संगमनेर वनविभागाकडून चामडी वाचवण्याचा प्रयत्न! बिबट्यांचे माणसावर वाढते हल्ले; ‘त्या’ तरुणाचा खून झाल्याचाही दावा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या मानवी संचारासाठी जीवघेणी ठरु लागली असून त्यातून मानव आणि बिबट्यातील संघर्षही वाढला आहे. मात्र वनविभागाकडून त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने संगमनेरात निष्पाप नागरिकांना नाहक जीव गमावण्याची वेळ आली आहे. रविवारी हिवरगाव पावसा परिसरातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला असून या भयानक घटनेक हिंस्त्र श्‍वापदाच्या हल्ल्यात 34 वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे. गेल्या अवघ्या चार महिन्यात अशाप्रकारच्या हल्ल्यात गेलेला हा चौथा बळी ठरला असून त्यातून नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मात्र वनविभागाकडून आपली चामडी वाचवण्याच्या प्रयत्नात या हल्ल्यांनाही वेगळा रंग दिला जात आहे. रविवारच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणावर बिबट्यानेच झडप घातल्याचे पोलीस सांगत असताना वनविभागाने मात्र हा खुनाचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली आहे. त्यावरुन वनविभागाच्या कारभाराबाबतही संशय निर्माण झाला आहे.


अवघ्या चार महिन्यात घडलेला हा चौथा भयानक प्रकार रविवारी (ता.22) सकाळी साडेदहाच्या सुमारास समोर आला. या घटनेत एका तरुणाचे छिन्नविछीन्न अवस्थेत शिराचा भाग नसलेले धड हिवरगाव पावसा येथील वनविभागाच्या हद्दित असल्याची माहिती पोलिसांना समजली. सुरुवातीला हा प्रकार खुनाचा असावा अशी शंका आल्याने तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार अमित महाजन, आशिष आरवडे व सचिन उगले यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी वनविभागाच्या हद्दितून जाणार्‍या रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याला एका दुचाकीसह रक्ताळलेली चप्पल आढळून आली. तर, तेथून पुढे जवळपास दोनशे फूट अंतरावर डोंगराच्या दिशेने सदरील तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत आणि अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत असलेला मृतदेह काटेरी झुडपांमधील दगडांमध्ये अडकल्याचे आढळून आले.


घटनास्थळावरील त्यावेळची स्थिती आणि तेथून पुढे डोंगराच्या दिशेने जवळपास दोनशे फूट अंतरावर सापडलेला मृतदेह याचे सखोल निरीक्षण केल्यानंतर सदरचा प्रकार खुनाचा नव्हेतर हिंस्त्र श्‍वापदाच्या आणि त्यातही बिबट्याच्या हल्ल्यातून घडलेला असावा या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले. त्याबाबत वनविभागालाही माहिती देण्यात आली. त्यानुसार संगमनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे आपल्या लवाजम्यासह घटनास्थळी हजर झाले. यावेळी त्यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार खुनाचा असावा अशी शंका त्यांना आली आणि त्यांनी ती उपस्थित असलेल्या पोलिसांकडे व्यक्तही केली. सदरील तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला असेल असे वनविभागाचे म्हणणे होते. मात्र पोलिसांनी जागेवरच ते खोडून काढीत मयत तरुणाची दुचाकी आणि तेथेच सापडलेली त्याची चप्पल, तेथून पुढे दोनशे फूट उंचावर सापडलेला अर्धवट मृतदेह यावरुन हा प्रकार बिबट्याच्या हल्ल्याचाच असल्याचे मत व्यक्त केले.


यावेळी काहींनी तरसाच्या हल्ल्याचाही संशय व्यक्त केला, मात्र तरसाला मानवी मृतदेह इतक्या उंचावर ओढून नेणं अशक्य आहे. त्याचवेळी बिबट्या मात्र अशाप्रकारे शिकार केलेला प्राणी दूरवर ओढीत नेवून प्रसंगी तो थेट झाडावरही घेवून जात असल्याचे विविध दाखले असल्याने आणि यापूर्वीही याच परिसरात बिबट्याने माणसांवर हल्ले केल्याच्या पाठोपाठ तीन घटना ताज्या असल्याने सदरील तरुणाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यातच झाला असावा असे समजण्यास मोठा वाव आहे. शिवाय घटनेच्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास एका शेतकर्‍याने या परिसरातच बिबट्याला बघितल्याचेही समोर आले असून मयत तरुणालाही दुचाकी उभी करुन रस्त्याच्या कडेला बसलेले पाहीले गेले आहे. मात्र या घटनेला वेगळा रंग देवून वनविभागाकडून आपली चामडी वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा यानिमित्ताने हिवरगाव परिसरात सुरु आहे.


वास्तविक गेल्या ऑगस्टमध्ये निमगाव टेंभी परिसरात अंगणात खेळणार्‍या एका दीड वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने झडप घातली होती, त्यात गंभीर जखमी होवून तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या दीड महिन्यात 11 सप्टेंबररोजी त्याच गावातील वर्पे वस्तीवर भरदिवसा घराबाहेर धुणे धुणार्‍या संगिता शिवाजी वर्पे (वय 40) या महिलेवर बिबट्याचा हल्ला होवून त्यांचा बळी गेला. तर, त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच ऐन विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देवगावजवळील पानमळा परिसरात सायंकाळी गवत कापणार्‍या योगिता आकाश पानसरे (वय 38) या विवाहितेला बिबट्याने फरफटत नेल्याने त्यात त्यांचा जीव गेला. खरेतर निमगाव टेंभीतील चिमुरडीवरील हल्ल्यानंतर वनविभागाने तत्काळ उपाययोजना केल्या असत्या तर कदाचित त्यांनतर झालेल्या दोन्ही घटना टाळता आल्या असत्या.


मात्र केवळ जंगलातील लाकडांवरच लक्ष असलेल्या वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने देवगावसह पंचक्रोशीतील नागरिक संतप्त झाले व त्यांनी महामार्ग रोखून धरला. त्यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंदोलकांची भेट घेत तेथूनच थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क करुन त्यांना घडलेल्या घटना आणि लोकांच्या भावना सांगून नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्याची विनंती केली. या घडामोडीनंतर गेली दोन महिने वनविभागाने मोठा ‘शो’ करुन वेगवेगळ्या विभागात पिंजरे लावले, शार्पशूटरही आणले आणि आत्तापर्यंत डझनभर बिबटेही पकडले, मात्र लागोपाठ तीनजणांचे बळी घेणार्‍या नरभक्षकाचे काय झाले हे अद्यापही गुलदस्त्यातच असल्याने रविवारी हिवरगाव परिसरात पुन्हा एकाचा बळी गेला.


त्यामुळे आता संगमनेरात वनविभागाच्या कारभाराबाबत मोठा संताप निर्माण झाला असून येथील अधिकारी केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यातच मश्गुल असल्याचे आरोप होवू लागले असून येथील वन अधिकार्‍यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही होवू लागली आहे. एकंदरीत गेल्या चार महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात चारजणांचे बळी जावूनही वनविभाग अद्यापही त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याचे समोर येत असून हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.


रविवारी (ता.22) हिवरगाव पावसा शिवारातील वनविभागाच्या हद्दित घडलेल्या या भयानक घटनेत रामनाथ सूर्यभान गुरुकुले (वय 34, रा.सावरगाव तळ) या तरुणाचा जीव गेला असून श्‍वापदाने त्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडून ते छिन्नविछिन्न केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार बिबट्याच्या हल्ल्यातूनच घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असला तरीही वनअधिकारी मात्र त्याला खुनाच्या घटनेचा रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याने प्रत्यक्ष शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच त्यावरील गुढ उकलणार आहे. मयत तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Visits: 24 Today: 4 Total: 162595

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *