ऐतिहासिक! ‘वक्फ’च्या विळख्यातून कान्होजीबाबांची जमीन सुटली! प्रांताधिकार्यांचा ऐतिहासिक निर्णय; वहीवाटीसाठी मात्र न्यायालयात जाण्याचे निर्देश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सेवेकरी म्हणून कागदोपत्री भोगवटादार म्हणून नोंद असताना देवस्थान इनामी जमिनीचे बेकायदा बक्षीसपत्र करुन त्यावर वारस नोंदी झाल्याने ‘वक्फ’ करण्यात आलेल्या सुकेवाडीच्या कान्होजी देव उर्फ कानिफनाथ देवस्थानाच्या 22 एकर 35 गुंठे जमिनीचा ऐतिहासिक निर्णय समोर आला आहे. याबाबत सुकेवाडीसह घुलेवाडीच्या ग्रामस्थांनी देवस्थानच्या वतीने संगमनेरच्या उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकार्यांकडे दाद मागितली होती. त्यावर प्रतिवादी भोगवटादारांनी सदरची मिळकत ‘कान्होजीमळा कानिफनाथ कबर’ या नावाने वक्फ मालमत्ता असल्याचे व त्यावरील कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार वक्फ बोर्ड अथवा वक्फ ट्रायब्युनल यांनाच असल्याचा दावा केला होता. दोन्ही बाजूचे युक्तिवाद, सादर झालेली जुनी कागदपत्रे आणि महसूल नोंदी यांचे अवलोकन करीत संगमनेरचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी सदरची मिळकत अहस्तांतरणीय असताना त्याचे बेकायदा हस्तांतरण झाल्याचा निष्कर्ष नोंदवताना या जमिनींच्या सातबारा उतारार्यावरील वारसा नोंदी हटवून त्यावर ‘श्री कान्होबा देव’ अशी नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. देशात वक्फ सुधारणा कायदा लागू झाला त्याच दिवशी हा निर्णय समोर आल्याने तो ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात कानिफनाथ देवस्थानच्यावतीने विकास शेटे यांच्यासह 117 ग्रामस्थांनी संगमनेरच्या उपविभागीय दंडाधिकार्यांकडे अॅड.अरविंद गणपुले यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. त्यात मुनीरभाई चंदुलाल फकीर शेख, जिनतबी चंदुलाल फकीर शेख, रोशनबी नजीरभाई फकीर शेख, जाकीर नजीरभाई फकीर शेख, शाहीद नजीरभाई फकीर शेख, सायराबानो शब्बीर कादरी, रजीया अन्वर सय्यद, सलिमाबी बशीर शेख फकीर, अजीज बशीर शेख फकीर, फरीद बशीर शेख फकीर, मन्सूरभाई चंदुलाल फकीर शेख (सर्व रा.घुलेवाडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

श्री कान्होजी देव उर्फ कानिफनाथ देवस्थानच्या वतीने सुकेवाडी व घुलेवाडी हद्दितील 22 एकर 35 गुंठे जमीन देवस्थान इनाम वर्ग तीनच्या अंतर्गत
असल्याचा दावा करण्यात आला होता. सन 1861 पासून सदर देवस्थानात सेवेकरी म्हणून चिरागअली व अहमदशहा फकीर यांची नेमणूक केली गेली होती. त्याप्रमाणे सदर जमिनीचे वहीवाटदार म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा गुल्लुभाई चिरागअली यांची नोंद झाली. गुल्लुभाईच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी लालबी यांनी 1953 साली सदरचे क्षेत्र बेगुभाई फकीर शेख यांच्या नावे बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरीत केले व त्यांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून या मिळकतीवर झीनतबी, बशीरभाई, मन्सूरभाई, रोशनबी, जकीर, शाहीद, सायराबानु व रजीया यांची वहिवाटदार म्हणून नोंद झाली. सदरची मिळकत देवस्थान इनाम वर्ग तीनची असून ती अहस्तांतरणीय असल्याने करण्यात आलेल्या वारसा नोंदी बेकायदा असल्याने त्या रद्द करुन सदरील मालमत्तेच्या सातबारा उतार्यावर ‘श्री कान्होजी देवस्थान’ अशी नोंद करण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यावर प्रतिवादी भोगवटादार मुनीरभाई चंदुलाल शेख यांनी सदरचे देवस्थान कानिफनाथ उर्फ कान्होबा देवस्थान नसून ते ‘कान्होबामळा कानिफनाथ कबर’ या नावाने वक्फ संस्था असून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदीसह 31 जुलै 2006 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या वक्फ यादीत त्याची नोंद असल्याचा दावा केला. या मिळकतीचे आपण मुतावल्ली असून वादींना त्या संबंधी कोणताही हक्क सांगण्याचा अधिकार नाही. तसेच, सदरची मिळकत वक्फ आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘वक्फ ट्रायब्युनल’ यांनाच असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकार्यांना प्राप्त होत नसल्याचा दावा केला होता. या प्रकरणात घुलेवाडी ग्रामस्थांनीही सदरची मिळकत कान्होबा देव उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या इनामाची असल्याचे सांगत मालमत्तेच्या मूळ सनदीनुसार चिरागअली यांना केवळ सेवेकरी म्हणून नेमल्याची नोंद असल्याचे कागदपत्र सादर केले.

दोन्ही बाजूने झालेले दावे-प्रतिदावे, सादर करण्यात आलेली कागदपत्रे व सनद यांचे अवलोकन करताना उपविभागीय दंडाधिकार्यांनी इनाम नोंदणी रजिस्टरची पडताळणी केली असता श्री कान्होबा देव मॅनेजर चिरागअली वल्द अहमदशहा फकीर याप्रमाणे नोंद असल्याचे समोर आले. तसेच,
लालबी गुल्लुभाई यांनी 29 डिसेंबर 1953 रोजी तीन हजारांचे बक्षीसपत्र करुन चंदुलाल बेगुभाई फकीर यांना जमीन हस्तांतरीत केल्याचेही स्पष्ट झाले. या मालमत्तेच्या फेरफार नोंदीचे अवलोकन करता सदरच्या नोंदी वारसा हक्काने केल्याचे व चंदुलाल बेगुभाई फकीर शेख यांचे 20 सप्टेंबर 2000 साली निधन झाल्यानंतर घेण्यात आल्याचे समोर आले. त्यातून सदरची मिळकत देवस्थान इनाम वर्ग तीनची असतानाही तिचे बेकायदा पद्धतीने हस्तांतरण झाल्याचा निष्कर्ष समोर आला. त्यात इनाम रजिस्टरची भूमिकाही महत्त्वाची ठरली.

त्यामुळे सुकेवाडी आणि घुलेवाडी हद्दित तीन ठिकाणी असलेल्या एकूण 22 एकर 35 गुंठे मिळकतीचे क्षेत्र कानिफनाथ कबरीचे क्षेत्र म्हणून सातबार्यावर नोंदवता येणार नाही असा निष्कर्ष काढून या तीनही मिळकतीचे सातबारा अधिकार अभिलेखात भोगवटादार सदरी ‘श्री कान्होबा देव’ व भूधारणा पद्धतीत भोगवटादार वर्ग दोन, देवस्थान इनाम वर्ग तीन अशी नोंद घेण्याचे आदेश संगमनेरचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी बजावले आहेत. या मिळकतींच्या वहीवाटीबाबत सुकेवाडी ग्रामस्थ, घुलेवाडी ग्रामस्थ तसेच, मुनीरभाई चंदुलाल फकीर शेख वगैरे वहिवाटीचा हक्क सांगतात. मात्र ही बाब दिवाणी न्यायालयाच्या कक्षेत असल्याने सदर मिळकती ‘श्री कान्होबा देव’ यांच्या मालकीच्या म्हणून जाहीर करुन वहीवाटीबाबत संबंधितांनी दिवाणी न्यायालयात जाण्याचा हुकूमही देण्यात आला आहे. सदरचा वाद सातबारा नोंदीवरुन असला तरीही देशात वक्फ सुधारणा कायदा लागू झाल्याच्या दिनीच त्यावरील हुकूम झाल्याने तो ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून नाथांच्या समाधी देवस्थांनावर दावे करुन त्यांच्या मिळकतींवर ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून नोंदी करण्याचे प्रकार वाढले आहेत. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीसह संगमनेर शहर व निमोण-पारेगाव येथील मिळकतीबाबतही असाच प्रकार घडल्याने मध्यंतरी यावरुन मोठा गदारोळ झाला होता. मात्र केंद्र सरकारने त्याबाबत संशोधन करुन नवा कायदा केल्याने अशाप्रकारे परस्पर ‘वक्फ’ घोषित केलेल्या मालमत्ता मूळ हक्क असलेल्यांना परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून सुकेवाडी-घुलेवाडीच्या ‘श्री कान्होजी देवस्थान’च्या लढ्याला यश आले आहे. त्यामुळे या दोन्ही गावांच्या पंचक्रोशीत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

