पोखरी हवेलीत पहिला मीयावाकी वृक्ष लागवड प्रकल्प

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निसर्गातील जैवविविधतेचे रक्षण व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पोखरी हवेली येथे पाच गुंठे क्षेत्रात ‘मिया-वाकी वृक्ष लागवड’ प्रकल्पाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रकल्पांतर्गत विशाल वृक्ष १५०, मोठे वृक्ष ५९२, मध्यमवृक्ष ३६०, तर लहान झाडे ४०० अशाप्रकारे नियोजन करून पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, कृषि विभागाचे विस्तार अधिकारी मदन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय पद्धतीने वृक्षाची जागा निश्चित करून वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रकल्पासाठी ग्रामस्थांच्या लोक सहभागातून दोन ट्रॅक्टर शेणखत उपलब्ध करण्यात आले.तसेच गावामध्ये रोजगार हमी योजनेतून बांबू लागवड, बिहार पॅटर्न वृक्ष लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, बायोगॅस प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फळबाग वृक्ष लागवड , जिल्हा परिषद शाळेत सेंद्रिय परसबाग, जलतारा इत्यादी कामे सुरू असून याचा फायदा सर्व ग्रामस्थांना होत आहे. तसेच अनेक मजुरांना नरेगा योजनेअंतर्गत काम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.अफार्म सेवाभावी संस्थेतर्फे ही गावात वेगवेगळी वृक्ष संवर्धन व पर्यावरण विषयक कामे वेगाने सुरू आहेत.

या प्रसंगी कृषी अधिकारी वाळीबा उघडे, अजित पावसे, ग्रामपंचायतचे सरपंच सुदाम खैरे, उपसरपंच सोमनाथ थिटमे, ग्रामपंचायत अधिकारी अनिता माळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी नरेगाचे सर्व मजूर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, नरेगाचे सर्व मजूर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 67 Today: 1 Total: 1098139
