नवरात्रोत्सव मनामनात निर्माण झालेला संस्कार : शिंदे

नायक वृत्तसेवा, आश्वी
नवरात्र म्हणजे फक्त देवीची आराधना नव्हे, तर आपल्या जीवनमूल्यांची, निसर्गाच्या संवर्धनाची, आणि समाजातील ऐक्याची पुनर्प्रतिज्ञा आहे. सोनाई मातेसमोर दिलेला प्रण हा केवळ भक्तिभावाने न राहता, कृतीत उतरला पाहिजे. झाडे लावण्याची, निसर्गाचा सन्मान करण्याची, समाजासाठी सेवा देण्याची शिकवण या उत्सवातून अधोरेखित होते.खरं तर पंचवीस वर्षांची ही सेवा परंपरा गावाला सांगते, नवरात्र हा फक्त सोहळा नसून, तो जिवंत माणसांच्या मनामनात निर्माण झालेला संस्कार असल्याचे प्रबोधन किर्तनकार सुरेखा महाराज शिंदे यांनी आपल्या कीर्तन सेवेतून केले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील श्री सप्तश्रृंगी सोनाई माता मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित रौप्यमहोत्सवी २५ वे नवरात्र उत्सव व कोजागिरी महोत्सवाच्या प्रमुख सोहळ्यात सुरेखा शिंदे यांचे कीर्तन रंगले. त्यांच्या रसाळ व प्रबोधनपर वाणीतून भक्तिरस, समाजप्रबोधन आणि निसर्गसंवर्धन यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नव्हे, तर जीवनमूल्यांची पुनर्प्रतिज्ञा, निसर्गाच्या संवर्धनाची शपथ आणि समाजातील ऐक्याचा जागर असा संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून दिला.

Visits: 45 Today: 1 Total: 1114199
