटनेशी संबंधित असून त्यांनी एक निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, ‘सरकारने शेतकर्‍यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करून शेतकर्‍यांची थट्टाच केली आहे. सरकारची मदत ही तुटपुंजी असून त्यातून कोणताही आधार मिळणार नाही. या मदतीचा आपण निषेध करत आहोत. त्यामुळे सरकारला दहा हजार रुपयांचा महसूल दिला. शेतकर्‍यांना जर गांजा आणि खसखस पिकविण्याची परवानगी दिली तर सरकारी मदतीची गरज पडणार नाही. त्यातून ते सक्षम होतील, असे शेडगे यांनी स्पष्ट केले आहे.’

Visits: 110 Today: 1 Total: 1570460

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *