सध्याची स्थिती भारतीयांसाठी फायदेशीर : डॉ. दातार काही देशांच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवर केले विश्लेषण
नायक वृत्तसेवा, नगर
जगाचे सध्याचे आर्थिक चित्र संमिश्र आहे. एकीकडे युद्धजन्य स्थिती, वाढती महागाई, लहरी हवामानामुळे काही देशांत ओला तर काहींमध्ये कोरडा दुष्काळ, मंदीची भेडसावणारी चिंता, काही देशांच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्था अशी स्थिती आहे. मात्र त्याचवेळी भारतासारख्या देशांना त्यातून नव्या संधीही मिळणार असून त्याचा फायदा निवासी तसेच अनिवासी भारतीयांना होईल, अशी शक्यता दुबईस्थित अल-अदील-उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली आहे.
अलिकडे घडलेल्या काही घडामोडींचा संदर्भ देताना ते म्हणाले, भारतातून आखाती देशांना प्रामुख्याने सागरी मार्गाने अन्नधान्य व वस्तूंची निर्यात होते. भारत संयुक्त अरब अमिरातीला मोठी निर्यात करतो. त्यासाठी लागणारे कंटेनर्स गेली दोन वर्षे कमी संख्येने उपलब्ध होते. त्यातही कोरोना काळात चीनकडून आयातीची मोठी मागणी असल्याने उपलब्ध कंटेनर्सचा मोठा साठा त्या मार्गावर वापरला जात होता. साहजिकच प्रति कंटेनर वाहतूक शुल्क भरमसाट वाढले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते 20 फुटी कंटेनरसाठी 1100 डॉलर्स इतके उच्चांकी महागले होते. त्यामुळे दुबई व अन्य आखाती देशांतही ग्राहकांना महागाईच्या झळा बसत होत्या. आता स्थिती निवळत असून कंटेनरही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने हेच शुल्क साधारण तिपटीने म्हणजे प्रत्येक कंटेनरसाठी 375 डॉलर इतके कमी झाले आहे. परिणामी दुबईत आयात वस्तूंच्या किंमती साधारण 10 ते 12 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आगामी काळात हेच वाहतूक शुल्क प्रति कंटेनर 150 ते 175 डॉलर इतके कमी होण्याची शक्यता असल्याने किंमतीही 20 टक्क्यांनी कमी होतील. ही स्थिती आखाती देशांतील अनिवासी भारतीयांप्रमाणेच अन्य ग्राहकांना दिलासा देणारी ठरेल.
ते पुढे म्हणाले, संयुक्त अरब अमिरातीचे चलन दिर्हॅमसुद्धा भारत, पाकिस्तान, युके व यूरोपीय देशांच्या चलनाच्या तुलनेत वधारले आहे. त्याचा परिणाम दुबईतील आयात स्वस्त होण्यात होईल. भारत व पाकिस्तान हे देश संयुक्त अरब अमिरातीच्या अन्नधान्य तथा खाद्य उत्पादने आयातीचे प्रमुख स्रोत आहेत. या प्रमुख पुरवठादारांकडून येणारे तांदूळ, मसाले, सुकामेवा, भाज्या व इतर खाद्य उत्पादने अमिरातीतील ग्राहकांत मोठ्या प्रमाणावर वापरतात. भारताला यंदा अनुकूल हवामानामुळे किराणा उत्पादनांच्या निर्यातीत आघाडी घेण्याची संधी आहे. यूक्रेन व रशिया यांच्यातील युद्धस्थिती सध्या शांत असल्याने तेथून निर्यात सुरू झाली आहे. त्याचा फायदा विशेषतः खाद्यतेलांच्या किंमती कमी होण्यात होईल. मात्र एक चिंतेची बाब म्हणजे दक्षिण आशियाई देशांत मुसळधार पावसाने थैमान घातल्याने व भातशेती पाण्याखाली गेल्याने आगामी काळात तांदुळाच्या पुरेशा उत्पादनाबाबत व आगामी किंमतींबाबत आताच अंदाज करता येणार नाही.
‘भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत अल्प घसरला असला तरी खूपसा स्थिर आहे, पण चलनातील या घसरणीचाही फायदा परदेशात नोकरी करु इच्छिणार्या भारतीयांना होऊ शकतो. कारण कुशल मनुष्यबळाची मागणी वाढल्यास अधिक उत्तम पॅकेजचे रोजगार प्राप्त करता येतात. एकूणच आव्हानात्मक स्थितीतही संधी असतात. भारताने त्यांचा फायदा घ्यायला हवा’, असे डॉ. धनंजय दातार यांना वाटते.