हिवरगाव पावसा टोलनाका बनलाय पाळीव गुंडांचा अड्डा! भाजप पदाधिकार्यावर जीवघेणा हल्ला; घटनेला राजकीय षडयंत्राचाही वास..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेकडों समस्या कायम असतानाही सक्तीच्या टोल वसुलीमुळे सतत चर्चेत असलेल्या हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावरुन पुन्हा एकदा गुंडगिरीची घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत प्रत्यक्ष कोणताही संबंध नसतानाही टोलवरील एका अधिकार्यासह 10 ते 15 गुंडांच्या टोळक्याने भाजपचे दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांच्या तिनही मुलांसह त्यांच्या जोडीदारावर प्राणघातक हल्ला केला. या हाणामारीत भाजपचे शहर उपाध्यक्ष व लाडकी बहिण योजनेचे तालुका सदस्य अतुल कासट यांच्यासह त्यांचे छोटे बंधु अमित यांनाही गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. सध्या या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन वाहनांचा एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये सुरु असलेल्या संभाषणात अचानक टोल कर्मचार्यांनी ‘एन्ट्री’ करुन थेट लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करुन चौघांवर केलेल्या या हल्ल्यामागे आता राजकीय षडयंत्र असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत जखमींकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शनिवारी (ता.26) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास हिवरगाव टोलनाक्याजवळ घडली. भाजपचे दिवंगत नेते, माजी नगराध्यक्ष राधावल्लभ कासट यांचे ज्येष्ठ सुपूत्र व भाजपचे विद्यमान शहर उपाध्यक्ष अतुल कासट आपले दोन्ही बंधु अमरिश आणि अमित यांच्यासह अन्य एकाला सोबत घेवून आनंदवाडी येथील ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. तेथून रात्री बाराच्या सुमारास ते चौघेही माघारी येत असताना टोलनाक्याजवळ पाठीमागून आलेल्या व नाशिकचा नोंदणी क्रमांक असलेल्या अन्य एका वाहनाने त्यांच्या वाहनाला धक्का मारला. त्यावरुन कासट यांनी आपले वाहन थांबवून त्यांच्याकडे विचारणा केली असता धक्का मारणार्या वाहनात बहुतेक किशोरवयीन मुलं असल्याचे त्यांना दिसले.
यावेळी तिघाही कासट बंधुंकडून ‘त्या’ वाहनातील कोवळ्या मुलांना वाहन चालवताना काळजी घेण्यासह झालेल्या नुकसानीबाबत व रस्त्यावर हा प्रकार घडला असता तर त्याच्या परिणामाबाबत साधारण बोलणे सुरु असतानाच अचानक टोलनाक्यावरील अमोल सरोदे नावाचा दुय्यम अधिकारी बुलेटवरुन आपल्या दोघा गुंड साथीदारांना घेवून तेथे आला व त्याने कोणताही संबंध नसताना अथवा संपूर्ण घटना माहिती नसतानाही कासट बंधुंना थेट शिवराळ भाषेत शिवीगाळ करु लागला. यावेळी त्याने ‘तुम्ही इतकी काय हुज्जत घालीत आहात, तुमचा माज जिरवू काय?’ अशा दादागिरीच्या भाषेत धमकीही दिली. त्यावर अमरिश कासट यांनी ‘हुज्जत घालीत नाही, दोन्ही गाड्यांचे झालेले नुकसान एकमेकांना सांगतोय’ असे उत्तर दिले.
त्यावर टोलवरील वसुलीतून माजलेल्या या वळुने ‘थांबा, आज तुमचा माजच मोडतो..’ असे धमकावून आवाज देत आठ ते दहा गुंडांना बोलावले. एका हाकेत हजर झालेले ते गुंडही काही क्षणात हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि दगडं घेवून हजर झाले. त्यावरुन टोलनाक्यावरच सेवेत असलेला अमोल सरोदे नावाचा हा गुंड आपली संपूर्ण टोळीच टोलनाक्यावर तैनात ठेवतो का? असाही प्रश्न उभा राहीला. अवघ्या काही क्षणात हजर झालेल्या सशस्त्र टोळक्याने अमोल सरोदे व मंगेश फटांगरे नावाच्या अन्य एका गुंडाच्या चिथावणीवरुन अतुल कासट यांच्यासह त्यांचे धाकटेबंधु अमरिश व अमित यांना मारहाण सुरु केली. या दरम्यान अमरिश कासट यांनी वारंवार विनाकारण का हाणामारी करताय अशी विचारणा करण्याचाही प्रयत्न केला.
मात्र कोणातरी अज्ञात इसमाने ‘आदेश’ देवून पाठविल्याप्रमाणे सरोदे, फटांगरे व त्यांच्या बोलावण्यावरुन हजर झालेल्या 10 ते 15 गुंडांच्या टोळीने लोखंडी रॉड, लाकडी दांडे, टोलनाक्यावरील तुटलेल्या बॅरिकेट्सचे पाईप आणि दगड-विटांचा मनसोक्त वापर करीत कासट बांधवांवर तुफान हल्ला चढवला. यावेळी हातात कोणतंही हत्यार नसलेल्या गुंडांनी लाथाबुक्क्यांचा वापर केला. हा प्रकार टोलनाक्याच्या परिसरातच सुरु होता, मात्र टोलवरील कोणताही अन्य अधिकारी अथवा कर्मचारी तेथे मारहाण होणार्यांच्या मदतीला गेला नाही. यावरुन सदरचा प्रकार टोलनाका प्रायोजक असल्याचेही ठळकपणे दिसून येत होते. या टोळक्याकडून आपणांस विनाकारण का मारहाण होत आहे? अशी शंका आल्याने अमरिश कासट यांनी आपल्या भावांसह मित्राला सावरीत त्या सगळ्यांना सीसीटीव्ही कक्षेत आणले.
त्यांचा हा निर्णय खूप फायदेशीर ठरला. त्याचवेळी पलिकडून आलेल्या काहींनी कासट यांना ओळखल्याने तेथून काही अंतरावर दहशत माजवणार्या गुंडांसह मारहाण सुरु होताच त्यांच्यात सामील झालेल्या कासट यांच्या वाहनाला धक्का मारणार्या कारमधील मुलंही आपले वाहन सोडून पळून गेले. या घटनेनंतर काही वेळाने तालुका पोलिसांचे वाहनही तेथे आले. त्यानंतर डोक्याला गंभीर इजा झाल्याने रक्तबंबाळ झालेल्या अतुल कासट यांच्यासह त्याचे धाकटे बंधु अमित यांना संगमनेरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतुल कासट यांच्या डोक्याला खोलवर जखम झाली असून टाके घालण्यात आले आहेत. या प्रकरणी कासट यांचा जवाब नोंदवण्यात आला असून तालुका पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही स्वरुपाची तक्रार दाखल झालेली नाही.
या प्रकरणाची माहिती समजताच रविवारी सकाळी भाजपने आपली नियमित मासिक बैठक रद्द करुन रुग्णालयात व त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनीही रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्याशी बोलून दोषींवर कठोर स्वरुपाची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेतून हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावरील कर्मचार्यांकडून प्रवाशांवर कशा पद्धतीने सशस्त्र दादागिरी केले जाते हे पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले असून या घटनेत प्रवाशांवर दहशत निर्माण करणार्या ‘त्या’ टोल कर्मचार्यांसह सहभागी प्रत्येकाचा शोध घेवून त्यांच्यावर कायद्याची जरब निर्माण करण्याची गरज आहे, अन्यथा येथील दहशतीचा परिणाम शहराची शांतता बिघडवण्यास कारणीभूत ठरु शकते.
भाजपचे शहर उपाध्यक्ष अतुल कासट आणि त्यांच्या दोन भावांना हिवरगाव टोलनाक्यावर झालेली मारहाण दुर्दैवी आहे. या प्रकरणात योग्य तपास होवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची गरज आहे. येथील टोलनाक्यावर यापूर्वीही प्रवाशांसोबत असभ्य वर्तन झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. आता अशाप्रकारे लाठ्या-काठ्यांनी मारहाण होण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून पोलिसांना कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या विषयी राजमार्ग प्राधिकरणासोबत पत्रव्यवहारही करणार असून त्यात टोलनाक्यावरील कर्मचार्यांच्या वर्तनाबाबत नियमांचा समावेश करण्याची मागणी करणार आहे.
अमोल खताळ-पाटील
आमदार, संगमनेर विधानसभा
व्यापार्यांमधून रोष..
शनिवारी मध्यरात्री टोलनाक्यावर झालेल्या मारहाण प्रकरणानंतर संगमनेरातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांची भेट घेवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर आता मंगळवारी (ता.31) उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि पोलीस उपअधिक्षकांना निवेदन देवून त्यांचे या घटनेकडे लक्ष वेधले जाणार आहे. सकाळी 11 वाजता संघटनेचे सदस्य प्रशासकीय भवनावर जाणार असून अधिकाधिक व्यापार्यांनी एकजूट व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे..
पोलिसांकडून गुन्हा दाखल..
शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या अतुल राधावल्लभ कासट (वय 47) यांनी रुग्णालयातून नोंदवलेल्या जवाबावरुन संगमनेर तालुका पोलिसांनी आरोपी अमोल सरोदे, मंगेश फटांगरे, किरण रहाणे या तिघांसह अज्ञात 8 ते 10 जणांवर घातक हत्यारांचा वापर करुन इच्छापूर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, फौजदारी स्वरुपाचा धाकदपडदशा निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करुन आगळीक करणे अशा भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.