अकोलेतील चित्रकाराच्या चित्रांचे जहांगीर आर्टमध्ये भरणार प्रदर्शन सुप्रसिद्ध चित्रकार मीनानाथ खराटेंवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
नायक वृत्तसेवा, अकोले
येथील सुप्रसिद्ध चित्रकार मीनानाथ खराटे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरत आहे. अकोल्यातील कला शिक्षकाचे प्रदर्शन प्रथमच जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरणार असल्याचे सर्वच क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अकोल्याचे भूमिपुत्र असणारे मुंबईस्थित प्रसिद्ध चित्रकार सुरेश आवारी यांच्या चित्रांचे प्रदर्शन यापूर्वी तेथे झाले आहे. विशेष म्हणजे सुरेश आवारी व बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष सुरेंद्र जगताप यांच्या हस्तेच या प्रदर्शनाचा शुभारंभ होणार आहे. 31 मे ते 6 जून या कालावधीत भरणार्या मूर्त-अमूर्त प्रदर्शनात चित्रकार खराटे यांची मूर्त स्वरूपातील चित्रे व त्यांचे मित्र जितेंद्र सोनवणे यांनी अमूर्त स्वरूपातील चित्रे आणि पंकज गडाख यांच्या शिल्पाकृती यांचा समावेश आहे.
चित्रकार खराटे यांनी काढलेली अकोले शहरातील जुने वाडे, गल्ल्या विशेषतः येथील चिरेबंदी परिसरातील जुन्या वास्तू, तसेच भंडारदरा परिसरातील अभिजात निसर्ग यांची चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. आपल्या जुन्या वास्तूंमध्ये वास्तूकलेच्या दृष्टीने सौंदर्य असते. आता काळाच्या पडद्याआड जात चाललेल्या या वास्तूंच्या स्मृती या चित्रांद्वारे त्यांनी जपल्या आहेत. आपण ज्या भवतालात रहातो त्याचे परिणाम, संस्कार आपल्यावर होत असतात ते मांडण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे खराटे यांनी सांगितले.
सध्या चित्रकार खराटे हे अकोलेतील मॉडर्न हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून काम करतात. कलनिकेतन नाशिक आणि जे. जे. स्कूल मुंबई येथे त्यांनी कलेचे शिक्षण घेतलेले आहे. येथील अगस्ति आश्रमात अगस्ति ऋषींच्या जीवनावर त्यांनी काढलेली चित्रे भाविकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहेत. संगमनेरचे प्रांत कार्यालाय, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर तसेच महसूल आयुक्त कार्यालय नाशिक येथेही त्यांची चित्रे लावलेली आहेत. देशाच्या विविध भागांबरोबरच परदेशातही त्यांची चित्रे पोहोचली आहेत. प्रवरेच्या काठावरील कुंभेफळ हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचे आजोबा जुन्या पिढीतील शिल्पकार होते. आजोबांनी घडविलेल्या मूर्ती, प्रवरेचा खळाळ, अकोल्याचा निसर्ग आणि सभोवतालचे ग्रामीण जीवन पाहत ते लहानाचे मोठे झाले हे सर्व त्यांच्या चित्रांचे विषय आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक चित्र प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. परंतु मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत आपले चित्र प्रदर्शन भरावे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते त्यादृष्टीने अकोल्याच्या एका कलाकाराचे हे स्वप्न पूर्ण होत आहे.