मुख्यालयी राहत नसलेल्या कर्मचार्यांवर कारवाई करा! सोपान रावडेंची मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षक-ग्रामसेवकांसह सरकारी कर्मचार्यांवर कारवाई करावी. तसेच कर्मचार्यांनी मुख्यालयी राहत असल्याचे सादर केलेले बहुतांश ग्रामसभेचे ठराव खोट्या माहितीचे असल्यामुळे त्या-त्या गावात प्रत्यक्ष जाऊन त्या सर्व ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यतेबाबत उलट तपासणी करावी. या मागणीसाठी 11 जुलै, 2022 पासून जिल्हा परिषद अहमदनगर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी दिली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात रावडे यांनी मुख्यालयी राहत असल्याचे अद्यापपर्यंत ग्रामसभेचे ठराव न देणार्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीमधील ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य विभागातील सर्व दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर आणि त्यांचे बेकायदेशीरपणे घरभाडे भत्ता मंजूर करणार्या वरिष्ठ अधिकार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

तसेच मुख्यालयी राहत असल्याचे पंचायत समितीमध्ये अद्यापपर्यंत लेखी पुरावे न देणार्या जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीमधील अधिकारी-कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करावा. मुख्यालयी राहत असल्याचे सादर केलेले बहुतांश ग्रामसभेचे ठराव खोट्या माहितीचे असल्यामुळे त्या-त्या गावात प्रत्यक्ष जाऊन त्या सर्व ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यतेबाबत उलटतपासणी करावी. उलटतपासणी करताना सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, काही ग्रामस्थ, घर भाड्याने दिलेले घरमालक या सर्वांचे लेखी जबाब घेण्यात यावेत. तसेच मुख्यालयी राहत असल्याचे ग्रामसभेचे ठराव देणार्या अधिकार्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे लेखी जबाब घेण्यात यावेत अशी देखील मागणी केली आहे.
