संगमनेरच्या वाळू तस्करांनी घेतला दोघांचा बळी! उन्हाळी आवर्तनाने केला घात; गंगामाई घाटावरील घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारी अकोले तालुक्यातील सुगांव मध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तिघांसह चौघे बुडाल्याची धक्कादायक घटना ताजी असताना आता संगमनेरातूनहीअत्यंत धक्कादायक वृत्त हाती आले आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास गंगामाई परिसरातील प्रवरानदीपात्रात आंघोळ करणार्या दोघा सतरा वर्षीय मुलांचा वाळू तस्करांनी पोखरलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे. आदित्य रामनाथ मोरे व श्रीपाद सुरेश काळे अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या दुर्घटनेत बळी गेलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह हाती लागले असून संगमनेरात शोककळा पसरली आहे.
याबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज (ता.24) सायंकाळी पाचच्या सुमारास गर्दीने ओसंडलेल्या गंगामाई घाटावर घडली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुलांना शालेय सुट्ट्या आहेत. त्यातच गुरुवारी सायंकाळपर्यंत निळवंडे धरणातून आवर्तन सुरु असल्याने गेल्या 20 दिवसांपासून प्रवरामाई वाहती आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी संगमनेरकर नागरीक आपल्या मुलांसह नदीकाठी फिरण्यासाठी व आंघोळीसाठी गर्दी करतात.
आज सायंकाळीही नदीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अनेक पालक आपल्या लहान मुलांसमवेत नदीपात्रात आंघोळीचा आनंद घेत होते. त्याचवेळी गंगामाई परिसरात घाटालगत आंघोळ करणारे आदित्य रामनाथ मोरे (वय 17, रा.घुलेवाडी) व श्रीपाद सुरेश काळे (वय 17, रा.कोळवाडे) हे दोघे तरुण पोहोत असताना अवघ्या काही अंतर पूर्वेकडे गेले असतात्यांना अचानक मोठा खड्डा जाणवला, दुर्दैवाने त्यातून सावरण्यापूर्वीच एकापाठोपाठ दोघेही त्या खड्डड्यात बुडाले. यावेळी नदीपात्रात असलेल्या काहींनी त्यांना वाचवण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आले. घटनेनंतर अर्धातासाने बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर अन्य लोकांनी ते बाहेर काढले.
गेल्याकाही वर्षात वाळू उचलण्यासाठी सतत विरोध करुनही रिक्षा व बैलगाडीद्वारे वाळूचोरी करणार्यांनी गंगामाई, हनुमान टेकडी, केशवतीर्थ व महादेव मंदिराच्या परिसरातून सातत्याने प्रचंड वाळू उपसा केला आहे. त्याचा परिणाम नदीपात्रात प्रचंड मोठे खड्डे आणि कपारी निर्माण झाल्याने नवख्या पोहणार्यांसाठी संगमनेरचे नदीपात्र अत्यंत धोकादायक ठरले आहे.
