पालिकेच्या निवडणुकीतून संगमनेरच्या राजकारणाला कलाटणी! विद्यमान सत्ताधार्यांकडून आघाडीचे संकेत; ‘महायुती’चा निर्णय मात्र गुलदस्त्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने परिवर्तन घडलेल्या संगमनेरात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. पुढील तीन महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची दाट शक्यता असून संगमनेरातील सत्ता बदलाने यंदा त्यात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने इच्छुकांच्या चाचपणीसह मतदारांच्या मनाचा ठाव घेण्याचाही प्रयत्न सुरु झाला आहे. त्या अनुषंगाने विधानसभेचे सदस्य आमदार अमोल खताळ यांनी आपल्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना वज्रमूठ आवळण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. तर, विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी शहरातील विविध घटकांशी संवाद साधताना व्यक्तिगत भेटीगाठींकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून एकहाती सत्ता असलेल्या पालिकेतील राजकारणाला यावेळी कलाटणी मिळण्याची शक्यता असून यंदाच्या निवडणुकीत सत्ताधार्यांकडून ‘आघाडी’ निर्माण करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे संगमनेरच्या पालिका निवडणुकीतून यावेळी काँग्रेसचे पक्षचिन्ह ‘गायब’ होण्याचेही संकेत प्राप्त होत आहेत.

ऐतिहासिक शहरांमध्ये गणना होणार्या संगमनेरच्या नगरपालिकेलाही मोठा इतिहास आहे. प्रत्यक्षात 1857 साली मंजूर झालेल्या संगमनेर नगरपालिकेचा प्रस्ताव मेरठमधील सशस्त्र उठावाच्या कारणाने तीन वर्षांच्या विलंबाने लागू झाला आणि प्रत्यक्षात 1860 साली पालिकेची स्थापना
झाली. विशेष म्हणजे गावातील लोकांना सुविधा मिळाव्यात, चांगले रस्ते, आरोग्य, स्वच्छता, दिवाबत्ती या गोष्टी वेळच्यावेळी व्हाव्यात यासाठी त्यावेळच्या शहरातील व्यापार्यांनी आग्रह करुन, प्रसंगी अतिरीक्त कर भरण्याची तयारी दर्शवताना शहरात पालिकेची स्थापना घडवून आणली होती. 165 वर्षांचा अतिशय प्रगल्भ इतिहास असलेल्या पालिकेवर 1991 साली माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वर्चस्व मिळवले, तेव्हापासून पालिकेवर त्यांच्याच गटाची एकहाती सत्ता आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात परिवर्तन घडले. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावलेला आहे. त्यातून आगामी कालावधीत होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांमधील चुरस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच महायुतीचे आमदार अमोल खताळ यंदा पालिकेवर भगवा फडकावणारच अशाप्रकारचे सार्वजनिक भाष्य करीत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरीत असल्याने निवडणुकीची
अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वीच संगमनेरचे राजकारण तापू लागले आहे. अशावेळी आपला गड अबाधित ठेवण्यासाठी विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी पालिका निवडणुकीची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. बदललेले राजकारण आणि त्यात वेगाने पडणारी भर यांची सांगड घालताना यावेळी त्यांनी पालिकेच्या इतिहास बहुधा पहिल्यांदाच आघाडी तयार करुन निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

त्यासाठी त्यांनी प्रासंगिक संकेत जुळवताना शहरातील विविध भागातील नागरिकांच्या थेट घरी जावून सदिच्छा भेटी देण्यास सुरुवातही केली आहे. त्यातून नागरीकांच्या मनाचा ठाव घेत ते इच्छुकांची चाचपणीही करीत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत आघाडी होणार
असल्याच्या चर्चा असल्या तरीही त्याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणीही माहिती दिलेली नाही. मात्र आमदार तांबे यांच्याकडून ज्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे, ती पाहता यावेळच्या पालिका निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकीय चिन्ह ‘गायब’ होण्याची अधिक शक्यता दिसून येत आहे. अर्थात गेल्या साडेतीन दशकांपासून पालिकेवर एकहाती वर्चस्व असलेल्या डॉ.सुधीर तांबे व आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षाने केलेली निलंबनाची कारवाई आजही कायम असल्याने तांत्रिक दृष्टीकोनातून त्यांचा काँग्रेसशी संबंध नसल्याचेही दिसून येते.

एकंदरीत संगमनेरातील सत्ता बदलाने शहराचे राजकारण ढवळले असून त्याचे प्रतिबिंब आगामी निवडणुकांच्या माध्यमातून अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोहींकडून पालिकेची निवडणूक समोर ठेवून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आल्याने यंदाच्या स्थानिक निवडणूका लक्ष्यवेधी ठरणार आहेत हे मात्र निश्चित.

आपल्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत आदर्श कामाचा मापदंड निर्माण करणार्या दिवंगत उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी यांनी 1990 च्या दशकात स्थानिक पातळीवर राजकारण असू नये यासाठी शहरातील सर्व समाज व घटकांमधील योग्य व्यक्तिंना निवडून राजकारण
विरहित ‘शहर विकास आघाडी’ निर्माण करण्याची संकल्पना मांडली होती. मात्र त्यांचा हा उदात्त विचार तत्कालीन राजकारण्यांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे गढूळ होत गेलेले राजकारण पाहता त्यांनीही नंतरच्या कालावधीत पुन्हा कधीही पालिकेच्या राजकारणाकडे पाहिले नाही. त्यांच्यानंतर आता तब्बल चार दशकांनी आमदार सत्यजीत तांबे यांनी अशाप्रकारची आघाडी निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र आजच्या बदललेल्या राजकीय स्थितीत संगमनेरकर त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आयोगाच्या हलगर्जीपणामुळे निवडणूका पुन्हा लांबणीवर..
गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून विविध याचिकांवरील प्रलंबित सुनावणीमुळे खोळंबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील ‘स्थगिती’ उठवताना सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर अखेरीस सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मे महिन्यातील सुनावणीवेळी दिले होते. त्याची मुदत संपत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने पुढील कालावधीतील सण-उत्सवांसह कर्मचार्यांची आणि ईव्हीएम यंत्राची कमतरता पुढे करुन न्यायालयाला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यावर आज (ता.16) पार पडलेल्या सुनावणीत न्या.सूर्यकांत व न्या.बागची यांच्या खंडपीठाने आयोगाला खडेबोल सुनावताना हलगर्जीपणा दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवले.
राज्य सरकार व केंद्रीय निवडणूक आयोगाशी समन्वय साधून कर्मचारी व मतदान यंत्रांची पूर्तता करण्याचे स्पष्ट निर्देश देताना न्यायालयाने कोणत्याही स्थितीत 31 जानेवारी 2026 पूर्वी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. या शिवाय न्यायालयाने आयोगाला वेळापत्रकही दिले आहे.

