खरीपासाठी बी-बियाणे व औषधे वेळेसह मुबलक द्या ः थोरात संगमनेर प्रांत कार्यालयात खरीपाची ऑनलाइन आढावा बैठक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण देशात सध्या कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर येणार्‍या खरीप हंगामामध्ये सर्व शेतकर्‍यांना बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे वेळेवर व मुबलक देण्यासाठी कृषी विभागाने तयार असावे, अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.


संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयात ऑनलाईन खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या समिती सभापती मीरा शेटे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ, अशोक सातपुते, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, कृषी विक्रेते विवेक कासार, संतोष तक्ते, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, कृषी विभागाचे किरण अरगडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री थोरात म्हणाले, चालू हंगाम हा कोरोनाच्या संकटामुळे आव्हानात्मक आहे. शेतकर्‍यांना बियाणे, रासायनिक खते देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. तालुक्यात कुठेही तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गेल्या दोन-तीन वर्षांपासून ज्या बियाणांची मागणी जास्त आहे त्या वानांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्या बियाण्यांची उपलब्धता मुबलक करावी. कृषी निविष्ठा तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे. भरारी पथकाने आपले काम सुरू करावे. तसेच तालुक्यातील वातावरण फळबागा व भाजीपाल्यासाठी चांगले असल्याने या पिकांखालील क्षेत्र वाढवण्यावर कृषी विभागाने भर द्यावा, असेही ते म्हणाले. याच बरोबर कोरोनामध्ये मजूर स्थलांतर करणार नाही. याकरिता गावातच काम उपलब्ध करुन देताना महात्मा गांधी नरेगा अंतर्गत जास्तीत जास्त फळबागा लागवड कामाचे नियोजन कृषी विभागाने करावे. सोयाबीन पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त सोयाबीन बी पुरवता येईल यासाठी जागरूक असावे.

तर आमदार डॉ.तांबे म्हणाले, डाळिंब, कांदा, टोमॅटो ही तालुक्यातील आजची व्यवस्था मजबूत करणारे पिके असून कृषी विभागाने त्यावर विशेष लक्ष केंद्रित करून कृषी विद्यापीठाच्या मदतीने शेतकर्‍यांना चांगले बियाणे व मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील असावे. एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल शेतकर्‍यांमध्ये रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले. यावेळी ऑनलाइन पद्धतीने अनेक शेतकरी व पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.

Visits: 12 Today: 1 Total: 114838

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *