राहुरीतील ‘साक्षी’ हॉटेलमध्ये झोपलेल्या वेटरचा निर्घृण खून! संशयित फरार वेटरला शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना..
नायक वृत्तसेवा, राहुरी
नगर-मनमाड महामार्गालगत एका हॉटेलमध्ये झोपलेल्या एका तरुण वेटरचा रविवारी (ता.19) सकाळी मृतदेह आढळला आहे. त्याच्या डोक्यात लोखंडी टॉमीचे प्रहार केल्याने डोक्याचा चेंदामेंदा करून, निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याबरोबर शनिवारी रात्री झोपलेला एक वेटर फरार झाला असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
सोनू नामदेव छत्री (वय 27, मूळचा नेपाळी, आधार कार्ड पत्ता रा. गेवराई, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. तर नामदेव केशव दराडे (वय 30, रा. बोधेगाव, ता. शेवगाव) असे फरार वेटरचे नाव आहे. राहुरी ते राहुरी महाविद्यालय दरम्यान नगर-मनमाड महामार्गालगत हॉटेल ‘साक्षी’मध्ये चारजण वेटर आहेत. पैकी दोन वेटर रात्री हॉटेलमध्ये झोपतात. रविवारी एकाचा मृतदेह आढळल्याची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, मधुकर शिंदे, नीरज बोकिल, तुषार धाकराव यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
अहमदनगरचे ठसेतज्ज्ञ सहाय्यक पोीलस निरीक्षिका माधुरी मदने व त्यांचे पथक, ‘रक्षक’ नावाच्या श्वानासह घटनास्थळी दाखल झाले. श्वान जागेवरच घुटमळले. शनिवारी मध्यरात्री दीड ते पावणेदोन दरम्यान सोनूचा खून झाल्याची सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांची खात्री झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मृत सोनू छत्री मूळचा नेपाळ येथील रहिवाशी आहे. तो काही वर्षांपासून हॉटेल साक्षी येथे वेटर म्हणून काम करत होता. पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. फरार वेटर नामदेव दराडे काही दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये कामाला आला होता. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
फरार वेटर नामदेव दराडे याने खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. त्यांना सायबर क्राईमचे पथक मदत करीत आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यावर खुनाचे कारण स्पष्ट होईल.
– संदीप मिटके (पोलीस उपअधीक्षक, श्रीरामपूर)