‘लवकर ये मी तुझी वाट पाहतोय…!’
‘लवकर ये मी तुझी वाट पाहतोय…!’
प्रशांत गडाखांनी रुग्णालयात जाऊन कोरोना रुग्णाला दिला मानसिक आधार
नायक वृत्तसेवा, नेवासा
कोरोनासारख्या आजारासोबत झुंज देत असणार्या आपल्या कार्यकर्त्याला मानसिक आधार देण्यासाठी राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे भाऊ प्रशांत गडाख थेट एका खासगी रुग्णालयात पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी त्या रुग्णाची भेट घेत संवाद साधत ‘लवकर ये मी तुझी वाट पाहतोय’, अशी सादही घातली. दरम्यान या प्रकाराची अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
कोरोना धास्तीमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. एखाद्याला सर्दी, खोकला असला तरी त्याच्याजवळ जाण्यासाठी अनेकांना भीती वाटते. ग्रामीण भागात कोरोना म्हटलं तरी अनेकांना भीती वाटते. हा आजार झाल्यानंतर काही रुग्ण हे मानसिकदृष्ट्या खचतात देखील. मात्र, मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी थेट रुग्णालयातच जाऊन कोरोना झालेल्या आपल्या कार्यकर्त्याची विचारपूस केली आहे.
‘मला लवकर बरा होऊन तु घरी आलेला पाहिजे’, ‘किती दिवसात बरा होऊन येशील’, असा संवादही त्यांनी संबंधित बाधित रुग्णासोबत साधला. तसेच, ‘लवकर ये मी तुझी वाट पाहतोय’, असे सांगत संबंधित रुग्णाला मानसिक आधार देण्याचे कामही त्यांनी केले. याबाबत प्रशांत गडाख यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘कोरोना हा सर्वांसाठी नवीन आजार आहे. या आजाराच्या मुळापर्यंत कोणी गेले नाही. मी आत्तापर्यंत अनेक रुग्णांना भेटलो असून त्यामधून माझी भीती दूर झाली आहे. मला यामधून संदेश एवढाच द्यायचा आहे की, कोरोना रुग्णाला मानसिक आधार देणे हे खूप गरजेचे असते. कारण मानसिक आधारातून खूप ऊर्जा संबंधित रुग्णाला मिळत असते. विज्ञानासोबत मानसिक आधार गरजेचा आहे, नाही तर माणूस खचून जाऊ शकतो. कोरोना बाधितांवर उपचार करण्याचे डॉक्टर हे काम करीत आहेतच. तर आपण देखील इतर आर्थिक मदत करणे व मानसिक आधार देण्याचे काम करू शकतो.’