अंभोरेत कच्च्या घराची भिंत कोसळली, आजी बचावली

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. मात्र ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व निष्काळजीपणामुळे या लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे लाभार्थी लाभापासून वंचित राहिल्याची बाब अंभोरे ग्रामपंचायत हद्दीत उघडकीस आली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अंभोरे गावातील सुलोचना काशिनाथ गायकवाड या सत्तरवर्षीय आजी एका मातीकाम असलेल्या कच्च्या घरात एकट्याच राहतात. दोन्ही मुले उदरनिर्वाहकरिता बाहेरगावी राहतात. मागील हप्त्यात पाऊस झाल्याने घराच्या एका बाजूची भिंत कोसळली. सुदैवाने आजीचा सुखरूपपणे जीव वाचला आहे. सदर घटना समजताच अंभोरे ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना संगमनेर तालुका उपप्रमुख अनिल खेमनर, शिवाजी गवारे यांनी घटनास्थळी भेट दिली व कामगार तलाठी विक्रम ओतारी यांना पंचनामा करुन शासकीय मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली. तसेच ग्रामसेवक यांनाही रमाई आवास योजनेत नाव समाविष्ट करून घरकुल मंजूर करून द्यावे अशी विनंती केली आहे. तलाठी विक्रम ओतारी, कोतवाल भाऊसाहेब खेमनर यांनी पंचनामा करुन शासकीय मदत मिळवून देऊ असे आश्वासित केले आहे. रमाई आवास घरकुल योजनेकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला आदी दस्तावेज ग्रामपंचायत सदस्य अनिल खेमनर यांनी पाठपुरावा करुन ग्रामपंचायत कार्यालयात सादर केले आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 119084

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *