‘प्रहार’च्या चक्काजामला ‘मामा-भाच्या’चा कागदी पाठींबा! आंदोलनस्थळी कोणीच फिरकले नाही; डझनभर दिव्यांगानीच रोखला महामार्ग..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील दिव्यांग व विधवांच्या निर्वाह वेतनासह शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या माजीमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन पुकारले आहे. त्याचाच भाग म्हणून दिव्यांग संघटनेच्यावतीने आज सकाळी बसस्थानक परिसरात महामार्ग रोखून ‘चक्काजाम’ करण्याचे नियोजन करण्यात आले होते. राज्य शासनाच्या विरोधात सुरु झालेल्या या आंदोलनात उडी घेत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांचे भाचे, अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल माध्यमातून आपापले पत्र व्हायरल करुन या आंदोलनाला पाठींबाही जाहीर केला होता. त्यामुळे आजच्या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झालेली असताना प्रत्यक्षात मात्र ती फोल ठरली. सकाळी साडेअकराच्या सुमारास पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात केवळ डझनभर दिव्यांग सहभागी झाले आणि त्यांनी काहीकाळ महामार्गावर ठिय्या देत वाहतूकही रोखली. या दरम्यान पाठींबा जाहीर करणार्या ‘मामा-भाच्या’च्या जोडीसह काँग्रेसचा एकही पदाधिकारी मात्र आंदोलनस्थळी फिरकला नाही. त्यामुळे आजी-माजी आमदारांनी फक्त राजकीय लाभासाठीच कागदी पाठींबा दिला की काय अशी खुमासदार चर्चा बसस्थानकाच्या परिसरात रंगली होती.

प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा, माजी राज्यमंत्री ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांनी दिव्यांग व विधवा महिलांना मिळणार्या निर्वाह वेतनात वाढ करुन प्रतिमाह सहा हजार रुपये देण्याच्या प्रमुख मागणीसह राज्यातील शेतकर्यांची कर्जमाफी, शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा 20 टक्के प्रोत्साहन रकमेची मागणी व शिक्षण, रोजगार आणि आरोग्य विषयक प्रश्नांवरुन अमरावती जिल्ह्यातील मोझडी येथून आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठींबा दर्शवण्यासाठी आज राज्यभरातील विविध दिव्यांग व शेतकरी संघटनांसह काही राजकीय पक्षांनी त्यात सहभागी होवून राज्यव्यापी ‘चक्काजाम’ आंदोलन पुकारले होते. त्याला संगमनेरच्या दिव्यांग सारथी संघटनेने प्रतिसाद देताना आज (ता.24) सकाळी साडेअकरा वाजता बसस्थानकासमोर पुणे-नाशिक महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला होता.

सदरच्या आंदोलनाची घोषणा होताच बुधवारी (ता.23) सायंकाळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे, अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी स्वतंत्रपणे बच्चू कडू यांच्या नावाने पत्र व्हायरल करुन त्यांच्या मोझडी येथील आंदोलनाला जाहीर पाठींबा दर्शवला. त्यासोबतच गुरुवारी होणार्या आंदोलनाचा ठळकपणे उल्लेख करीत दोघांनीही आपापल्या छायाचित्रासह असलेल्या जाहिरातीही सोशल माध्यमातून व्हायरल केल्याने आजच्या आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे दिव्यांग संघटनांचाही उत्साह वाढलेला असतानाच प्रत्यक्षात आजच्या आंदोलनाच्या ठिकाणी मामा-भाचे सोडाच त्यांचा कोणी समर्थकही दिसून आला नाही. त्यामुळे बुधवारी घाईघाईत आजच्या आंदोलनाला सोशल माध्यमातून जाहीर पाठींबा देण्याचा प्रकार कागदावरच असल्याचेही दिसून आले.

त्यावरुन आंदोलनस्थळावरच वेगवेगळ्या चर्चांचे धुमारे फुटायला सुरुवात झाली होती. त्यात प्रामुख्याने सरकार विरोधातील आंदोलनातून स्वतःला राजकीय चर्चेत ठेवण्याच्या प्रयत्नांसह दोनच दिवसांपूर्वी आमदार सत्यजीत तांबे यांनी पारिवारीक संबंधावरुन केलेल्या वक्तव्याच्या चाचणीपर्यंतच्या विषयाचा समावेश होता.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील घडामोडी, त्यात भाजपच्या पाठींब्यावर झालेली अपक्ष निवड आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेत पराभव होवूनही त्यांचे भाचे सत्यजीत तांबे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीमधील घटकपक्षांच्या नेत्यांशी वाढत असलेली जवळीक पाहता ‘थोरात-तांबे’ यांच्या पारिवारीक संबंधांवरुनही अनेकवेळा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. दोनच दिवसांपूर्वी आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यावरील काजळी पुसताना ‘मामांच्या महत्वकांक्षांसमोर आमच्या राजकीय महत्वकांक्षा शून्य’ असे स्पष्टपणे सांगत दोन्ही परिवारात सर्वकाही आलबेल असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लागलीच ‘मामा-भाच्या’कडून सरकारविरोधी आंदोलनाला पाठींबा देणारे पत्र एकाचवेळी ‘व्हायरल’ केले गेल्याने संगमनेरात नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. त्यातून आमदार तांबे यांचे ‘ते’ वक्तव्य पडताळले जात असल्याचीही चर्चा सुरु आहे.

