सुसंस्कृत संगमनेर शहर बनतंय ‘नशा’ विक्रीचे केंद्र! इंजेक्शन प्रकरणाचा धागा पुण्यात; पालकांच्या चिंतेत आणखी भर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘सुसंस्कृत’ शहराचे बिरुद मिरवणार्‍या संगमनेर शहराच्या नावाला अलीकडे विविध गुन्हेगारी घटना आणि अवैध व्यवसायांमुळे कलंक लागत असताना, त्यात आता अंमली पदार्थांच्या तस्करीत आणखी एका नव्या धोकादायक द्रव्याची भर पडली आहे. चरस, गांजा, एमडी यासारख्या बेकायदा अंमली पदार्थांसोबतच, सोमवारी शहरात झालेल्या कारवाईतून मेफेनटर्माइन सल्फेट या उत्तेजक इंजेक्शनचा बेकायदा राजरोस धंदा उघड झाला. धक्कादायक म्हणजे नशेच्या या व्यापाराचे धागेदोरे आता थेट पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून औद्योगिक नगरीचा मुकूट परिधान केलेल्या चाकणमधील सिद्धेश्‍वर लिंबाण्णा फनाटे या पुरवठादारालाही आता अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संगमनेरातून अटक झालेल्या आदित्य किशोर गुप्ताला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, चाकणमधून पकडलेल्या आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्याच्या चाौकशीतून धक्कादायक गोष्टींचा उलगडा होण्याचीही दाट शक्यता आहे.


संगमनेर शहरातील ऐतिहासिक बाजारपेठेत सोमवारी (ता.27) दुपारी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने छापा घातला होता. या कारवाईत पोलिसांना वैध परवान्याशिवाय उत्पादन, साठा व वाहतूक करण्यासह डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास मनाई असलेल्या मेफेनटर्माइन सल्फेट या वैद्यकिय उपचारादरम्यान केवळ डॉक्टरांच्या उपस्थितीत वापरल्या जाणार्‍या आणि रक्तदाब वाढवण्यासह तात्पूरती उत्तेजना देणार्‍या द्रव्याच्या प्रत्येकी 10 मिलीच्या तीन बाटल्या आणि सिरींज जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेतील कठोर कलमांचा वापर करुन गुन्हा दाखल करीत शास्त्री चौकात असलेल्या ‘एम.आर.व्हिटॅमीन अ‍ॅण्ड सप्लिमेंट शॉप’ या पहेलवानांना प्रोटीन्स पुरवठा करणार्‍या दुकानाचा चालक आदित्य किशोर गुप्ता (वय 24, रा.साईनगर) याला ताब्यात घेत अटक केली.


सुरुवातीला आपण ‘त्या’ गावचेच नसल्याच्या अर्विभावात असलेल्या आरोपीने भारतीय जनता पक्षाचे माजी स्थानिक पदाधिकारी असलेल्या आपल्या वडीलांच्या राजकीय वलयाचा वापर करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला महत्व दिले नाही. अटक झालेल्या आरोपीच्या चौकशीत त्याने सदरचे उत्तेजक द्रव्य कोठून आणले याबाबतची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आपल्या पद्धतीने त्याला बोलते करताच पुण्यातील औद्योगिक नगरीचा मुकूट परिधान केलेल्या खेड-चाकण परिसरातील पुरवठादाराचे नाव समोर आले.


त्याची खातरजमा करीत पोलिसांच्या एका पथकाने मंगळवारी (ता.28) चाकणमधील म्हाळुंगे परिसरात राहणार्‍या व आयुष मेडिकल नावाने खलुंब्रे येथे व्यवसाय करणार्‍या सिद्धेश्‍वर लिंबाण्णा फनाटे (वय 38) याला ताब्यात घेत संगमनेरात आणले. सदरचे औषध त्याने संगमनेरच्या आदित्य गुप्ताला विकल्याची कबुलीही दिली असून सदरचा व्यवहार पहिल्यांदाच केल्याची पृष्टीही त्याने पोलिसांना दिलेल्या जवाबात जोडली आहे. या शिवाय त्याच्याकडून अन्य कोणाला अशाप्रकारे बेकायदा पद्धतीने सदरील औषधाचा पुरवठा झालाय का?, या अवैध पुरवठ्यात त्याच्यासोबत अन्य कोणी आहे का? याचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


गेल्याकाही काळात पोलिसांनी केलेल्या कारवायांमधून जिल्ह्याला अंमलीपदार्थांचा विळखा बसल्याचे समोर येवू लागले असून त्याचे लोण आता संगमनेरातही वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. या घटना पालकवर्गाच्या चिंता वाढवणार्‍या असून शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात असणार्‍या काही पानटपर्‍या, चहा अथवा नाश्त्याच्या नावाखाली चालणार्‍या हातगाड्या व चक्क काही ढाब्यांवरही गांजा, चरस, एमडीसारखे अतिशय घातक अंमली पदार्थ सहज मिळू लागल्याने आजच्या विद्यार्थीदशेतील किशोरवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल 934 किलो गांजाची विल्हेवाट लावली होती. त्यावरुन जिल्ह्यात अंमलीपदार्थांचा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात फोफावलाय याचेही चित्र समोर आले होते. संगमनेरातील ‘एम.आर.व्हिटॅमीन सप्लिमेंट शॉप’वरील कारवाईत जप्त केलेल्या मेफेनटर्माइन सल्फेट या नशीली औषधीद्रव्यातून ही गोष्ट अधिक ठळक झाली आहे.


मेफेनटर्माइन सल्फेट हे मूळतः वैद्यकिय क्षेत्रात वापरले जाणारे सिम्पॅथोमिमेटिक औषध आहे. विशेषतः एखाद्या रुग्णावर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया सुरु असताना अथवा स्पायनल अ‍ॅनेस्थेशिया नंतर जेव्हा रुग्णाचा रक्तदाब अचानक कमी होतो, त्यावेळी रुग्णाचा रक्तदाब स्थीर ठेवण्यासाठी या औषधाच्या इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे हृदयाची गती आणि त्याची पंप करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे वेगाने रक्तदाब वाढून शरीराच्या महत्वाच्या अवयवांना सुरळीत रक्तपुरवठा होतो. मात्र आता या औषधाचा वापरही काहींकडून नशेसाठी करण्यात येवू लागला असून व्यायाम करणार्‍यांसह काही तरुणांकडून तात्पूरती ऊर्जा, उत्तेजना आणि लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही त्याचा वापर होत आहे.


यापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील काही महाविद्यालयांच्या परिसरातही मेफेनटर्माइन सल्फेट या औषधाच्या इंजेक्शनची विक्री होत असल्याचे उघड झाले होते. त्यावेळच्या पोलीस तपासात सदरचे औषध बॉडी बिल्डींग करणार्‍यांसह लैंगिक क्षमता वाढवू पाहणार्‍या मुला-मुलींकडून त्याचा वापर केला जात असल्याचे समोर आले होते. हा प्रकार केवळ मेफेनटर्माइन सल्फेटपुरता मर्यादीत नसून यातून रक्तदाब, भूल अथवावैद्यकिय कारणांसाठी लागणार्‍या औषधांची निर्मिती करणार्‍या कंपन्याही रडारवर आल्या आहेत. संगमनेर पोलिसांनी देशाच्या भावी पिढीचा विचार करुन या प्रकरणाच्या मूळाशी जावून तपास केल्यास मेफेनटर्माइन सल्फेट नावाच्या नशेली औषधाच्या बेकायदा पुरवठ्याचे राज्यव्यापी रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता आहे. संगमनेरातील या कारवाईने मात्र पालकांची झोप उडाली असून स्थानिक पुढार्‍यांनी पुढील पिढीचा विचार करुन अशाप्रकारच्या अमंलीपदार्थांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे.


कोल्हार येथील गांजा विक्रीची ठिकाणं पोलिसांनी भूईसपाट केल्यापासूनच संगमनेर-नेवासाफाटा ही ठिकाणं गांजाविक्रीचे नवे केंद्र म्हणून चर्चेत आली. अलिकडच्या काळात संगमनेरसारख्या प्रगत शहरातील शाळा, महाविद्यालयालगतच्या काही पानटपर्‍या, चहा व नाश्त्याच्या हातगाड्या आणि ओडोशाला बसून काहींनी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने किशोरवयीन मुलेही या गंभीर पदार्थांचा वापर करुन व्यसनाच्या आहारी जावू लागली आहेत. या गोष्टी शहराच्या सामाजिक स्वास्थासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी अतिशय घातक असून स्थानिक राजकीय पुढार्‍यांसह पालकांनीही याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देवून पोलिसांवर सातत्यपूर्ण कारवाईसाठी दबाव निर्माण करण्याचा आणि संगमनेर शहर नशामुक्त करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.

Visits: 166 Today: 4 Total: 1107323

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *