विधवा महिलेचा विनयभंग करीत जातीवाचक शिवीगाळ! संगमनेरच्या राजवाड्यातील प्रकार; चिमुरड्या मुलीलाही अमानुष फरफटले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
घराजवळील देवळाच्या प्रांगणात खेळणार्या चिमुरड्या मुलीचा द्वेष करीत तिच्या केसांना पकडून अतिशय निर्दयीपणाने तिला फरफटत घरी नेवून सोडण्याची आणि त्याचा जाब विचारणार्या मुलीच्या विधवा आईला जातीवाचक शब्दात शिवीगाळ करीत तिचा मानभंग करण्याची घटना समोर आली आहे. गेल्या गुरुवारी (ता.23) घडलेल्या या धक्कादायक प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरुन संगमनेरच्या कसाईवाड्यात राहणार्या एका कसायाविरोधात विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून विधवा महिला आणि तिच्या लहान मुलीला विकृत मानसिकतेतून त्रास देणार्या कसायाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार गेल्या गुरुवारी (ता.23) सायंकाळी सहाच्या सुमारास कमल पेट्रोल पंपाजवळील राजवाडा (मोगलपूरा) परिसरात घडला. या परिसरात राहणार्या एका 23 वर्षीय विधवा महिलेने याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सदर महिलेचा विवाह 2017 साली झाला होता. लग्नानंतर त्यांना कन्यारत्नही प्राप्त झाले. दरम्यानच्या काळात तीन वर्षांपूर्वी (2022) सदरील महिलेच्या पतीने आत्महत्या केली. या घटनेनंतर दोनवर्ष सासु-सासर्यांसोबत राहणारी सदरील महिला त्यांनी घर बदलून घुलेवाडी गाठल्याने एकटीच आपल्या मुलीसह परिसरात भाड्याने खोली घेवून रहाते.

या महिलेच्या घराजवळच राहणारा एक कसाई नेहमीच तिला त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद असून गेल्या गुरुवारी (ता.23) सदर महिलेची चिमुरडी मुलगी घराजवळच असलेल्या लक्ष्मीआई मंदिराच्या प्रांगणात खेळत होती. सायंकाळी सहाच्या सुमारास तोंड ओळख असलेला सदरचा कसाई तेथे आला आणि त्याने अतिशय अमानुषपणे मंदिराच्या प्रांगणात खेळणार्या ‘त्या’ चिमुरडीचे केस पकडून तिला फरफटत तक्रारदार महिलेच्या घराकडे घेवून गेला आणि घरात पाहून ‘ये ***, ये तेरी बच्ची को तेरे घर में संभाल, बाहर मत छोड’ असे मोठमोठ्याने ओरडू लागला.

त्याच्या आवाजाने पीडित महिला घराबाहेर आली असता आपल्या चिमुरडीचे केस ओढल्याचे पाहून तिने आरोपीला तसे करण्यामागील कारण विचारले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी मात्र त्याने जातीवाचक शब्दांचा वापर करीत संघर्षाचे जीवन जगून आपल्या मुलीचा सांभाळ करणार्या त्या विधवेचा मानभंग करीत अतिशय अश्लिल आणि शिवराळ भाषेचा वापर करुन आणि त्यानंतर अश्लिल कृती करुन तिचा विनयभंग केला. या प्रकाराने सदरील महिला अस्वस्थ झाली आणि रडू लागली.

रोजच सुरु असलेल्या या घाणेरड्या प्रकारात आता आपल्या लहान मुलीलाही त्रास देण्यास सुरुवात झाल्याने भविष्यातील धोका लक्षात घेत पीडित महिलेने हिम्मत करुन घटनेच्या तिसर्या दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी तिने आपल्यासोबत घडत असलेल्या नियमित प्रकारांसह गुरुवारी चिमुरड्या मुलीसोबत आरोपीने केलेले अमानुष कृत्यही पोलिसांना सांगितले. त्यावरुन पोलिसांनी कसाईवाड्यात राहणार्या व सदरील महिलेची तोंड ओळख असलेल्या अज्ञात कसायाविरोधात शिवीगाळ, दमबाजी करण्यासह विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अॅट्रोसिटी) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरातील बेकायदा गोवंश कत्तलखाने आणि त्यातून मिळणार्या प्रचंड पैशांवर पोसलेला माज ठळकपणे समोर आला असून लहान मुलीला अमानुष वागणूक देण्याच्या प्रकाराने संताप व्यक्त होवू लागला आहे.

एकीकडे महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचार प्रकरणांनी रोज राळ उठत असताना दुसरीकडे परिसरात राहणार्या एका विकृत कसायाकडून दररोज होणारा मानसिक छळ आणि चक्क लहानशा मुलीला अमानुष वागणूक दिल्यावरुन अवघ्या 23 वर्षाच्या विधवा महिलेने तक्रार दाखल करुन आठवडा उलटला असूनही संगमनेर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील पीडितेला आरोपीचे नाव माहिती नाही, मात्र तिने त्याचा मोबाईल क्रमांक तक्रारीत नमूद केला आहे. त्या उपरांतही पोलीस मात्र अद्यापही आरोपी अज्ञात असल्याचेच सांगत असल्याने संगमनेर पोलिसांनी निष्क्रियतेचा कळस गाठल्याचे धडधडीत वास्तवही समोर आले आहे.

