संगमनेर बसस्थानक बनले असुरक्षित!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील मुख्य प्रवास केंद्र असलेले संगमनेर बसस्थानक दिवसेंदिवस असुरक्षित होत चालले आहे. येथे महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, भांडणे तसेच वाढत्या चोरींच्या घटनांमुळे प्रवासी व नागरिक त्रस्त झाले आहेत.

बसस्थानक परिसर दिवसभर गजबजलेला आसतो. सकाळी व संध्याकाळी हजारो प्रवासी विविध तालुक्यांमधून प्रवासासाठी ये-जा करतात. मात्र या गर्दीचा गैरफायदा घेत काही बेफिकीर महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी अश्लील हसणे-खिदळणे, अंगविक्षेप, एकमेकांना ढकलणे अशी कृत्ये करतात. या प्रकारांमुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच, पण अनेकदा वादावादीही पेटतात. काही वेळा या वादातून गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

याशिवाय बसस्थानक परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. गर्दीत मोबाईल, पाकीट, पर्स यांसारख्या वस्तू लंपास होणे, प्रवाशांच्या बॅगा फाडून चोरी करणे अशा घटना नियमित घडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. या वाढत्या चोरीमुळे विशेषत: महिला प्रवासी व ज्येष्ठ नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिक व प्रवाशांचे म्हणणे आहे की, बस स्थानकात सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असले तरी ते अनेकदा बंद असतात किंवा योग्यरीत्या कार्यरत नसतात. त्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळत आहे.

स्थानिक नागरिकांनी एस.टी. महामंडळ प्रशासन तसेच पोलिस विभागाला वारंवार तक्रारी केल्या असूनही परिस्थितीत सुधारणा होत नाही. बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा, अश्लील चाळे करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी आणि चोरी रोखण्यासाठी कडक सुरक्षा यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने पावले न उचलल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Visits: 85 Today: 1 Total: 1105688
