‘भारत बंद’ला कोपरगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत. या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांनी पुकारलेल्या आजच्या (मंगळवार ता.8) भारत बंदला कोपरगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, व्यापार्यांनी कडकडीत बंद ठेवल्याचे पहावयास मिळाले.
भारत बंदला कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्यावतीने पाठिंबा देत शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हंटले की, केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांचा देशातील सर्वच शेतकर्यांना आर्थिक फटका बसणार आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत असून या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून, या कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदला कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही पाठिंबा देत असून शेतकर्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन कायदे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.