अगस्तीच्या विद्यार्थ्यांनी क्रिकेट स्पर्धेत मिळवले यश

नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ती महाविद्यालयाच्या आयटीआय च्या मैदानावर दि.१२ व १३ सप्टेंबरला तालुकास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अगस्ती विद्यालयाच्या १७ वर्ष वयोगटाखालील मुलींच्या संघाने तर १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावून जिल्हास्तरावर प्रवेश निश्चित केला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग नोंदवला. यात अगस्ती विद्यालयातील १७ वर्षे वयोगट मुली व १४ वर्ष वयोगट मुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मुलींच्या संघाने लिंगेश्वर विद्यालय लिंगदेव तर मुलांच्या संघाने अभिनव पब्लिक स्कूलच्या वसुंधरा अकॅडमीचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. विजयी संघास संजय पवार व ओम बाणाईत यांचे मार्गदर्शन लाभले.

सतरा वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाची कर्णधार प्रांजल शिंदे होती तर चौदा वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाचे नेतृत्व सोहम वाकचौरे याने केले. विजयी संघाचे श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या सचिव शैलजा पोखरकर, कार्यवाहक शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी,संदीप नाईकवाडी प्राचार्य मंगेश खांबेकर, उपमुख्याध्यापक दौंड, पर्यवेक्षिका नंदा गोपाळे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सचिन शिंदे,गिरीश नवले आदींनी अभिनंदन केले.

Visits: 74 Today: 1 Total: 1098382
