संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात! मानाच्या नऊसह 16 मंडळांचा सहभाग; नदीपात्रात सकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेली दहा दिवस आनंद आणि उत्साहाचा अखंड झरा प्रवाहित करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाची आज भावपूर्ण वातावरणात सांगता आहो. 129 वर्षांचा इतिहास असलेल्या सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळाच्या गणरायाचे सकाळी साडेआठ वाजता माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विधिवत पूजन करुन संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावर्षी मुख्य मिरवणुकीत मानाच्या नऊ गणपती मंडळांसह एकूण 16 गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. त्यासोबतच आज सकाळपासून प्रवरा नदीपात्रातही घरगुती आणि खाजगी गणपतींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
130 वर्षांपूर्वी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती त्याच्या पुढच्याच वर्षी संगमनेरातील रंगारगल्लीत असलेल्या सोमेश्वर मंदिरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी हा उत्सव संगमनेरात मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या या उत्सवाची आज मोठ्या भावपूर्ण वातावरणात सांगता होत असून, आज सकाळी साडेआठ वाजता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक जयश्री थोरात, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शहरातील मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत मानाच्या गणरायाचे पूजन करून संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
यावर्षी मुख्य विसर्जन मिरवणुकीत मानाच्या सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळासह चौंडेश्वरी मित्र मंडळ, साळीवाडा मित्र मंडळ, राजस्थान युवक मंडळ, चंद्रशेखर चौक हिंदू मित्र मंडळ, नेहरु चौक हिंदू मित्र मंडळ, महात्मा फुले माळीवाडा मित्र मंडळ, भगतसिंग तरुण मित्र मंडळ, स्वामी विवेकानंद मित्र मंडळ या मानाच्या नऊ मंडळांसह एकूण 16 मंडळे सहभागी होणार आहेत. ढोल-ताशांचा गजर, बँडपथक, टाळ-मृदुंग अशा थाटात ठिकठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणूका निघण्यास सुरुवात झाली असून संगमनेरचे वातावरण गणेशमय झाले आहे. आज सकाळपासूनच शहरातील बालमंडळे, खाजगी गणपती व घरगुती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक साद घालीत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे.
प्रवरा नदीपात्रातून झालेला बेसुमार वाळूउपसा आणि त्यातून निर्माण झालेले जीव घेणे खड्डे यामुळे प्रशासनाने सलग सातव्या वर्षीही कोणाही नागरिकाला थेट नदीपात्रात जाऊन विसर्जन करण्यास मनाई केली आहे. घाटांच्या नजीक एकविरा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांकडून गणेशमूर्तींचा स्वीकार केला जात असून त्यानंतर या सर्व मूर्ती बजरंग दलाच्या स्वाधीन केल्या जात आहेत. त्यांच्याकडून गटागटाने गणेशमूर्तींचे पूजन करुन त्यानंतर नदीपात्राच्या मध्यभागात जमा झालेल्या सर्व श्रींचे विधिवत सन्मानपूर्वक पद्धतीने विसर्जन होत आहे. मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाला जोडणारे सर्व छोटे-मोठे रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले असून विसर्जन मार्गावर वाहने घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यात चौकाचौकात आणि नदीपात्राजवळ बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांच्या गस्ती वाहनातूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
Visits: 90 Today: 3 Total: 112883