राहुरी तालुक्यात आठ दिवस ‘लॉकडाऊन’; नागरिकांनीच घेतला निर्णय
राहुरी तालुक्यात आठ दिवस ‘लॉकडाऊन’; नागरिकांनीच घेतला निर्णय
10 ते 17 सप्टेंबर कालावधी; भाजीपाला, दूध व अत्यावश्यक सोयी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे सोमवारी (ता.7) राहुरी येथील नगरपालिका सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत नागरिकांनीच राहुरी तालुका 10 ते 17 सप्टेंबर याकाळात ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला उपस्थित असणारे तहसीलदार एफ. आर. शेख यांनीही याला दुजोरा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी पाचशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता चिंतेत भर पडू लागली आहे. त्यातच आता जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात नागरिकांनीच पुढाकार घेऊन तालुका आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सोमवारी राहुरीमध्ये लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम, राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्हे, राहुरी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, राहुरीचे व्यापारी, विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. या बैठकीत लॉकडाऊनबाबत सविस्तर चर्चा झाली. अनेकांनी त्यांचे विचार मांडले. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, अनेकांचे मत हे लॉकडाऊन करावा, असे आले. त्यामुळे येत्या गुरुवारपासून (10 सप्टेंबर) ते 17 सप्टेंबरपर्यंत राहुरी तालुका लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात भाजीपाला, दूध व इतर अत्यावश्यक सोयी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
तालुक्यातील 46 गावे प्रतिबंधित क्षेत्र…
राहुरी तालुक्यात एकूण 96 गावे आहेत. या 96 गावांपैकी तब्बल 46 गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आजही निम्मा तालुका बंदच आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये तालुक्यातील 59 गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, राहुरी तालुक्यात आत्तापर्यंत 658 बाधित आढळले आहेत. कोरोनाचा वाढणारा हा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात यावा, यासाठी आठ दिवस राहुरी तालुका लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.