प्रशासक साहेब; थोडं शहरातील अतिक्रमणांकडेही बघा! फेरीवाल्यांसह रिक्षांनी व्यापले रस्ते; त्यात खोदलेल्या रस्त्यांनी सामान्य मात्र त्रासले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता उठताच अंगात आलेल्या पालिका प्रशासकांनी नियोजनशून्य पद्धतीने एकाचवेळी अनेक रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदील दिल्याने शहरात अभूतपूर्व स्थिती आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नावाखाली शहरात जाणार्या प्रत्येक रस्त्यावर दीर्घकाळापासून खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने पालिका प्रशासक नेमकं काय करताय असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरेतरं शहराच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या बाजारपेठेत जाणार्या रस्त्यांची कामे करताना अधिक गांभीर्य आणि तत्परता दाखवण्याची गरज असते. मात्र पदभार स्वीकारताच ‘वर्गीकरणा’वरुन वादात सापडलेल्या प्रशासकांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच पालिकेचा अतिक्रमण विभागही हप्तेखोरीतच व्यस्त असल्याने खोदलेल्या रस्त्यांवरही फेरीविक्रेत्यांसह रिक्षाचालकांनी ठाण मांडले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक, महिला, वयस्क व विद्यार्थ्यांना होत असून पालिकेच्या नावाने दररोज बोटं मोडली जात आहेत.
राज्यातील सत्तानाट्य व त्यानंतर घडलेल्या सत्तांतरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या. वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांनी आपापल्या सोयीने प्रभागरचना, आरक्षण आदी गोष्टींच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणी दीर्घकाळ खोळंबल्याने संगमनेर नगर परिषदेसह राज्यातील बहुतेक सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकांचे राज्य आहे. संगमनेर नगरपरिषदेवरही 27 डिसेंबर 2021 पासून सुरुवातीला प्रांताधिकारी व त्यानंतर आता, मुख्याधिकारी प्रशासक आहेत. त्यांच्याच देखरेखीखाली सध्या शहरातील विविध रस्त्यांवर लोकावश्यक कामं सुरु आहेत.
दुर्गंधी आणि रोगराई अशा गैरसमजातून दीर्घकाळापासून विरोध होत असलेल्या संगमनेरच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामं गेली अनेक वर्ष ठप्प होते. मध्यंतरी लोकसभा आणि लागलीच विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्याने त्यात आणखी उशिर झाला. मात्र त्यात शिथीलता येताच पालिकेच्या विद्यमान प्रशासकांनी एकामागून एक कामांना हिरवा कंदील दाखवत रस्त्यांचे खोदकाम सुरु केले. संगमनेरची ऐतिहासिक बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून शहरात जाणारा रस्ता, याशिवाय गावठाणातील अनेक छोट्या-मोठ्या गल्ल्यांमधूनही सांडपाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्यास सुरुवात झाल्याने जागोजोगी दुचाकी, चारचाकी वाहनांना अडथळे निर्माण झाले.
आठ-पंधरा दिवसांचे ठिक, पण महिना उलटूनही त्यात बदल होत नसल्याने नागरिक अक्षरशः त्रासले आहेत. विद्यार्थी सायकल, मोपेडवरुन चालताना अडखळत आहेत, महिला व वयस्कानांही त्रास होतोय. खोदलेल्या रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्यही निर्माण झाले आहे. त्यातून श्वसनाचे विकार तर जडतच आहेतच आहेत, शिवाय कापडं, सुवर्ण, कटलरी व्यावसायिकांना त्याचे नुकसानही सोसावे लागत आहे. कहर म्हणजे ज्या रस्त्याचे खोदकाम करायचे आहे, त्याचे महत्त्व लक्षात घेवून, त्याला पर्याय निर्माण करुन कामं सुरु करणं अपेक्षित असताना एकाचवेळी मुख्य आणि पर्यायी अशा दोन्ही रस्त्यांना खोदून ठेवल्याचा प्रकारही या दरम्यान समोर आला. यासर्व प्रकारांमधून पालिकेचा कारभार नियोजनशून्य असल्याचेच चित्र दिसून आले.
खोदलेल्या रस्त्यांमधून वाट काढणार्या सामान्य नागरिकांना कमी त्रास होता की काय म्हणून अशा सर्व रस्त्यांसह शहरातील प्रत्येक मार्गावर फेरीविक्रेते, फळावाले, चपला-सँडल-कपडे अशी कितीतरी मंडळी आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर पथार्या, हातगाड्या ठोकून बसले आहेत. त्यात भंगारातल्या रिक्षा घेवून भरचौकात बिनधास्त झुंडीने थांबणार्या रिक्षाचालकांचे तर सांगायलाच नको. कायद्याच्या आईऽचा घोऽ करीत अगदी घरगुती गॅस सिलेंडवर चालणार्यापासून ते जोडूनतोडून केलेल्या रिक्षांचा अगदी बिनधास्त वापर करुन प्रवाशांची जीवघेणी वाहतूकही परस्पर केलेल्या थांब्यांवरुन सुरु आहे. मात्र पालिकेचे प्रशासक आपल्या कचरा ‘वर्गीकरणातच’ व्यस्त असल्याने सामान्यांचे मात्र दररोज कंबरडे मोडत आहे.
त्यातून प्रशासक साहेब; रस्त्यांचे जावू द्या हो, पण तेवढं रस्ते अडवून सामान्यांना त्रास देणार्या अतिक्रमणांकडे तरी बघा हो असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य संगमनेरकरांवर आली आहे. शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पालिका आणि पोलीस या दोघांनी एकत्रित कामं करणं अपेक्षित असताना दोन्ही यंत्रणा त्यांच्याच मस्तीत असल्याने सध्या शहरातील रस्त्यारस्त्यावरुन बेशिस्ती वाहत असून सामान्य माणूस मात्र पूरता मेटाकूटीला आला आहे.
संगमनेर शहराची वाहतूक म्हणजे मोठी समस्या बनलेली असताना त्यात आता पालिकेच्या नियोजनशून्य विकासकामांमूळे सामान्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. त्यातच शहरातील वर्दळीच्या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी अक्षरशः कहर केल्याने सामान्यांना जीव मुठीत धरुनच या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. त्यात बेकायदा रिक्षाथांब्यांनीही भर घातल्याने शहराची ओळख बेशिस्तांच्या यादीतून होवू लागली आहे. त्यात सुधारणा होण्यासाठी पालिका आणि पोलीस यंत्रणेने एकत्रितपणे काम करण्याची गरज असताना प्रशासनातील हे दोन्ही महत्त्वाचे घटक आपल्याच मस्तीत दंग असल्याने संगमनेरकरांच्या त्रासाला मात्र कोणीही वालि नसल्याचे चित्र आहे.