अवघ्या चार तासांतच नव्वद लाखांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड! संगमनेर तालुका पोलिसांची दमदार कारवाई; दरोडा घालून पळविलेला कंटेनर केला हस्तगत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिल्लीहून मारुती सुझुकी कंपनीची वाहने घेवून गोव्याला निघालेला कंटेनर शुक्रवारी पाच जणांनी हिवरगाव टोलनाक्यापासून पळवून नेला होता. या प्रकारानंतर कंटेनर चालकाने 100 क्रमांकावर तक्रार नोंदविल्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी अवघ्या चार तासांतच जलद तपास करीत या दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 90 लाख 2 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. उर्वरीत चार आरोपी अद्यापही पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत आज संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार हरियाणा येथील वाहनचालक हिदायत हनिफ खान हा आपल्या ताब्यातील कंटेनरमध्ये (क्र.एच.आर.38/डब्ल्यू.8120) मध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या सेलेरिया, वॅगनआर आणि स्वीफ्ट डिझायर अशा सात कार घेवून शुक्रवारी (ता.5) दुपारी चारच्या सुमारास दिल्लीहून गोव्याला जाताना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव टोलनाक्याजवळ चहापानासाठी थांबला होता.
यावेळी तो आपल्या वाहनातील टायरमधील हवा तपासत असताना काळ्या रंगाच्या बुलेटवरुन आलेल्या एका अनोळखी इसमाने त्याला कटरचा धाक दाखवताना शिवीगाळ करायला सुरुवात केली. या दरम्यान त्याने आपल्या इतर चार साथीदारांना तेथे बोलावून घेत संबंधित वाहनचालकाला दमदाटी करुन त्याच्या ताब्यातील कंटेनर, त्याच्या खिशातील 2 हजार 500 रुपये रोख आणि एटीएम कार्ड व मोबाईल घेवून तेथून पोबारा केला. अचानकच्या या घटनेने घाबरलेल्या कंटेनरच्या चालकाने लागलीच 100 क्रमांकावर फोन करुन घडल्या प्रकाराची माहिती दिली.
नियंत्रण कक्षाला तक्रार प्राप्त होताच त्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना देण्यात आली. उपविभागीय अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह सहाय्यक फौजदार इस्माईल शेख, पो.ना.बाबा खेडकर, राजेंद्र घोलप, यमना जाधव, चालक पो.ना.ओंकार शेंगाळ, शिवाजी डमाळे, दत्तात्रय मेंगाळ, पो.शि.अशोक गायकवाड, होमगार्ड नित्यानंद बापूगिरी गोसावी, अमोल दत्तू बुरकूल आदिंनी घटनास्थळी धाव घेवून तपासाला सुरुवात केली. वेगवेगळ्या व्यक्तिंकडून मिळविलेली माहिती, टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमधून मिळालेली दृष्य आणि पोलिसांच्या खबर्यांनी बजावलेली भूमिका यामुळे पोलिसांनी अवघ्या चार तासांतच आरोपीचा माग काढण्यात यश मिळविले.
मिळालेल्या माहितीची खातरजमा होताच पोलीस पथकाने रात्री दीडच्या सुमारास छापा घालीत मूळचा जुन्नर तालुक्यातील मात्र सध्या तालुक्यातील कुरण येथे वास्तव्यास असलेल्या अखलाक असीम उर्फ अखलाक असीफ शेख याला अटक केली. त्याच्याकडून टोलनाक्यावर दरोडा घालून पळवून नेलेला कंटेनर, त्यातील सात नवीन वाहने, कंटेनर चालकाकडून लुबाडलेले अडीच हजार रुपये, एटीएम कार्ड आणि मोबाईल असा सगळा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य चौघांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 395 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या घटना, चोर्या व घरफोड्यांनी तालुक्यातील नागरिक हैराण झालेले असताना तालुका पोलिसांनी अवघ्या चार तासांतच तब्बल 90 लाखांच्या दरोड्याचा तपास लावून मुख्य आरोपी गजाआड केल्याने तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांत संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाणी म्हणजे केवळ तक्रार दाखल करण्याची केंद्रे ठरली होती. मात्र कौठे कमळेश्वर येथील खून व दरोडा आणि 90 लाखांच्या दरोड्याचा तालुका पोलिसांनी विक्रमी वेळेत छडा लावून तालुक्यातील पोलीस ठाण्यांवर लागलेला निष्क्रीयतेचा डाग पुसण्याचा काही अंशी प्रयत्न केला आहे. शुक्रवारच्या दरोडा प्रकरणी तालुका पोलिसांनी जलद तपास करुन आरोपींसह मुद्देमालही हस्तगत केल्याने तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.