बावपठार रस्त्याचे भूमिपूजन होवूनही काम केवळ कागदावरच सरकारी काम आणि सहा महिने थांबचा प्रत्यय; नागरिकांत संताप
नायक वृत्तसेवा, घारगाव
रस्त्याचे काम मंजूर झाले. त्यानंतर मोठ्या थाटामाटात भूमिपूजनही केले म्हणून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, सरकारी काम आणि सहा महिने थांबनुसार गेल्या तीन ते चार महिन्यांनंतरही रस्त्याच्या कामाला साधी सुरूवातही झाली नसल्याने बावपठार (ता. संगमनेर) येथील ग्रामस्थांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
नांदूर गावांतर्गत असलेल्या बावपठार या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात हा संपूर्ण रस्ता चिखलमय होतो. त्यामुळे ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याचे काम व्हावे म्हणून अनेकवेळा मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर अहमदनगर जिल्हा नियोजन समिती 3054 अंतर्गत अनुदान 2020-2021 नांदूर ते बावपठार रस्ता मजबुतीकरण करणे असा फलकही रस्त्याच्या कडेला लावण्यात आला होता आणि त्यानंतर मोठ्या थाटामाटात भूमिपूजनही संपन्न झाले.
या रस्त्याचे काम होणार म्हणून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरणही निर्माण झाले होते. परंतु, हा आनंद क्षणिक ठरला. गेली तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला साधी सुरूवात देखील झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे तेथे रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला फलकही गायब झाला आहे. त्यामुळे नेमके काय गौडबंगाल आहे असा प्रश्नही ग्रामस्थांना पडला आहे.
नांदूर ते बावपठार या रस्त्याचे भूमिपूजन होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही. या रस्त्याचे काम सुरु व्हावे म्हणून अनेकवेळा ठेकेदार, संबंधित अधिकारी यांच्याशी वारंवार मोबाइलवरून संपर्कही साधला. आत्ताच काम सुरू होईल अशीच उत्तरे आत्तापर्यंत मिळाली आहेत. भूमिपूजन करूनही काम सुरू झाले नसल्याने सरकारी काम आणि सहा महिने थांबचा प्रत्यय आला आहे.
– भाऊसाहेब भागवत (माजी सरपंच-नांदूर)