जायकवाडी पाठोपाठ जिल्ह्याला निसर्गाचाही फटका! अवकाळीने फळबागांसह कपाशीचे नुकसान; आश्वीत पावसाचा धुमाकूळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे रविवारी जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सोडला गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाला निसर्गानेही जोरदार तडाखा दिला आहे. वातावरणीय बदलातून रविवारी सायंकाळी टपोर्या थेंबांसह सुरु झालेल्या अवकाळीने रात्रभर दक्षिणेतील काही तालुके वगळता संपूर्ण जिल्ह्याला धुवून काढले. अनेक भागात मोठ्याप्रमाणात गारपीट झाल्याचेही वृत्त हाती आले आहे. काही भागांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. तर, रब्बीच्या पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढून शेतकर्यांच्या उत्पादन खर्चात भर पडण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील आश्वी, शिबलापूर भागात पावसाचा जोरदार फटका बसल्याने फळबागांसह कपाशीचेही नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे वृत्त असून काढून ठेवलेल्या भातपिकाचे नुकसान झाल्याचे समजते.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात दोन दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून रविवारी सायंकाळनंतर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याप्रमाणे घडलेही, सायंकाळच्या सुमारास नगर, शेवगावपासून ते अकोलेपर्यंत सर्वदूर अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. श्रीगोंदा, कर्जत व जामखेड तालुक्याचा काही भाग वगळता उर्वरीत संपूर्ण जिल्ह्यात बरसलेल्या या पावसाचा काही भागातील पिकांना फायदा झाला आहे.
मात्र ढगाळी वातावरणामुळे तरारलेल्या पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव होवून शेतकर्यांना फवारणी करावी लागेल. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याचीही शक्यता आहे. रविवारी संगमनेर तालुक्यातील आश्वी मंडलात सर्वाधीक 72.3 तर शिबलापूर मंडलात 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या भागात फळबागा मोठ्या प्रमाणात असल्याने अवकाळीने त्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मात्र अद्याप त्याची माहिती समोर आलेली नाही. तळेगाव मंडलातही 70.3 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला असून पिंपरणे 61.3, समनापूर 50.5, साकूर 43.8, धांदरफळ 42.3, घारगाव व डोळासणे प्रत्येकी 23.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
अकोले तालुक्यातही सर्वदूर अवकाळी पावसाची नोंद झाली असून साकीरवाडी, राजूर व शेंडी महसूली मंडलात प्रत्येकी 55.8 मिलीमीटर तर, विरगाव 45.5, अकोले 42.3, समशेरपूर 38.8, कोतुळ व ब्राह्मणवाडा येथे प्रत्येकी 37.8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले जात आहे. उन्हाळ्यातील शेवटच्या आवर्तनाचे हक्काचे पाणी डोळ्यादेखत वाहून जाताना पाहुन बळीराजा कासावीस झालेला असतांनाच अवकाळीनेही फटका दिल्याने अपवाद वगळता बहुतेक शेतकर्यांच्या चिंता वाढल्या आहेत.