पळा रं.. पळाऽ.. खाडे आले बघा! अवैध व्यावसायिकांची पळापळ; ट्रॅक्टर चालवित थेट नदीपात्रात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तत्कालीन पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश यांच्यानंतर जिल्ह्यातील धडाकेबाज कारवायांना लागलेली दीर्घकालीन ओहोटी भरतीत रुपांतरीत होत असल्याचे चित्र गेल्याकाही दिवसांपासून जिल्ह्यात दिसू लागले आहे. नूतन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वये परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी गुन्हेगारी वर्तुळात धिंगाणा घातला असून जुगार, मटका, गुटख्यानंतर आता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या वाळू तस्करीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यासाठी त्यांनी चक्क वेशांतर करीत स्वतःच ट्रॅक्टर चालवित नदीपात्र गाठून वाळू तस्करांच्या जागेवरच मुसक्या आवळल्या. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी सुमारे 76 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यासह नऊ जणांवर कारवाई केली आहे. सदरची कारवाई नेवासा तालुक्यात झाली असली तरी त्यातून जिल्ह्यातील वाळू तस्करांच्या छाताडात धस्स झालं असून रात्रीच्या अंधारात कोणत्याही चारचाकीचा प्रकाश दिसताच नद्यांच्या पात्रातून ‘पळा रं.. पळाऽ खाडे आले बघा’ अशा हाकाट्या कानावर पडू लागल्या आहेत. या धडाकेबाज कारवायांमधून गेल्याकाही वर्षात मलिन झालेली पोलिसांची प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे, मात्र यात ‘सातत्य’ राहील की, नेहमीप्रमाणे ‘पहिले पाढे’ याबाबत साशंकता कायम आहे.

साखर उद्योगाने भरभराटीला आलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याला गुन्हेगारीचाही मोठा इतिहास आहे. जिल्ह्याचा प्रचंड भौगोलिक विस्तार असल्याने उत्तर आणि दक्षिण अशा दोनभागात विभागलेल्या जिल्ह्याची हद्द मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांसह पुणे, सोलापूर, नाशिक, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जावून भिडते. जिल्ह्यातून अनेक महत्त्वाचे महामार्ग आणि सोबतच लोहमार्गही जातात. शिर्डी, शनीशिंगणापूर, नेवासा, पाथर्डी, कर्जत, अहिल्यानगर यासारखी धार्मिक आणि अकोल्यासारखी पर्यटन स्थळे असल्याने देशभरातील नागरीकांची वर्दळही जिल्ह्यात नेहमीच बघायला मिळते. अशा स्थितीत जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून गुन्हेगारी कारवाया आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवणे मोठे जिकरीचे काम आहे. प्रचंड विस्ताराच्या कारणाने जिल्ह्याचे दोन प्रशासकीय भाग आणि सतरा पोलीस ठाणी असूनही अपवाद वगळता गुन्हेगारी घटना व अवैध व्यवसायाचे उच्चाटण करण्यात कोणत्याही पोलीस अधिक्षकांना आजवर यश आलेले नाही.

यापूर्वी जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून काम केलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी 2004-06 या आपल्या कार्यकाळात गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी स्वतःच वेशांतर करुन धडक कारवाया केल्या होत्या. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दित त्यांना अवैध व्यवसाय आढळत तेथील प्रभार्यांवरही त्यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांना मुख्यालयात पाठवले. त्यांच्यानंतर तब्बल अर्धा तपाने कृष्णप्रकाश यांनीही जिल्ह्यात खाकीचा ‘धाक’ निर्माण केला. त्यावेळी त्यांच्यासोबत दक्षिणेच्या अप्पर अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ज्योतीप्रिया सिंग यांनीही एकामागून एक धडाकेबाज कारवाया करताना अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष जिल्ह्याकडे वेधले होते. लांडे खून प्रकरणात भानुदास कोतकर व संदीप कोतकर यांना अटक करण्याची धमकही याच जोडीने दाखवली होती. या दोघांचा 2010-12 दरम्यानचा ‘तो’ कार्यकाळ सरुन आता दीड दशकाचा काळ लोटला असताना गेल्याकाही दिवसात पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने उपअधिक्षकांकडून सुरु असलेल्या एकामागून एक कारवायांचा धमाका त्याची आठवण करुन देत आहे.

जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभार्यांना सक्तीचे आदेश देताना एसपी सोमनाथ घार्गे यांनी ‘शिस्तभंगा’चाही उल्लेख केला होता. त्यानंतर आठ दिवसांतच त्यांच्या थेट अधिपत्याखाली असतानाही स्थानिक गुन्हे शाखेला अंधारात ठेवून त्यांनी परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक म्हणून नेवासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संतोष खाडे यांच्यावर भरवसा ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली ‘विशेष पथक’ स्थापन केले. या पथकाने गेल्या अवघ्या पंधरवड्यातच बहुचर्चित असूनही कारवाईपासून मुक्त असलेल्या जुगार, मटका आणि गुटख्याच्या व्यवसायाला लक्ष्य करीत त्यांच्यावर छापे घातले. या कारवायांमध्ये कोणाचाही मुलाहिजा न ठेवता गुन्हे दाखल झाल्याने या कारवाया प्रातिनिधीक ठरुन त्याचा जिल्हाभर परिणाम झाल्याचे बघायला मिळाले.

विशेष पथकाकडून अचानक छापेमारी होत असल्याच्या धास्तीने धंदा बंद ठेवून अनेक अवैध व्यावसायिक ‘गायब’ होत असताना रात्रीच्या अंधारात चालणारा वाळू तस्करांचा खेळ मात्र जिल्हाभर सुरुच आहे. विशेष पथकाचे प्रमुख संतोष खाडे आपल्या पथकासह बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ज्ञानेश्वर मंदिराजवळून जात असताना त्यांना विनाक्रमांकाचा वाळू भरलेला ट्रॅक्टर दिसल्यानंतर त्यांनी त्याला थांबवून चौकशी केली असता गोधेगावजवळील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा सुरु असल्याचे त्यांना समजले. मात्र सदरचा परिसर काटवनाचा आणि तस्करांना पळून जाण्यासाठी असंख्य रस्ते असलेला होता. त्यामुळे पोलीस उपाधिक्षक खाडे यांनी वेशांतर करीत चक्क पकडलेल्या ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हाती घेतले. हा प्रकार पथकातील अन्य सदस्यांनाही आचंबित करणारा होता. त्यानंतर त्यांनी पथकातील दोघा-तिघांना मजूर असल्याचे भासवण्यासाठी ट्रॉलीत बसवून थेट गोदावरीचे पात्र गाठले.

यावेळी या परिसरात तब्बल अर्धाडझन ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या मदतीने वाळू भरण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी पोलीस अधिक्षकांचाही ट्रॅक्टर तेथे पोहोचला. ट्रॅक्टरचे रंगरुप पाहून सुरुवातीला तो आपल्यातीलच असल्याची खात्री पटल्याने पात्रात बिनधास्त दरोडा घालणार्या तस्करांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र जसा ट्रॅक्टर त्यांच्याजवळ आला, तसा पाठीमागे बसलेल्या पथकातील कर्मचार्यांनी ट्रॉलीतून पात्रात उड्या घेत तस्करांच्या दिशेने धाव घेतली. तोवर आपण फसल्याची जाणीव झाल्याने पात्रात असलेल्या ट्रॅक्टर व जेसीबी चालकासह सगळ्यांची एकच पळापळ सुरु झाली. मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यातील प्रवीण नामदेव म्हस्के (रा.नेवासा खुर्द), विशाल दत्तात्रय ठोंबरे (वय 23) व अभिषेक भीमराव जाधव (वय 23, दोघेही रा.गोधेगाव, ता.नेवासा) या तिघांच्या मुसक्या आवळल्याच.

यावेळी या तिघांसह नदीपात्रातून पळून गेलेल्या वाळू तस्करांच्या कब्जातून सहा ट्रॅक्टर-ट्रॉली, एक जेसीबी मशिन व पाच ब्रास वाळूचा साठा असा एकूण 75 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात नऊजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पात्रातून अहोरात्र वाळूचोरी करणार्या तस्करांमध्ये पोलिसांचा ‘धाक’ निर्माण झाला असून रात्रीच्या अंधारात पात्रालगत एखाद्याही चारचाकीचा दिवा चमकताच ‘पळा रं.. पळाऽ.. खाडे आले बघा‘ अशा हाकाट्या कानावर येवू लागल्या आहेत. विशेष पथकाकडून जिल्ह्यात एकामागून एक अवैध व्यवसायांवर सुरु असलेल्या या धडक कारवायांमुळे एकीकडे समाधान व्यक्त होत असताना दुसरीकडे ही श्रृंखला कायम राहणार की, नेहमीप्रमाणे दहशत करुन तडजोडीने त्याचा अंत होणार याबाबत मात्र जिल्हावासियांच्या मनातील साशंकता कायम आहे.

गेल्याकाही वर्षात जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे स्तोम माजल्याने गुन्हेगारी घटनांचा आलेख उंचावत गेला आहे. त्यातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाल्याने खून, दरोडे, चोर्या, घरफोड्या, दुचाकीवरुन येवून सोनसाखळ्या लांबवण्याचे प्रकार या सारख्या असंख्य घटना घडूनही त्यातील बहुतेक प्रकरणांची उकल करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य शिगेला पोहोचल्याने जिल्ह्यातील सामाजिक शांततेत बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी अविश्वासाचे ढग जमा झाले आहेत, नूतन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या धडाकेबाज भूमिकेने ते निवळण्याची शक्यता असली तरीही पोलिसांच्या कारवाईतील सातत्याबाबत मात्र साशंकता कायम आहे.

