अनुदानीतचे फायदे मिळवून देण्यासाठी दोन लाखांची मागणी! सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सहसचिवांना अटक; शिक्षकाची तक्रार आणि नाशिक ‘एसीबी’ची कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या नामांकित सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेत शासनाकडून 20 टक्के अनुदानीत तत्वावर नियुक्त असलेल्या शिक्षकाला भविष्यातील शासकीय लाभ विनाअडथळा मिळावेत यासाठी तीन लाखांची मागणी करण्यात आली, तडजोडीअंती ती दोन लाख रुपये निश्चित केली गेली. या दरम्यान गेल्या वर्षभरापासून महाविद्यालयात सहाय्यक शिक्षकाच्या पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकाने नियमांचा हवाला देण्याचा प्रयत्न केला असता सगळ्या संस्थांमध्ये असेच करावे लागते असे सांगून त्यांची बोळवणही केली गेली. त्यामुळे अखेर त्यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पथकाने संस्थेच्या कार्यालयात सापळा रचून 50 हजारांची रोकड स्वीकारताना संस्थेचे सहसचिव बाबुराव गवांदे यांच्यासह लेखणीस चंद्रभान मुटकूळे यांना अटक केली आहे. या वृत्ताने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणाची सुरुवात मंगळवारी (ता.24) दुपारी झाली. शासनाच्या ‘पवित्र पोर्टल’द्वारा ऑनलाईन सरळसेवा भरती झालेल्या एका शिक्षकाला सुरुवातीला पुणे महापालिकेच्या आणि नंतर सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या संगमनेर येथील महाविद्यालयात नियुक्ति देण्यात आली. सप्टेबर 2024 पासून ते या ठिकाणी कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी त्यांना संस्थेचे लेखणीस चंद्रभान मुटकूळे यांनी फोनद्वारे सहसचिव बाबुराव गवांदे यांच्या नावाचा हवाला देत भेटीसाठी कार्यालयात बोलावले. त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या गवांदे यांनी संबंधित शिक्षकाला तो 20 टक्के अनुदानीत तत्वावर कार्यरत असल्याची जाणीव करुन दिली. आजचे 20 टक्के भविष्यात 40, 60 याप्रमाणे 100 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे स्वप्नंही त्यांनी दाखवले.

संस्थेच्या सहसचिवांच्या या बोलण्याने गोंधळलेल्या त्या शिक्षकाला काही समजण्यापूर्वीच त्यांनी अनुदानासोबतच तुमचा पगारही वाढत जाणार असल्याचे व ती सगळी प्रक्रिया आपल्याकडून होणार असल्याचे सांगत दबाव निर्माण केला. शासनाने पोर्टलद्वारे नियुक्ति केली तरीही तुमचे भविष्य आमच्या हातात असल्याचा धाक दाखवून त्यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली. यावेळी सहसचिवांनी तक्रारदार शिक्षकासमोर शेखी मारताना ‘आम्ही इतरांकडून 5/10 घेतो, एक तूच आहेस ज्याने अजून रुपयाही दिला नाहीस’ असे म्हणत त्यांनी दोन-तीन दिवसांत सांगितलेली रक्कम जमा करण्याचे फर्मान बजावले. संबंधित शिक्षकाने ‘पवित्र पोर्टल’चा उल्लेख करीत वारंवार सवाल उपस्थित करण्याचाही प्रयत्न केला, मात्र सगळ्याच संस्थांमध्ये असाच प्रकार असतो असे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

तक्रारदाराचा विरोध पाहता सहसचिव गवांदे यांनी ‘तुझ्या करिअरची ही सुरुवात आहे, पैशांच्या बाबतीत खळखळ घातल्यास ते बर्बाद होईल’ असे सांगत त्यांना धाकात घेतले. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने माघार घेत तडजोडीची भूमिका घेतली. त्यातून दोन लाख रुपये रोख देण्यावर एकमत झाले आणि बैठक विस्कटली. हा सगळाप्रकार बेकायदा असल्याबाबत ‘त्या’ शिक्षकाचे ठाम मत असल्याने त्याने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. बैठकीत ठरल्यानुसार संबंधित शिक्षकाला शुक्रवारी (ता.27) दुपारी चारपर्यंत संस्थेच्या कार्यालयात रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे लाचलुचपत विभागाचे निरीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास तक्रारदार शिक्षकाला पैसे देवून कार्यालयात पाठवण्यात आले.

यावेळी कार्यालयात हजर असलेले संस्थेचे सहसचिव बाबुराव गवांदे यांनी तक्रारदार शिक्षकाने त्यांच्याकडे देवू केलेल्या रकमेला हात लावून ती लेखणीस चंद्रभान मुटकूळे यांना मोजून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार मुटकूळे यांनी सदरची रक्कम हातात घेताच सोबत असलेल्या एकासह दबा धरुन बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने झडप घालीत दोघांनाही रंगेहात जागेवरच पकडले. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार उरकल्यानंतर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास संबंधित शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरुन सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे सहसचिव बाबुराव बाबुराव राजाराम गवांदे व लेखणीस चंद्रभान काशिनाथ मुटकूळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7, 7 (ए) व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेत सदरचा प्रकार घडल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील 32 वर्षीय तक्रारदार शिक्षकाने महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्ट्लद्वारा 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सहशिक्षकाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवताना पहिल्या फेरीत पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून व दुसर्या फेरीनंतर 20 सप्टेंबर 2024 पासून संगमनेरच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेच्या भाऊसाहेब गुंजाळ-पाटील सह्याद्री महाविद्यालय येथे 20 टक्के अनुदानीत तत्वावर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या येथील नियुक्तिनंतर तब्बल नऊ महिन्यांनी ही घटना घडल्याने या प्रकरणाला वेगळा एँगल मिळण्याचीही शक्यता आहे. तूर्त या कारवाईने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.

