‘दोन्ही’ आमदारांची पोलीस निरीक्षकांवर ‘आगपाखड’! अटक टाळण्यासाठी ‘दबाव’ : आमदार खताळ; कार्यकर्ते असतील तरीही ‘अटक’ करा : आमदार तांबे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील कृषी अवजारांचे व्यापारी आणि दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांच्या तिनही मुलांसह अन्य एकाला हिवरगाव टोलनाक्याजवळ झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज संगमनेरातील माहेश्‍वरी समाज आणि व्यापारी असोसिएशनच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यासह विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे उपस्थित होते. या प्रकरणाला राजकीय वास असल्याची शंका सोमवारीच दैनिक नायकने वर्तवली होती. त्या पार्श्‍वभूमीवर मोर्चात सहभागी झालेल्या आमदार द्वयींकडून या विषयावर भाष्यही केले गेले. मात्र सरतेशेवटी टोलनाक्यावरील वाढत्या गुंडगिरीला तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे आणि उपनिरीक्षक शालोमन सातपुते कारणीभूत असल्याबाबत दोन्ही लोकप्रतिनिधींचे एकमत झाले आणि कार्यकर्ते कोणाचेही असोत या प्रकरणात माफी नाहीच असेही ठणकावण्यात आले.


माहेश्‍वरी समाजाचे अध्यक्ष गिरीश मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय भवनात पोहोचलेल्या या मोर्चात बोलताना आमदार खताळ म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून घटनेच्या दिवशीच पोलिसांना कठोर कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारांची गरज असल्याने त्या रात्रीपासूनच त्यांच्या संपर्कात आहे. लवकरच राजमार्ग प्राधिकरण आणि पोलिसांची संयुक्त बैठक घेवून सगळ्याच प्रश्‍नांना वाचा फोडणार आहे. टोलनाक्यावरील वाढती दादागिरी गंभीर असून हा प्रकार कोणाच्या आदेशावरुन सुरु आहे?, थेट जीवघेणी मारहाण करण्याइतपत हिम्मत कोठून आली?, कोण पाठबळं देतंय त्यांना? अशा सवालांची सरबत्ती करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांना टोला लगावला.


सीसीटीव्ही कॅमेर्‍यापासून दूर राहुन जाणीवपूर्वक केला जाणारा हा प्रकार खुपच गंभीर असून त्या मागील म्होरक्या शोधून काढावा लागेल असा राजकीय इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत. आरोपींनी या तिघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले. त्यांना अटक होवू नये म्हणून पोलिसांवर ‘दबाव’ आणला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. ही घटना राजकारणा पल्याडची असून सगळ्याच राजकीय पक्षांनी राजकारण सोडून टोलनाक्यावर वाढत चाललेल्या या प्रवृत्ती विरोधात एक होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


आमदार सत्यजीत तांबे यांनी या घटनेचा निषेध करुन कासट कुटुंबाचे संगमनेरशी असलेले नाते विशद् केले. अतुल कासट बालपणीचे मित्र असल्याची आठवण सांगत त्यांनी कासट परिवाराशी असलेल्या संबंधांवर झोत टाकला. मारहाणीचा व्हिडिओ पाहुन हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे दिसते. मारहाण करणारे कोण आहेत, त्यांचा कोणत्या पक्षाशी संबंध आहे या भानगडीत न पडता ज्यांनी मारहाण केली आहे, ते आमचे कार्यकर्ते असतील तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यात कोणतीही शंका नसल्याचे सांगत त्यांनी प्रकरणातील आरोपी पक्षाशी संबंधित असले तरीही त्यांना या प्रकरणात दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.


शनिवारी घडलेल्या घटनेवर भाष्य करताना आमदार तांबे यांनी या घटनेत पोलिसांनी मोठी चूक केल्याचे निरीक्षण नोंदवले. महिनाभरापूर्वीच टोलनाक्यावर असाच प्रकार घडला होता. त्यावेळी दोघा कर्मचार्‍यांना कामावरुन काढण्यातही आले होते. मात्र तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी टोलनाका व्यवस्थापनाला पत्र देवून बडतर्फ केलेल्या ‘त्या’ दोघांनाही पुन्हा कामावर रुजू करण्यास भाग पाडले असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्याचवेळी योग्य कारवाई झाली असती तर, कदाचित शनिवारची घटना घडली नसती. एखादा पोलीस निरीक्षक अशाप्रकारचे पत्र देवू शकतो का? असा सवाल उपस्थित करीत आमदार तांबे यांनी थेट तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्यावरच निशाणा साधला.


टोल व्यवस्थापकाला लिहिलेल्या ‘त्या’ पत्राचा उल्लेख करीत आमदार तांबे यांनी ‘गुन्हा दाखल झाला आहे, परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही’ असे सांगून ‘त्या’ आरोपींना कामावर घ्या असे सांगणारे पोलीस निरीक्षक कोण? असा खडा सवालही त्यांनी प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व खुद्दू पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या समोर उपस्थित केला. गुन्ह्यातून काही निष्पन्न होत नसल्यास तो मागे घेण्याचा अधिकार पोलिसांना आहे, मात्र अशाप्रकारचे पत्र देवून कामावर घ्या सांगणे पूर्णतः बेकायदेशीर असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.


आमदार खताळ यांनी उपस्थित केलेल्या ‘दबावा’चे उत्तर देताना आमदार तांबे यांनी अशाप्रकारे हाणामार्‍या, भांडणं, अरेरावीने बोलण्याचे कदापि समर्थन होवू शकत नसल्याचे ठणकावताना या प्रकरणात ज्यांचा कोणाचा सहभाग आहे, मग ते आपल्याशी संबधीत असतील तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी दिलेल्या ‘त्या’ पत्राच्या चौकशीसह घटनेच्या दिवशी टोलनाक्यावर जावूनही कोणत्याही कारवाईशिवाय परतलेल्या पोलीस उपनिरीक्षक शालोमन सातपुते यांच्यावर हलगर्जीपणा केल्यावरुन कारवाईची मागणीही त्यांनी यावेळी केली.


शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर संगमनेर शहरातील व्यापारी वर्गात मोठा रोष होता. आजच्या मोर्चाच्या रुपाने तो बाहेर पडला. या घटनेतील आरोपींना राजकीय पार्श्‍वभूमी असल्याने संगमनेरात एकमेकांवर राजकीय शितोंडे उडणार हे रविवारीच स्पष्ट झाले होते. आजच्या मोर्चातून तसा प्रसंगही उभा राहीला आणि आमदार द्वयींनी राजकीय धुळफेकही केली. मात्र सरतेशेवटी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील वाढत्या गुन्हेगारीसह टोलनाक्यावरही गुंडगिरीला पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांचे उघड पाठबळ असल्यानेच अशा घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करुन कारवाईच्या मागणीवर मात्र दोन्ही आमदारांचे एकमत झाल्याचे या मोर्चातून दिसून आले. या प्रकरणात वैद्यकिय अहवाल प्राप्त झाल्यानंतर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होईल. सदरचे कलम अजामिनपात्र असल्याने आरोपींना दीर्घकाळ कारागृहात रहावे लागेल.

Visits: 94 Today: 2 Total: 255872

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *