नोकरीचे आमिष दाखवून सत्तावन्न लाख रुपयांना शिक्षिकेने घातला गंडा

नोकरीचे आमिष दाखवून सत्तावन्न लाख रुपयांना शिक्षिकेने घातला गंडा
राहात्यातील धक्कादायक प्रकार; पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून येणार्‍या सूचनेनुसार होणार कारवाई
नायक वृत्तसेवा, राहाता
तहसीलदार असल्याची बतावणी करीत येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिरातील हंगामी शिक्षिका असलेल्या एका महिलेले सात जणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुमारे सत्तावन्न (57) लाख रुपयांना गंडा घातला. याबाबत देण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला माहिती पाठवली आहे. तेथून आलेल्या सुचनेनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यानी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सात जणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुमारे सत्तावन्न लाख रूपयांना गंडा घालण्यात आला आहे. याबाबत धिरज प्रताप पाटील (रा.साकुरी, ता.राहाता) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यात म्हंटले आहे की, बिना दिनेश सोनावणे रयत शिक्षण संस्थेच्या राहाता येथील शारदा विद्या मंदिरात हंगामी शिक्षिका होत्या. त्यांनी मी व माझी पत्नी विद्या यांना रयतमध्ये शिक्षक सेवक पदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ही महिला व तिचा पती दिनेश हे आम्हांला लोणी येथील एका रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचार्‍याकडे घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर या कामासाठी वीस लाख रुपये द्यायचे असे ठरले. दरम्यान, 30 जुलै, 2014 ते 15 जानेवारी, 2019 या कालावधीमध्ये आम्ही सोनावणे दाम्पत्याकडे वीस लाख रुपये दिले. त्यातील दोन लाख रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे दिली. मात्र, प्रत्यक्षात नोकरी मिळाली नाही. गेल्या 5 सप्टेंबर नंतर सोनावणे दाम्पत्याने त्यांचे फोन बंद केले. तसेच राहाता येथून आपले बिर्‍हाड घेऊन ते दाम्पत्य गायब झाले.

विशेषतः ती महिला तहसीलदार पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची देखील बतावणी करायची. तलाठ्याची नोकरी लावून देते असे सांगून अन्य काही जणांकडूनही तिने पैसे घेऊन फसवणूक केल्याच्या तक्रारी देखील आहेत. दरम्यान, या प्रकरणात फसवणूक झालेले तक्रारदार धिरज पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे यांना निवेदन देऊन फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

 

Visits: 115 Today: 2 Total: 1105389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *