महिलेचा बळी गेल्यानंतर संगमनेर पोलीस ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये! पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख; वाहनतळासह अतिक्रमणं हटवून वाहतुकीवर लक्ष्य केंद्रीत करणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐन सणाच्या दिनी संगमनेर बसस्थानकाजवळ झालेल्या अपघातात आज सकाळी एका वयोवृद्ध महिलेचा बळी गेला. अरुंद रस्ता, बोकाळलेली अतिक्रमणं आणि प्रचंड रहदारी ही या अपघातामागील मुख्य कारणं असल्याचे वृत्त दैनिक नायकने प्रसिद्ध करताच संगमनेरातील यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यातूनच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख तत्काळ ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये आले असून त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेला येथील बेकायदा वाहन तळ हटवून तेथील काही अतिक्रमणंही उध्वस्त केली. त्यामुळे अपघातानंतर काही वेळातच हा महामार्ग मोकळा भासू लागला. वाहतूक शाखेत आणखी मनुष्यबळ वाढवून शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर लक्ष्य केंद्रीत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दैनिक नायकशी बोलताना दिली.

आज (ता.2) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकासमोरील गुरुद्वाराजवळ मोपेड आणि मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तालुक्यातील ओझर खुर्द येथील विमल कारभारी शिंदे या सत्तरवर्षीय वृद्ध महिलेचा बळी गेला. या अपघातामागे दत्त मंदिराच्या समोरील बाजूस बोकाळलेली अतिक्रमणं आणि त्यातच श्रीरामपूर येथील खासगी प्रवासी वाहतुकदारांसह शहरातील मालवाहतूक रिक्षावाल्यांनी अनधिकृत थांबा केलेला आहे. हे दोन्ही घटक महामार्गावरील वाहतुकीकडे सपशेल दुर्लक्ष करीत मनमानी पद्धतीने वाहने उभी करणे अथवा त्यांचे संचलन करीत असल्याने या परिसरात नेहमीच अपघाताची शक्यता दाटलेली असते.

नाशिक, पुणे व मुंबई या महानगरांच्या त्रिकोणीय श्रृंखलेसह शिर्डीकडे जाणार्‍या बसेसची संगमनेरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे संगमनेरचे बसस्थानक जिल्ह्यातील सर्वाधिक व्यस्त स्थानकांमध्ये गणले जाते. येथून दररोज 60 पेक्षा अधिक बसेस सुटतात तर दिवसभरात राज्याच्या कानाकोपर्‍यातून दोनशेहून अधिक बसेसची संगमनेर बस आगारात वर्दळ असते. त्यामुळे साहजिकच या परिसरात प्रवाशांचीही नेहमीच मोठी गर्दी असते. त्यातच जुन्या व नव्या शहराच्या ऐन मध्यावर असल्याने या परिसरातील बाजारपेठही मोठी समृद्ध झालेली आहे. त्यामुळे बसस्थानकाचा परिसर विविध दुकाने, दालने व त्यात भर म्हणून फेरीविक्रेते व अतिक्रमणधारकांनी नेहमीच गजबजलेला असतो. अरुंद रस्ता, प्रचंड वर्दळ आणि त्यात बेकायदा वाहनतळासह भररस्त्यातील अतिक्रमणांमुळे शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, महिला व वयोवृद्धांना या भागातून जातांना जीव मुठीतच धरावा लागतो. त्यातून पदोपदी अपघाताची शक्यता दाटलेलीच असते. गेल्या काही कालावधीत या गंभीर गोष्टीकडे कोणीही लक्ष्य न दिल्याने आज सकाळी दुचाकीवरुन जाणार्‍या वृद्ध दाम्पत्याच्या वाहनाला अपघात झाला आणि त्यात मोपेडवर पाठीमागे बसलेल्या सत्तर वर्षीय वयोवृद्ध महिलेला नाहक आपला जीव गमवावा लागला. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण तयार झाले होते.

याबाबतची वस्तुस्थिती मांडताना दैनिक नायकने या भागातील बेकायदा प्रवासी व मालवाहतूक वाहनांचा तळ आणि बोकाळलेल्या अतिक्रमणांमुळेच एका महिीलेचा बळी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची तत्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागास पाचारण केले व दत्त मंदिराच्या समोरील बाजूस असलेली काही अतक्रमणं हटवत येथील बेकायदा वाहनतळावर उभी असलेली खासगी वाहने हुसकावून लावली. त्यानंतर गर्दीत दाटलेला हा महामार्ग मोकळा भासू लागला, मात्र त्याचा हा मोकळेपणा पुढील किती दिवस टिकेल याबाबत मात्र कोणतीही शाश्वती नाही. दैनिक नायकच्या वृत्तानंतर अवघ्या तासाभरातच यंत्रणा जागी झाल्याने परिसरातील अनेकांनी दैनिक नायकच्या वास्तव लिखाणाचे कौतुक केले आहे.

सध्या पुणे-नाशिक महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने वाहने रेंगाळत आहेत. बसस्थानकाच्या समोरील बाजूचा रस्ता अधीच खूप अरुंद आहे, त्यातच नवीन नगर रस्त्याकडे जाणार्‍या व त्या बाजूने येणार्‍या वाहनांची संख्याही खूप मोठी असल्याने बसस्थानक चौक अतिशय वर्दळीचा बनला आहे. आज सकाळच्या दुर्दैवी अपघातानंतर आम्ही या परिसरातील काही अतिक्रमणे हटविली असून रस्त्यावर उभ्या राहणार्‍या खासगी प्रवासी वाहनांना येथे येण्यास मज्जाव केला आहे. वाहतूक शाखेचे मनुष्यबळही वाढवले जाणार असून आजपासून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गांभीर्याने लक्ष्य देणार आहोत.
– मुकुंद देशमुख
पोलीस निरीक्षक – संगमनेर शहर

याबाबत मयत महिलेचा मुलगा बाळासाहेब कारभारी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी मालट्रकचा चालक अनिल अशोक गेठे (पत्ता माहिती नाही.) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या कलम 304 (अ) सह 279, 337, 338 व मोटार वाहन कायद्याचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Visits: 222 Today: 1 Total: 1111949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *