पालिका भ्रष्टाचार्‍यांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून जनतेने विधानसभेत पाठविले नाही!

पालिका भ्रष्टाचार्‍यांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून जनतेने विधानसभेत पाठविले नाही!
कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून घेतला विरोधकांचा समाचार
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे राजकारण राज्यात गाजते. कोणत्या ना कोणत्या कारणाने पालिकेबाबतचे वृत्त माध्यमांतून सतत झळकत असते. आता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विरोधकांचा थेट प्रसिद्धी पत्रकातून खरपूच समाचार घेत विविध प्रश्नांची सरबत्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. मला कमी मते पडली, पराभव झाला तरी मी प्रत्येक प्रभागात राजकारण न करता विकासकामे करत आहे. लोकप्रिय ताईंच्या अतिलोकप्रिय पुत्राने आधी सांगावे की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तुम्हांला असलेले तीस हजारांचे मताधिक्य कुठे गेले? शेकडो कोटी रुपये निधी आणल्याचे सांगता, पण कुणाला किती कोटी रुपये कमिशन मिळाले हे का सांगत नाही. त्यामुळेच नगरपालिका भ्रष्टाचार्‍यांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून जनतेने विधानसभेत पाठविले नसल्याचा टोलाही लगावला.

याविषयी अधिक बोलताना नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, छातीठोकपणे सांगतो कि मी नगराध्यक्ष व्हायच्या आधी 10 वर्षांत झाली नाहीत इतकी कामे मी नगराध्यक्ष झाल्यापासून साडेतीन वर्षांत केलेली आहेत. शहराच्या प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व जनतेला ती कामे माहिती आहेत. तुम्ही आमदार असताना मी नगराध्यक्ष झाल्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेला तुम्ही निधी मिळू दिलेला नाही. उलट कारभारात अडथळे आणले, 5 नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून मी दिल्लीपासून प्रयत्न करत होतो; परंतु तुम्ही अडथळेच आणले म्हणून जनतेने तुम्हांला घरी बसवले हे ध्यानात घ्या. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा अडथळे तुम्हीच आणले.

कोपरगावच्या हक्काचे क्रीडासंकुल पळविणारेच विचारतात क्रीडांगणासाठीची राखीव जागा घ्यायचा प्रयत्न का केला नाही. नगरपरिषदेची आर्थिक कुवत नसताना शहरात अजूनही असलेल्या अनेक आरक्षित जागा घ्यायचे ठरवले तर किती कोटी रुपये लागतील याचे भान आहे का? एकीकडे नगरपरिषदेला निधी मिळू द्यायचा नाही, पण दुसरीकडे माझ्याविरुद्ध बातम्या पेरायच्या हे उद्योग बंद करा. नवीन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करणार्‍या संस्थेला तुम्हीच हाकलून लावले, त्याच निसर्ग कन्सल्टन्सी संस्थेने आता वसुलीसाठी नगरपरिषदेवर दावा ठोकला आहे. निकाल विरोधात गेला तर होणारे प्रचंड आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण? तुमच्यापैकी कुणी किती पैसे त्या योजनेच्या ठेकेदाराकडून उकळले याचा शोध घ्या. मेनलाईनवर नळजोड घेऊन प्रचंड पाणी वापरणारे पाणीचोर तुमच्याच भोवती आहेत. नेत्यांत धमक असेल तर त्यांनी त्यांच्याच चेल्यांना मेनलाईनवरील त्यांचे नळजोड स्वतःहून तोडण्याचे आदेश द्यावेत. नगरपरिषदेने तसे करायचे ठरविल्यास शहरातील अनेक रस्त्यांची तोडफोड करावी लागेल.

किती सर्वसाधारण सभा झाल्या याचा हिशोब ठेवण्यापेक्षा शहरात झालेल्या विकासकामांचा हिशोब करा. तुमच्या गटाच्या ताब्यात सत्ता असताना तुम्ही करून ठेवलेले घोळ निस्तारण्यातच अधिकारी कर्मचार्‍यांचा वेळ जात आहे. नगरसेवकांना पुढे करून दररोज काहींना माहिती मिळविण्यासाठी अर्ज करून तुम्ही नाहक वेळ घेता आहात. तुमचे काही नगरसेवक ठेकेदारांना दमबाजी करून काही कामात भागीदार आहेत. त्या कामांचे बिल द्या असे मला आजही सांगताहेत. शहरातील -हेम मेडिकल ते एस. जी. विद्यालय रस्ता, धारणगाव रस्ता, गुरुद्वारा रस्ता, छत्रपती संभाजी महाराज चौक ते इंदिरा पथ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा, खोका शॉप इत्यादी कामे लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. त्यावर कार्यवाही सुरू असताना सभा ऐकूच येत नाही असे कारण देऊन अडथळे कोण आणतात हे जनतेला चांगले माहित आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे व अनेक रस्त्यांच्या कामाचे कार्यादेश दिलेले आहेत. पावसाळ्यामुळे कामे थांबलेली आहेत. तुमच्याच जवळचे अनेक ठेकेदार आहेत, त्यांना विचारा शहरात किती कामे झाली. अनेक वर्षे नगरपरिषद ताब्यात असताना काही करायचे नाही व सत्ता हातातून गेल्यावर बोंब मारायची हे डावपेच बंद करा. नगरपरिषदेत नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळते, स्वच्छता सर्वेक्षणात कोपरगाव नगरपरिषदेचा नंबर 16 वा आला हे दिसत नाही का? तुमच्या काळात साठवण तलावातील मासे पकडण्याचा ठेका वार्षिक फक्त 1 लाख 6 हजार रुपयांना दिला होता, आता मी तोच ठेका वार्षिक 14 लाख 14 हजार रुपयांना दिला. कमी पैशांत मासे पकडण्याचा ठेका देऊन 5 वर्षांत नगरपरिषदेचे किमान 69 लाख रुपये उत्पन्न तुमच्याच काळात बुडाले, कुणाच्या खिशात किती गेले याचा राजपुत्राने आधी शोध घ्यावा. पाकिटवाले-टाळ्या पिटणारे गोळा करून भाषणे ठोकून समाधान मिळवू नका. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शन-सल्ला घेतला तर फार बरे होईल.

बहुमताचा वापर करून खोका शॉप, रस्त्यांची कामे यात तुम्हीच अडथळे आणत आहात हे जनता जाणून आहे. शहरात खोका शॉप व्हावीत यासाठी तुम्ही काय दिवे लावले होते. आम्ही खोका शॉपसाठी काय प्रयत्न करतोय याची माहिती न घेता आरोप करणार्‍या बातम्या छापण्यात वेळ घालवू नका. नगरपरिषदेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राजकीय खटपटी सुरू केलेल्या आहेत. चमचे-चेले पुढे करून निवडणुकीपर्यंत तुमचे चाळे वाढत जाणार आहेत. तुमच्या काही नगरसेवकांचे तुमच्याबद्दल खरे काय मत आहे हे जाणून घ्या. मी प्रसिद्धीसाठी दिवसरात्र कॅमेरे व चेले सोबत घेऊन मिरवत नाही. सर्व प्रभागात झालेली कामे जाऊन बघा, मग कळेल किती कामे झालेली आहेत-सुरू आहेत-प्रस्तावित आहेत.

निवडणुकीत जय-पराजय होत असतो. या आधी सहकारातील कोट्यावधी रुपये उधळूनही शंकरराव कोल्हे यांचा विधानपरिषद निवडणूक व बिपीनराव कोल्हे यांचा विधानसभा निवडणुकीत दोनदा व ताईंचा एकदा पराभव झालेलाच आहे. मी तर तुमच्याइतका महान नाही. तुमच्या कारखान्यावर 200 कोटी रुपये कर्ज/तोटा ही कुणाच्या कर्तृत्वाची पावती आहे? कारखान्याला पुरवठा कोण करतय जरा सांगाल का? असे अनेक प्रश्न आहेत याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत असे वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

 

Visits: 132 Today: 1 Total: 1589503

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *