श्रीरामपूरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा फज्जा पालिका व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; दखल घेण्याची शहरवासियांची मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरात प्रमुख रस्त्यांवर उभी असलेली वाहने तसेच वाढलेल्या रहदारीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नगरपालिका व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी याची दखल घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता शहरवासियांतून जोर धरु लागली आहे.
श्रीरामपूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील व बाहेरगावचे नागरिक विविध कामांसाठी शहरात येतात. व्यापार्‍यांना दुकाने उघडी ठेवण्यास सायंकाळी 4 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली असल्याने त्यापूर्वी खरेदी करण्यासाठी शहरात मोठी गर्दी होत आहे. अनेक दुकानांसमोर वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याचे वाहने रस्त्याच्याकडेला दुतर्फा लावली जातात. दुचाकी व चारचाकी वाहनांचा त्यात मोठा भरणा असतो. या वाहनांमुळे इतर वाहनांना जाण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.

शहरातील मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर रोड यांसह इतर रस्त्यांवरही तीच अवस्था आहे. प्रामुख्याने मेनरोड व शिवाजी रोडवर दिवसातून अनेकदा गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होते. शिवाजी रोडवर महाराष्ट्र बँक, नाशिक मर्चंट बँक, बडोदा बँक, एलआयसी, एडीसीसी बँक़, नगरपालिका अशा आस्थापना असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रामाणात गर्दी होते. या बँक कार्यालयांसमोर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाच नाही. त्यामुळे ग्राहकही आपल्या आडव्यातिडव्या गाड्या लावतात. त्यामुळे निम्मा रस्ता हा वाहन पाकिर्ंगमध्येच अडकला जातो. गर्दीमुळे पायी चालणे मुश्कील होते.

ट्रकसारखे मोठे वाहन अडकल्यास वाहतुकीची कोंडी होते आणि ही वाहतूक सुरळीत करता करता सर्वसाधारण नागरिकांना एक ते दीड तास रस्त्यावरच अडकून पडावे लागते. अशावेळी अपघाताची शक्यता आहे. मेनरोडसह शिवाजी रोडवरील अनेक दुकानांना पार्कींगची सुविधा नसल्याने वाहनधारक बाजूला वाहने उभी करून खरेदीसाठी निघून जातात. कोंडी झाल्यानंतर ती सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी जातो. एखाद्या गंभीर रुग्णाला दवाखान्यात न्यायचे असल्यास कसे न्यायचे, असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांना पडतो. प्रमुख रस्त्यांवर दररोज अशी वाहतुकीची कोंडी होत असताना नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात वाहतूक पोलीसांची नियुक्ती असली तरी ते कुठेही दिसत नाहीत. कधीतरी त्यांचे दर्शन होते. शहरातील दुकानांवर तसेच विनामास्क फिरणार्‍यांवरही पोलीस व पालिका प्रशासन कारवाई करून दंडाची आकारणी करतात. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहने उभी करणारांवरही कारवाई करण्याची गरज आहे, प्रशासनाने ती कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.

Visits: 5 Today: 1 Total: 29638

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *